Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
· राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर, ९५
पूर्णांक ८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
· पुण्याच्या कल्याणी नगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात
ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक
· औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी
पूर्ण
आणि
· लातूर जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेच्या कामांना गती देण्यासाठी
शासकीय यंत्रणांनी समन्वयानं कामं करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यावर्षी
राज्याचा निकाल ९५ पूर्णांक ८१ टक्के इतका लागला आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा एक पूर्णांक ९८
टक्क्यांनी निकाल वाढला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९ पूर्णांक एक शतांश
टक्के इतका लागला असून, नागपूर विभागाचा सर्वात कमी म्हणजे ९४ पूर्णांक
७५ टक्के इतका लागला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ९५ पूर्णांक १९ टक्के तर
लातूर विभागाचा निकाल ९५ पूर्णांक २७ टक्के इतका आहे. पुणे विभागाचा निकाल ९६ पूर्णांक
४४ टक्के, कोल्हापूर ९७ पूर्णांक ४५, अमरावती ९५ पूर्णांक ५८, नाशिक
९५ पूर्णांक २८ आणि मुंबई विभागाचा निकाल ९५ पूर्णांक ८३ टक्के इतका आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात बीड जिल्ह्याचा
सर्वाधिक म्हणजे ९७ पूर्णांक ४० टक्के निकाल लागला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्याचा ९५ पूर्णांक ५१,
जालना ९४ पूर्णांक ९९, परभणी ९३ पूर्णांक ०३ तर हिंगोली
जिल्ह्याचा निकाल ९२ पूर्णांक २२ टक्के लागला आहे.
तर लातूर विभागात लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक
म्हणजे ९६ पूर्णांक ४६ टक्के निकाल लागला असून, धाराशीव जिल्ह्याचा ९५ पूर्णांक
८८ आणि नांदेड जिल्ह्याचा ९३ पूर्णांक ९९ टक्के निकाल लागला आहे.
निकालाच्या टक्केवारीत यंदाही मुली पुढे
असून त्यांचा निकाल ९७ पूर्णांक २१ टक्के इतका लागला आहे. तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं
प्रमाण ९४ पूर्णांक ५६ टक्के इतकं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं असून, त्यांना
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
पुण्याच्या कल्याणी नगर भागात झालेल्या पोर्शे
कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे.
न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय टावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघां डॉक्टरांनी
संबंधित अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. १९
मे रोजी रात्री हा आरोपी मद्याच्या अंमलाखाली भरधाव चालवत असलेल्या कारची धडक बसून
दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला होता.
****
विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मनसेचे सरचिटणीस
शिरीष सावंत यांनी ही घोषणा केली. विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान
होणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातल्या प्रमुख
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज मुंबईत पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या उपस्थितीत पार पडली. कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत
करावं, असं पवार यांनी यावेळी सांगितलं. येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
२५ वा वर्धापनदिन असून,
यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवावेत, असे
निर्देश त्यांनी दिले.
****
पर्यावरणस्नेही परिवहनाला उत्तेजन देण्याच्या
दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल उचलत इंडियन ऑईल कंपनीनं, आज भारतीय सेनेला हायड्रोजन
इंधनावर चालणारी अत्याधुनिक बस प्रदान केली. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि इंडियन
ऑईलचे अध्यक्ष एस. एम. वैद्य यांच्या उपस्थितीत दिल्लीतल्या इंडिया
गेट इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ झालेल्या एका कार्यक्रमात यासंबंधीच्या करारावर
स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देत, आपली
संचालन क्षमता वाढवण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सेना प्रतिबद्ध आहे, असं
प्रतिपादन जनरल मनोज पांडे यांनी यावेळी केलं.
****
मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात
'विज्ञान विदुषी २०२४'
या कार्यक्रमाचं आज उद्घघाटन झालं. भौतिकशास्त्रात महिलांची
रुची वाढवण्याच्या दृष्टीनं टाटा मूलभूत संशोधन संस्थेनं २०२० पासून हा तीन आठवड्यांचा
निवासी उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये विज्ञान क्षेत्रातल्या उच्चपदस्थ महिला शास्त्रज्ञांकडून
मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थिनी भौतिकशास्त्रात कारकीर्द करण्याकडे वळतात, असं
प्रतिपादन होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे प्राध्यापक अमोल दिघे यांनी यावेळी बोलताना
केलं.
****
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या चार जूनला
होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं बीड बायपास परिसरातल्या एमआयटी महाविद्यालयाच्या
इमारतीत औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठीची मतमोजणी होणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे
जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली. या दिवशी सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीनं मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. प्रशासनानं
मतमोजणी होणाऱ्या इमारतीला तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था केली आहे. ७० पोलीस अधिकारी, ५००
पोलीस कर्मचाऱ्यांसह केंद्र तसंच राज्य सुरक्षा दलाचे पोलिसही बंदोबस्तासाठी तैनात
असल्याचं स्वामी यांनी सांगितलं. या दिवशी या इमारतीजवळच्या वाहतुकीत बदल केले जाणार
असल्याची, तसंच प्रत्यक्ष मतमोजणी आधी, तीन जूनला मतमोजणीची रंगीत तालीम केली जाणार
असल्याची माहितीही स्वामी यांनी यावेळी दिली.
****
लातूर जिल्ह्यातल्या जल जीवन मिशन योजनेच्या
कामांना गती देण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयानं कामं करावीत, अशा
सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. पाणी टंचाई उपाययोजना आणि
जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत
त्या आज बोलत होत्या. पूर्ण होत आलेली बहुतांश कामं येत्या सात दिवसात पूर्ण करावीत
असा आदेश देत,
यापुढे या योजनेचा दैनंदिन आढावा घेतला जाणार असल्याचं त्यांनी
सांगितलं. पाणी टंचाईच्या अनुषंगानं करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी
यावेळी घेतला.
****
बीड जिल्ह्यातल्या ऐंशी दिव्यांग व्यक्तींना
आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या कृत्रिम हात, पाय आणि कुबड्यांचं नि:शुल्क
वाटप करण्यात आलं. बीडच्या रोटरी क्लब आणि मुंबईच्या रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या
वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांगांना समाजात स्वतंत्रपणे
जगण्याचा आत्मविश्वास मिळेल, असं मत बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.
****
कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस, अर्थात
एकत्रित संरक्षण सेवेची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य शासनानं
येत्या दहा जून ते तेवीस ऑगस्ट या कालावधीत प्रशिक्षण आयोजित केलं आहे. नाशिकच्या छात्र
पूर्वप्रशिक्षण केंद्रात हे प्रशिक्षण होणार आहे. बीड जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांनी
या प्रशिक्षणाची संधी मिळवण्यासाठी येत्या सहा जूनला बीडच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात
मुलाखतीसाठी उपस्थित रहावं, आणि याबद्दलच्या अधिक माहितीसाठी
९१ ५६ ०७ ३३ ०६ या व्हॉट्स अप क्रमांकावर संपर्क करावा, असं
आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
दुष्काळी अनुदान देण्याच्या मागणीसाठी हिंगोली
जिल्ह्यातल्या ताकतोडा इथल्या शेतकऱ्यांनी आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. प्रशासनाला
अनेक वेळा विचारणा करुनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान आणि अतिवृष्टीचं
अनुदान मिळालं नाही,
त्यामुळे जोपर्यंत शासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत
आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
****
राज्यात कालपासून ठिकठिकाणी वादळी वारे वाहात
असून, वातावरण ढगाळ झालं आहे. बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वादळी वारे आणि विजांमुळे
झालेल्या शेतीपिकं आणि पशुधनाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश
देण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या अशा नुकसानाबद्दल तहसीलदार किंवा नायब तहसीलदारांशी
संपर्क साधावा,
असं आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केलं
आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज या नुकसानाची
पाहणी केली,
तत्काळ पंचनामे करुन शासनामार्फत मदत देण्याची सूचना त्यांनी
संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.
****
No comments:
Post a Comment