Tuesday, 28 May 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.05.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 May 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ मे २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची सर्व यंत्रणा सज्ज- मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन

·      पुण्यातल्या पोर्शे अपघाताची सीबीआयमार्फत चौकशीची काँग्रेस पक्षाची मागणी

आणि

·      दक्षिण मराठवाड्यात पुढील ३६ ते ४८ तासात पूर्व मोसमी पावसाची शक्यता

****

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक पार पडली, त्यानंतर ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मराठवाड्यातला दुष्काळ तसंच अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपीटीचे पंचनामे, मदत आणि येणारा पाऊस यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. पावसाळ्यात अतिवृष्टी झालेल्या गावांमध्ये औषधे, पुरेसे अन्नधान्य पुरवणे, तसंच कर्नाटक, तेलंगणा आणि मध्यप्रदेश मधून येणाऱ्या पाण्याबद्दल समन्वय ठेवणे, या विषयावरही बैठकीत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. वीर सावरकर यांनी देशसेवेसाठी समर्पित केलेलं जीवन देशसेवेची प्रेरणा देणारं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शासकीय निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण केली.

मुंबईत मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी मंत्रालयातले अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. शहरातल्या विविध संघटनांच्यावतीनं समर्थ नगर भागात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आलं.

नांदेड महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या सावरकर चौकात ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर सतीश महामुनी यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.

नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुलगुरू संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरी शहरातलं ऐतिहासिक पतितपावन मंदिर, स्वातंत्र्यलक्ष्मी चौक आणि मध्यवर्ती कारागृहातल्या सावरकर स्मारकात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

****

पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फतच चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अंमली पदार्थांचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, ससून रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत असून, या रुग्णालयाच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावर एक पोस्ट केली आहे. रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणं योग्य नाही, म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समीक्षा होणं आवश्यक असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.

****

रेमल चक्रीवादळामुळे मिझोरामची राजधानी आयझोलमध्ये आज भूस्खलनात दहा जणांचा मृत्यू झाला. एका दगडाच्या खाणीत झालेल्या या अपघातात अनेक मजूर अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य सुरू झालेलं असून, मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने शोध मोहिम सुरू केली आहे. आतापर्यंत दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

****

हरियाणामधील बहुचर्चित रणजित सिंग हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सह अन्य चौघांची पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. रणजीत सिंग यांची १० जुलै २००२ रोजी गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने राम रहीमसह चौघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयानं सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केला. दरम्यान, सिरसा इथल्या आश्रमात दोन महिला अनुयायांवर लैगिंक अत्याचार प्रकरणी गुरुमीत राम रहिम हा वीस वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.

****

राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मानवी तस्करी आणि सायबर गुन्हेगारी प्रकरणी धडक कारवाई करत पाच जणांना अटक केली. या आरोपींना वडोदरा, गोपालगंज, दिल्ली, गुरुग्राम आणि चंदीगढ इथून अटक करण्यात आली. त्यांच्यावर भारतीय युवकांना नोकरीचं आमिष दाखवून परदेशात नेऊन त्यांना कंबोडिया आणि लाओस सारख्या ठिकाणी अवैध कामांसाठी प्रवृत्त करण्याच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा आरोप एनआयएनं केला आहे. या कारवाईत कागदपत्रं, डिजिटल उपकरणं, एकाधिक पासपोर्ट, आदी साहित्य जप्त करण्यात आल्याचं एनआयएनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

छत्तीसगड इथल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका नक्षलवाद्यानं आज गडचिरोली इथं केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. गणेश गट्टा पुनेम असं त्याचे नाव असून, शासनानं त्याच्यावर सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

****

दक्षिण मराठवाड्यात पुढील ३६ ते ४८ तासात पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी ही माहिती दिली. आज शहरात ३९ पूर्णांक ९ सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. तसंच शहरात ३७ पूर्णांक २ दशांश किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते अशी माहिती औंधकर यांनी दिली.

****

धाराशिव जिल्ह्यात जनावरांना आवश्यक असलेला चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाय.बी.पुजारी यांनी दिली आहे. चारा टंचाई भासू नये यासाठी विभागामार्फत गेल्या वर्षी ५६ हजार ८१५ किलो सुधारीत ज्वारी वैरण बियाणांचे वाटप करण्यात आलं होतं. त्यामधून ३ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावर बियाणाची पेरणी केल्यामुळे ३ लाख मेट्रिक टन इतका चारा उपलब्ध झाला आहे. तसंच खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या दुय्यम उत्पादनातून साडे सात लाख मेट्रीक टन इतका चारा उपलब्ध झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली असून जून महिन्यात विभागातर्फे सुधारीत मका वैरण बियाणांचे वाटप करण्यात येणार असल्याचं विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या ४ जूनला होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यासाठी नियुक्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया निर्दोष पद्धतीनं पार पाडता यावी यासाठी प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावं, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतर्फे ४० तलावांमधून आतापर्यंत ४४ हजार २८७ ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या तलाव आणि धरणातील गाळ काढण्याचं काम लोकसहभागातून सुरू असून यात सामाजिक संस्था आणि शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, तसंच काढलेला गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी घेवून जावा, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. ही बाब विचारात घेवून लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहीम राबवण्यात येत आहे.

****

एफ आय एच हॉकी प्रो लीग युरोपीय स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारतानं हरमनप्रीत सिंहच्या हॅटट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाचा पाच - चार असा पराभव केला. भारतासाठी अरैजीत सिंह हुंदल आणि गुरजंत सिंह यांनी प्रत्येकी एक आणि हरमनप्रीत सिंहनं तीन गोल नोंदवले. भारताचा पुढचा सामना एक जूनला जर्मनीसोबत होणार आहे.

****

पॅरिस ऑलिम्पिकमधल्या प्रवेशासाठी बँकॉकमध्ये सुरु असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध पात्रता स्पर्धेत भारताच्या अंकुशिता बोरो हीनं महिलांच्या ६० किलो वजनी गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. अंकुशिता हिनं मंगोलियाच्या नमुन मोनखोर हिच्यावर ४-१ अशी मात केली. पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात मात्र भारताच्या अभिमन्यू लॉरा याचं आव्हान संपुष्टात आलं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...