Sunday, 26 May 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २६ मे २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 26 May 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सरासरी ६१ टक्के मतदान 

·      गुजरातमध्ये राजकोट इथं गेम झोनला आग लागून २६ जणांचा मृत्यू

·      पुण्यातल्या कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

·      अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर-नियम व अटी लागू नाटक सर्वोत्कृष्ट

      आणि

·      जागतिक तीरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघाला सुवर्णपदक

****

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया काल पार पडली. आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या ५८ जागांसाठी सुमारे ६१ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये उत्तरप्रदेशातल्या १४, हरियाणा दहा, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी आठ, दिल्ली सात, ओडिशा सहा, झारखंड चार आणि जम्मू काश्मीरमधील एका मतदारसंघाचा समावेश आहे. ओडिशा विधानसभेच्या ४२ जागांसाठीही काल मतदान झालं.

राजधानी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, गृह सचिव अजय भल्ला, यांच्यासह अनेक मान्यवरांनी काल मतदानाचा अधिकार बजावला.

लोकसभा निवडणुकीच्या सातवा आणि अखेरच्या टप्प्यात आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५७ मतदार संघात येत्या एक जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीतल्या सर्व टप्प्यातल्या मतदानाची चार जून रोजी मोजणी होणार आहे.

****

निवडणूक म्हणजे लोकशाहीतला मोठा उत्सव आणि भावी पिढ्यांमध्ये लोकशाहीची मूल्यं रुजवण्याची एक संधी असल्याचं, भाजपाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते. सरकार किंवा राजकीय पक्षांनी त्यांच्या कामाचा हिशेब जनतेला द्यावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

****

मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असं भासवणारे आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र -ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचं दाखवणाऱ्या काही जुन्या चित्रफिती सामाजिक संपर्क माध्यमांवरून प्रसारित केल्या जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. या चित्रफिती महाराष्ट्रातल्या नसल्याचं, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झालेली असल्याचं या कार्यालयानं कळवलं आहे.

****

गुजरातमध्ये राजकोट इथं काल संध्याकाळी एका गेम झोनला लागलेल्या भीषण आगीत नऊ मुलांसह २६ जणांचा मृत्यू झाला. शाळांना उन्हाळी सुट्या तसंच शनिवार असल्यानं या ठिकाणी लहान मुलं आणि त्यांच्या पालकांची मोठी गर्दी होती. संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी अचानक लागलेल्या आगीनं रौद्र रूप घेतलं, त्यात २६ जणांचा होरळपून मृत्यू झाला. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी जनुकीय चाचणी करावी लागणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या घटनेच्या तपासासाठी विशेष तपासणी पथक- एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबांना चार लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये मदत गुजरात राज्यसरकारनं जाहीर केली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

****

विको कंपनीचे चेअरमन यशवंतराव पेंढारकर यांच्या पार्थिव देहावर नागपूर इथल्या अंबाझरी घाट येथे काल सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विको समूहातल्या कर्मचाऱ्यांसह समाजाच्या विविध स्तरातल्या नागरिकांनी यावेळी पेंढारकर यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.  

****

पुण्यातल्या अल्पवयीन कारचालकाकडून झालेल्या अपघाती मृत्यू प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना न्यायालयानं २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आपल्या नातवाने केलेला गुन्हा गाडीच्या चालकाने स्वत:वर घ्यावा, यासाठी चालकावर दबाव आणल्याचा आणि त्याचं अपहरण करून डांबून ठेवल्याचा सुरेंद्रकुमार यांच्यावर आरोप आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल मंडळाच्या सहा अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल, असं राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी कळवलं आहे.

****

 

७७ व्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री अनसूया सेनगुप्ता यांना प्रदान करण्यात आला. कान चित्रपट महोत्सवात हा पुरस्कार पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. बल्गेरियातले चित्रकर्मी कॉन्स्टान्टिन बोजानोव्ह यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘द शेमलेस’ या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सेनगुप्ता यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांसाठीचे पुरस्कार काल जाहीर झाले. नियम व अटी लागू या नाटकासाठी संकर्षण कऱ्हाडे यांना सर्वोत्कृष्ट लेखक तसंच सर्वोत्कृष्ट अभिनेता तर याच नाटकासाठी चंद्रकांत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक म्हणूनही 'नियम व अटी लागू' नाटकाची निवड झाली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार लीना भागवत यांना, सहाय्यक अभिनेत्री - पर्ण पेठे, सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक -'डबल लाईफ' तर प्रायोगिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रशांत निगडे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार बकुळ धवने यांना जाहीर झाला आहे. येत्या १४ जून रोजी हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचं, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितलं.

****

सैन्य दलातल्या मुलींच्या क्रीडा तुकडीची लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी काल घोषणा केली. १२ ते १६ वर्ष वयोगटातील युवतींना क्रीडा व्यासपीठ प्राप्त व्हावं आणि जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळावं या हेतुने ही तुकडी स्थापन करण्यात आली आहे. या मुलींना ऑलिंपिकसाठी विविध क्रीडा प्रकारांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. एक हजार १२४ मुलींनी यासाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ३५ मुलींची निवड करण्यात आली. २४ मुलींना पुण्यात तर ११ मुलींना मध्यप्रदेशात महू इथं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

****

दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्ण पदक जिंकलं आहे. ज्योती सुरेखा वेन्नम, परनीत कौर आणि आदिती स्वामी यांच्या संघानं तुर्कीच्या संघाला अंतिम सामन्यात पराभूत केलं. दरम्यान, या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

****

जपानमधल्या कोबे इथं सुरू असलेल्या पॅरा अॅथलेटिक्स जागतिक स्पर्धेत महिलांच्या २०० मीटर टी-१२ विभागात भारताच्या सिमरन शर्मानं सुवर्णपदक तर १०० मीटर टी-३५ प्रकारात प्रीती पाल हिनं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या भालाफेक एफ ४१ प्रकारात नवदीप यानं कांस्य पदक पटकावलं आहे. या पदकांसह भारताची या स्पर्धेतली एकूण पदकसंख्या १७ झाली आहे. यात सहा सुवर्ण, पाच रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे.

****

क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिटन स्पर्धेत भारताची ऑलिंपिक विजेती खेळाडू पी.व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्य लढतीत सिंधूने  थायलंडच्या खेळाडूचा १३-२१, २१-१६, २१-१२ अशा फरकानं पराभव करीत अंतिम गाठली. आज होणाऱ्या अंतिम फेरीत सिंधूचा सामना चीनच्या झी-यी -यांग हिच्याशी होणार आहे.

****

इंडियन प्रीमियर लीग- आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा यंदाच्या हंगामातला अंतिम सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात आज होणार आहे. चेन्नईच्या एम. . चिदंबरम मैदानावर सायंकाळी हा सामना खेळवण्यात येणार आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या जवळपास १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया विमा कंपनीने सुरू केली आहे. आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या सूचना विमा कंपनीला देण्यात आल्या आहेत. तसंच तक्रारी दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील इतरांप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्यास सूचित करण्यात आलं असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात सध्या सात गावं आणि १७ वाडी तांडयांना २१ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी २७० खाजगी विहिरी तसंच विंधन विहीरींचे अधिग्रहण करण्यात आलं आहे. नळ योजना विशेष दुरुस्तीची १६ कामं पूर्ण असून ८२ कामं प्रगतीपथावर आहेत, तात्पुरत्या पूरक नळ योजनांपैकी आठ कामं पूर्ण झाली असून, २३ कामं प्रगती पथावर असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महावितरणतर्फे विजेचे सहा लाख नवीन स्मार्ट मीटर बसवले जाणार  आहेत. यामध्ये शहरासाठीच्या तीन लाख ४० हजार मीटरचा समावेश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 

राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल यवतमाळ इथं ४५ पूर्णांक पाच, परभणी ४५ पूर्णांक दोन, अमरावती, ब्रह्मपुरी, आणि वर्धा इथं काल ४४ अंश सेल्सियस तापमान होतं.

मराठवाड्यात नांदेड ४३ पूर्णांक आठ तर छत्रपती संभाजीनगर ४२ पूर्णांक आठ तर बीड इथं ४२ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

 

No comments: