Thursday, 30 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:30.05.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

३० मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ मतदारसंघांसाठी परवा एक जून रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या गेल्या शनिवारी पार पडलेल्या सहाव्या टप्प्यात ५८ मतदारसंघांमध्ये ६३ पूर्णांक ३७ शतांश टक्के मतदान झालं.

****

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यातील मतदानाचं प्रमाण २०१९ च्या तुलनेत अधिक असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. यावर्षी ६१ पूर्णांक ३३ टक्के मतदान झालं. यात ३ कोटी ६ लाख ५६ हजार ६११ पुरुष मतदार आणि २ कोटी ६३ लाख ४८ हजार ७१७ इतक्या महिला मतदारांची संख्या आहे. गेल्या वर्षी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत ६० पूर्णांक ७१ टक्के इतकं मतदान झालं होतं.

****

स्टेट बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत भारताचा उत्पादन वाढीचा दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर या वर्षाचा उत्पादन वाढीचा दर आठ टक्क्यांपर्यंत पोहचेल असं बँकेनं जारी केलेल्या अहवालात म्हंटलं आहे.

****

नैर्ऋत्य मोसमी पाऊस येत्या २४ तासात केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. तसंच येत्या दोन दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काल मराठवाड्यात परभणी इथं ४२, बीड ४१ पूर्णांक सात, छत्रपती संभाजीनगर इथं ४० तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक तीन अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****


पॅरिस ऑलंपिक प्रवेशासाठी बँकॉक इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध पात्रता स्पर्धेत भारताच्या अरूंधती चौधरीनं महिलांच्या ६६ किलो वजनी गटात उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर पुरूषांच्या ब्याण्णव किलो वजनी गटात नरेंदर बेरवाल याचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

नॉर्वे इथं सुरू असलेल्या बुद्घीबळ स्पर्धेत भारताच्या आर. प्रज्ञानंदने अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनचा तिसऱ्या फेरीत पराभव केला. प्रज्ञानंद आता पाच पूर्णांक पाच गुणांसह स्पर्धेत आघाडीवर आहे. 

****

 

 

No comments: