Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.यावर्षी राज्याचा निकाल ९५ पूर्णांक ८१ टक्के इतका लागला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दहावीच्या नियमित परीक्षेसाठी यंदा राज्यातल्या नऊ विभागीय मंडळातून १५ लाख ४९ हजार ३२६ नियमित विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ जण उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी पेक्षा यंदा १ पूर्णांक ९८ टक्क्यांनी निकाल वाढला आहे.कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९ पूर्णांक एक शतांश टक्के इतका लागला असून नागपूर विभागाचा सर्वात कमी म्हणजे ९४ पूर्णांक ७५ टक्के इतका लागला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ९५पूर्णांक १९ टक्के तर लातूर विभागाचा निकाल ९५पूर्णांक २७ टक्के इतका आहे. पुणे विभागाचा निकाल ९६ पूर्णांक ४४ टक्के आणि मुंबई विभागाचा निकाल ९५ पूर्णांक ८३ टक्के इतका आहे. निकालाच्या टक्केवारीत यंदाही मुली पुढे असून त्यांचा निकाल ९७ पूर्णांक २१ टक्के इतका लागला आहे तर मुलांचा निकाल ९४ पूर्णांक ५६ टक्के इतका लागला आहे. ७२ पैकी १८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे,तर १८७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० टक्के गुण मिळाले आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहचला असून सगळ्याच प्रमुख पक्षांचे नेते विविध कार्यक्रमांमधून मतदारांशी संवाद साधत आहेत.भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज उत्तर प्रदेशच्या कुशिनगर,चंदौली आणि सलेमपूर मतदारसंघांत प्रचार करणार आहेत.भाजपाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आज वाराणसी इथे मतदारांशी संवाद साधणार आहेत.काँग्रेस पक्षाच्या महासचीव प्रियंका गांधी आज हिमाचल प्रदेशमधल्या चंबा आणि शाहपूर इथे प्रचार सभा घेणार आहेत.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी ओडिशाच्या बालासोर इथे प्रचार सभा घेणार आहेत.
****
दिल्ली मद्यधोरण घोटाळा प्रकरणात जामिनावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या जामिनाची मुदत एक आठवड्यानं वाढवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात आज दाखल केली.अपल्याला गंभीर आजार असून त्यासंबंधीच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी जामीन वाढवून मिळावा, असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे.सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांना एक जूनपर्यंत जामीन मंजूर करत दोन जूनला शरण येण्याचे आदेश याआधी दिलेले आहेत.
****
राज्यात विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या होणार असलेल्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जे. एम. अभ्यंकर यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे. मनसे नेते आणि सरचिटणीस शिरीष सावंत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत बैठक सुरू आहे.या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह विविध पदाधिकारी, मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित आहेत.
****
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी केली. येत्या ३१ मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचं महापालिकेने ठरवलं आहे. अधिकाऱ्यानी लक्ष देऊन काम करणे गरजेचं असून, पावसाळ्यापूर्वी ही सगळी कामं पूर्ण करावीत, असे निर्देश आठवले यांनी यावेळी दिले.
****
पुण्यातल्या कल्याणीनगर अपघातातल्या अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यामध्ये अदलाबदल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातल्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे. अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर, अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावं आहेत.या आरोपीच्या रक्त नमुना तपासणीच्या अहवालात फेरफार करण्याचा आरोप या डॉक्टरांवर आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर काल मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांकडून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. त्यांना नाशिकच्या खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर मालेगावात तणाव असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागात रेल्वेचा रोलिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे नांदेड रायचूर ही गाडी येत्या ३० जूनपर्यंत तांडूर ते रायचूर दरम्यान, तर रायचूर परभणी ही गाडी येत्या एक जुलैपर्यंत रायचूर ते तांडूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment