Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ राज्यांमधल्या ५८ मतदारसंघात आज मतदान होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधल्या १४, हरियाणा दहा, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी आठ, दिल्ली सात, ओडिशा सहा, झारखंड चार, तर जम्मू काश्मीरमधल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे. ओडिशा इथं विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदानही आज होत आहे. या सर्व ठिकाणी सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाली.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, मनोहर लाल खट्टर, संबित पात्रा, बांसुरी स्वराज, मनोज तिवारी आणि काँग्रेसचे दीपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी शैलजा, राज बब्बर, कन्हैय्या कुमार, समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव आणि पी.डी.पीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्यासह अनेकांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल.
या सहाव्या टप्प्यात १ लाख १४ हजार मतदान केंद्रांवर ११ कोटी १३ लाखांहून अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.
दरम्यान, ११ वाजेपर्यंत सहव्या टप्प्यात सर्व ठिकाणी सरासरी २६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सुमारे ३७ टक्के, उत्तर प्रदेश २७, झारखंड २८, बिहार २४, जम्मू काश्मिर २३, दिल्लीत २२, हरियाणा २२ तर ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी २१ टक्के मतदान झालं आहे.
***
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं.
यावेळी मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, मनपा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जो शी यांचंसह सर्व प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
****
पुण्यातील कल्याणीनगर वाहन अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांच्यासह सहा जणांना सात जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी काल दिले. या सहा जणांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. विशाल अगरवाल यांच्यासह बारमालक, व्यवस्थापक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. अल्पवयीन मुलाला आधीच बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. विशाल अगरवालवर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणं, आणि पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना, नोंद झाल्याची खोटी माहिती देणं, असे आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी या २ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना न दिल्याचा ठपका ठेवत या दोघांचं निलंबन करण्यात आलं आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि धाराशिव इंथल्या उपकेंद्रातील विभागात प्रवेशासाठी प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा अर्थात सीईटी घेण्यात येणार आहे. या सीईटीच्या नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र, सीईटी परीक्षेच्या नोंदणीसाठी आता ३० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या गावामध्ये चारा टंचाई किंवा पाणी टंचाईची समस्या भासत असल्यास या बाबतची लेखी माहिती संबंधीत तहसीलदार यांच्याकडे सादर करावी असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे. अश्या प्रकरणात ५ दिवसात चौकशी करुन आवश्यक ती उपाययोजना करण्याकरीता निर्णय घेण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागाच्या बि.टेक. अभ्यासक्रमाला राष्ट्रीय मान्यता मंडळ अर्थात एनबीएनं तीन वर्षासाठी काल मानांकन जाहीर केलं. एनबीएचं मानांकन मिळविणारा केमिकल टेक्नॉलॉजी हा विद्यापीठातील पहिलाच विभाग ठरला असल्याचं विभागप्रमुख डॉ. भगवान साखळे यांनी कळविलं आहे.
****
रस्ते अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना राबवण्यावर भर द्यावा, तसंच वाहनचालक आणि अल्पवयीन मुलांचे पालक यांचंही यासंदर्भात उद्बोधन करावं, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत काल दिले.
रस्ते अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यात एकात्मिक वाहतुक व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत २७ ठिकाणी कॅमेरे लावण्यात येत आहेत. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
****
No comments:
Post a Comment