Friday, 31 May 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 May 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मे २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात देशभरातल्या ५७ मतदार संघात उद्या मतदान

·      राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

·      पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ

आणि

·      छत्रपती संभाजीनगर विभागातल्या मोठ्या प्रकल्पात सुमारे नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक

****

लोकसभा निवडणुकीच्या ७ व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे. बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह ८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील ५७ लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यासोबतच, ओडिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित ४२ विधानसभा मतदारसंघांसाठीही याच वेळी मतदान होणार आहे. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची येत्या मंगळवारी ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

****

राज्य लोकसेवा आयोगानं पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आज जाहीर केला. राज्यात अजय कळसकर यानं पुरुष उमेदवारांमध्ये प्रथम तर, मयुरी सावंत हिनं महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी खेळाडू उमेदवार वगळून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खेळाडू प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या संबंधित काही तक्रारी आयोगाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या तक्रारींची पडताळणी करून खेळाडू प्रवर्ग सोडून उर्वरित ९५८ पदांसाठीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. खेळाडू उमेदवारांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व उमेदवारांना त्यांच्या गुणपत्रिकेतील गुणांची पडताळणी करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या विविध विभागातील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, ६ जुलै ऐवजी, येत्या २१ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून काल करण्यात आली आहे.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं १९९१ नंतर पहिल्यांदाच ब्रिटनहून १०० टनापेक्षा जास्त सोनं आपल्या तिजोरीत आणलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं जमा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या काही काळापासून रिझर्व्ह बँकेनं सोनं खरेदी करायला सुरुवात केली होती. हे सोनं परदेशात जमा होत होतं. मागील बऱ्याच काळापासून बँक ऑफ इंग्लंडमध्ये अनेक देशांच्या केंद्रीय बँकांचा सुवर्णसाठा ठेवला जातो, त्यातूनच आरबीआयकडून आपला साठा भारतात आणला जात आहे.

****

पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाला आज पासून प्रारंभ झाला. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात विविध कार्यक्रम होत आहेत. राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवनातील अह‍िल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्याबाईंना समाज माध्यमांवर आदरांजली वाहिली आहे.

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ‘मी अहिल्या बोलतेय’, या नाट्यप्रयोगाचंही यावेळी सादरीकरण झालं.

छत्रपती संभाजीनगर इथंही पद्मपुरा भागात असलेल्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला विविध संघटनांच्या वतीनं आज अभिवादन करण्यात आलं. या निमित्तानं महिलांनी पदफेरी काढून अहिल्याबाईंना अभिवादन केलं.

****

राज्यात गेली ७६ वर्ष प्रवासी वाहतुक करणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस.टी. बसचा उद्या वर्धापन दिन आहे. १ जून, १९४८ ला पुणे-अहमदनगर मार्गावर, एसटीची पहिली बस धावली होती. उद्या एसटीच्या सर्व बसस्थानकांवर सजावट करण्यात येणार असून, प्रवासी आणि सर्व कर्मचारी बांधवांना, साखर-पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या प्रेम आणि विश्वासार्हतेच्या शिदोरीवर एसटी “महाराष्ट्राची लोकवाहिनी” बनली असून, भविष्यात देखील प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने ती कटिबध्द राहील, अशी ग्वाही मंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी दिली. एसटीच्या वतीने लाखो प्रवाशांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

****

नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आज निवृत्त झाले, त्यांच्या जागी राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर गेडाम यांनी २०१४ ते २०१६ दरम्यान नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणूनही काम केलं आहे.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे अभियांत्रिकी सहायक संचालक अनंत कोदंडे आज नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. कोदंडे यांनी ३८ वर्षाच्या सेवेत प्रसारभारतीच्या विविध आस्थापनांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

****

आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. तंबाखूशी संबंधित आजारांमुळे दरवर्षी १३ लाख मृत्यू होतात, जे टाळता येऊ शकतात, असं केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

या आजारांमुळे देशाच्या आरोग्य सेवा प्रणालीवर ही मोठा आर्थिक भार पडतो, या गंभीर समस्येचं निराकरण करण्यासाठी सरकारी यंत्रणाच्या, या बाबतीतल्या प्रयत्नांना साथ देण्याचं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, या दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने होणाऱ्या कर्करोगाविषयी चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं होतं. इथल्या शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वतीने भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनातून जनतेमध्ये तंबाखूने होणाऱ्या कर्करोगांची माहिती आणि जनजागृती करण्यात आली.

 

नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य रुग्णालयात इंडियन डेंटल असोसिएशन आणि जिल्ह्यातील सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.

****

वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या, स्मार्ट मीटर बसवण्याला महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली आहे. महावितरणची विदर्भातली १८ कार्यालयं आणि कर्मचारी निवासस्थानामधील ३२३ सदनिका, अशा एकूण ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. राज्यात कृषी ग्राहक वगळता, सर्व ग्राहकांच्या कार्यालय अथवा निवासस्थानी विजेचे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत मिळणार असून, दहा वर्षे या मीटरच्या देखभाल दुरुस्ती करण्याचं काम संबंधित कंपन्यांवर बंधनकारक असणार आहे.

****

दहावी आणि बारावीनंतर व्यवसायिक शिक्षण घेतल्यास रोजगाराच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत, त्यासाठी बारावीनंतर २७ हजार आणि दहावी नंतर १६ हजार विभागीय व्यवसाय शिक्षणाच्या जागा विद्यार्थ्यांसाठी प्रवेशा करिता खुल्या असल्याचं, छत्रपती संभाजीनगर इथल्या तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक उमेश नागदेवे यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेशी संपर्क साधावा आणि तिथल्या समुपदेशन केंद्राची मदत घेऊन आपल्या शंकांचे निरसन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण दोन हजार ९९७ प्रकल्पात सध्या फक्त २२ पूर्णांक सहा शतांश टक्के इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यातल्या एकूण पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली असून, अनेक भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातल्या ४४ मोठ्या प्रकल्पात आठ पूर्णांक ९२ शतांश टक्के, ८१ मध्यम प्रकल्पात ११ पूर्णांक ४९ शतांश टक्के, तर ७९५ लघु प्रकल्पात सहा पूर्णांक ७६ शतांश टक्के इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे.

****

इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष ॲड. निशांत वाघमारे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रारुप विकास आराखड्यावर सुनावणीचा तिसरा टप्पा येत्या सहा जूनपासून सुरू होणार आहे. या टप्प्यात तीन हजार ३४८ आक्षेपकर्त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आलं आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातली सुनावणी सुरू असून, ती दोन जून रोजी पूर्ण होणार आहे.

****

No comments: