Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यामध्ये पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या प्रत्येकी १३, पश्चिम बंगाल नऊ, बिहार आठ, ओडिशा सहा, हिमाचल प्रदेश चार, झारखंड तीन, तर चंदीगढमधल्या एका जागेचा समावेश आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या चार जून रोजी होईल. आंध्रप्रदेश आणि ओडिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील चार जून रोजी, तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी दोन जून रोजी होणार आहे.
****
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात इर्डानं काल अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. कॅशलेश अर्थात रोख विरहीत उपचारांबाबत तातडीनं निर्णय घेण्याचे, त्याचबरोबर डिस्चार्जचं पत्र मिळाल्यानंतर, मंजूरीवर तीन तासांत निर्णय घेण्याचे निर्देश इर्डानं विमा कंपन्यांना देत विमाधारकांना दिलासा दिला आहे. विमा क्षेत्राशी संबंधित एक मास्टर परिपत्र जारी करण्यात आलं असून, यात सर्व नियमांना एकाच ठिकाणी आणण्यात आलं आहे. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपन्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची कार्यवाही आटोपून विमाधारकाचा दावा निकाली काढावा, असे निर्देशही इर्डानं दिले आहेत.
****
राज्यातल्या मोठे, मध्यम आणि लघू अशा एकूण दोन हजार ९९७ प्रकल्पात सध्या केवळ २२ पूर्णांक शून्य सहा टक्के इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यातल्या एकूण पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली असून, अनेक भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या ४४ मोठ्या प्रकल्पात आठ पूर्णांक ९२ टक्के, ८१ मध्यम प्रकल्पात ११ पूर्णांक ४९ टक्के, तर ७९५ लघू प्रकल्पात सहा पूर्णांक ७६ टक्के इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती आहे. यानिमित्त राज्यात सर्वत्र अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. काल पारंपरिक गजीनृत्याचं, तसंच ‘मी अहिल्या बोलतेय’, या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण झालं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू आणि फळबाग लागवड कार्यक्रमाची विभागीय आढावा बैठक पार पडली. बांबू लागवड ही पर्यावरण आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक लाभ होईलच शिवाय पर्यावरणाचं रक्षण होईल, असं मत मान्यवरांनी यावेळी सांगितलं.
****
आषाढी यात्रेसाठी येणार्या वारकर्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी प्राधान्य द्यावं आणि सर्व यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल अधिकारी वर्गासह पालखी तळांची आणि पालखी मार्गाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. आषाढी एकादशी सोहळा येत्या १७ जुलै रोजी साजरा होणार आहे.
****
जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ इथल्या दुहेरी हत्या प्रकरणातल्या सहा संशयितांना धुळे पोलिसांनी पाठलाग करून पकडलं. त्यांच्याकडून इनोव्हा कार, दहा मोबाईल हँडसेट आणि ५४ हजाराची रोख रक्कम जप्त करण्यात आली. २९ मे रोजी भुसावळ शहरातले भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर, जुना सातारा भागात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नंदुरबार जिल्हा परिषदेतल्या कथित अपंग विभाग गैरव्यवहार प्रकरणी ७२ जणांवर कारवाई करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी त्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले आहेत. २०१७ मध्ये जिल्हा परिषदेमध्ये नियमबाह्य पद्धतीने या विभागासाठी भरती करण्यात आली होती. २०१८ मध्ये ते उघड झाल्यानंतर अधिवेशनात या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.
****
सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपान्त्य पूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या किम सो युंग आणि काँग ही युंग या जोडीचा १८-२१, २१-१९, २४-२२ असा पराभव केला.
दरम्यान, या स्पर्धेतलं महिला आणि पुरुष एकेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं. काल झालेल्या उप-उपांत्यपूर्व फेरीत पी व्ही सिंधू आणि एच एस. प्रणॉय यांना पराभवाचा सामना करावा लागला.
****
No comments:
Post a Comment