Wednesday, 29 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:29.05.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२९ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभा निवडणुकीच्या शनिवारी पार पडलेल्या सहाव्या टप्प्यातत ५८ मतदारसंघांमध्ये एकंदर सात कोटी पाच लाख ४४ हजार ९३३ मतदारांनी आपला हक्क बजावल्याचं, आणि ६३ पूर्णांक ३७ शतांश टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. सहाव्या टप्प्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा तीन टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती आयोगानं दिली आहे.

****

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात एक कोटी ४७ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरण्यांचं नियोजन कृषी विभागानं केलं आहे. शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू आहे. यंदाच्या हंगामासाठी आवश्यक बियाणे राज्यात उपलब्ध आहेत अशी माहिती संचालक विकास पाटील यांनी दिली.

****

छत्तीसगड राज्यात विविध चकमकींमध्ये सहभाग असलेल्या एका नक्षलवाद्यानं काल गडचिरोलीत केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. २०१७ मध्ये छत्तीसगडच्या मिरतूर आणि २०२२ मध्ये तिम्मेनार इथं झालेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. महाराष्ट्र शासनानं त्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं.

****

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या चार दिवसांमध्ये केलेल्या विविध कारवायांमध्ये एकूण १० किलो ६०० ग्रॅम सोनं आणि आठ कोटी ६८ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी उघडकीला आणली असून, ३ जणांना अटक केल्याचं सीमाशुल्क विभागानं काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या व्यतिरिक्त ३१ प्रकरणांमध्ये परदेशी चलन देखील जप्त केल्याचं यात म्हटलं आहे.

****

पालघर रेल्वे स्थानकावर काल मालगाडीचे डबे रुळावरुन घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. उपनगरीय रेल्वे सेवा संध्याकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत सुरळीत होईल, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी चार जणांची समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती, डीआरएम नीरज वर्मा यांनी दिली.

****

भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं स्टॅव्हॅन्गर इथं सुरु असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या फेरीत फ्रान्सच्या फिरोझा अलिरेझाला पराभूत केलं. पहिल्या फेरीनंतर प्रज्ञानंद सह कार्लसन आणि नाकामुरा दीड अंकांसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत.

****

No comments: