आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२८ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय लोक शाही आघाडी सरकारचं उद्दीष्ट भ्रष्टाचार समूळ नष्ट करणं आणि पुराव्यावर आधारित कारवाई करणं हे असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत धोरणाचं उद्दिष्ट देशातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देणं आणि रोजगारक्षमता वाढवणं हे असून, सरकारनं थेट लाभ हस्तांतराच्या माध्यमातून आतापर्यंत ३८ लाख कोटी रुपये लोकांना दिल्याचंही मोदी यांनी सांगितलं.
****
स्वातंत्रयवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जागतिक गुंतवणुकदार बँक गोल्डमन सॅक्सनं, २०२४ साठी भारताचं सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपीचा दर, सहा पूर्णांक सात टक्क्यांपर्यंत वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मोठ्या प्रमाणात लाभांश हस्तांतरणामुळे अतिरिक्त वित्तीय वाढीचा वेग अपेक्षित आहे. भारताचा वाढीव वेग सक्षम असून, एप्रिल - जून मध्ये चलनवाढीचा दर खाली येण्याची शक्यता आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
****
वसुधैव कुटुंबकम ही भारताची मुलभूत मूल्यं आणि नीतिमूल्य ही जागतिक आरोग्य परिषदेच्या, सर्व काही आरोग्यासाठी आणि सर्वांसाठी आरोग्य, या मध्यवर्ती संकल्पनेशी सुसंगत आहे, असं मत केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी व्यक्त केलं आहे. स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या बैठकीत ते काल बोलत होते. माहिती आणि जागरुकता तसंच प्रतिबंधात्मक उपाय यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच, पारंपारिक सार्वजनिक आरोग्यविषयक दृष्टीकोन ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
****
रेमाल चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये बांगलादेशात दहा, तर पश्चिम बंगालमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. या चक्रीवादळामुळे बदललेलं पश्चिम बंगालमधलं वातावरण हळूहळू पूर्वदावर येईल, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment