Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 May 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम
· लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला-अखेरच्या टप्प्यात उद्या मतदान
· काँग्रेस पक्षाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला आज छत्रपती संभाजीनगर इथून प्रारंभ
· लैंगिक शोषण प्रकरणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचा खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला अटक
आणि
· नैर्ऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल-पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल
सविस्तर बातम्या
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचं, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. आचारसंहिता शिथील होण्याच्या शक्यतेसंदर्भातल्या काही बातम्या माध्यमांवरून प्रसारित होत होत्या, त्या पार्श्वभूमीवर आयोगानं ही बाब स्पष्ट केली. अत्यंत तातडीच्या असलेल्या प्रकरणांना आचारसंहितेत सूट देण्यासंदर्भात निवडणूक आयोगास शिफारस करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने शिफारस केलेल्या ५९ प्रस्तावांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत निर्णय दिला असल्याचं, या बातमीत म्हटलं आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि कोकण विभागात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार काल संपला. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यामध्ये पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या प्रत्येकी १३, पश्चिम बंगाल नऊ, बिहार आठ, ओडिशा सहा, हिमाचल प्रदेश चार, झारखंड तीन, तर चंदीगढमधल्या एका जागेचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या चार जून रोजी होईल. आंध्रप्रदेश आणि ओडिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील चार जून रोजी होणार असून, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी परवा दोन जून रोजी होणार आहे.
****
दरम्यान, मतदानाच्या टक्केवारीत झालेल्या वाढीसंदर्भात पसरलेल्या अफवांचं निवडणूक आयोगानं खंडन केलं आहे. मतदानाच्या नोंदी असलेल्या फॉर्म -१७ सी ची प्रत उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना दिलेली असते, त्यामुळे कुणीही टक्केवारीत वाढ करु शकत नाही, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आकाशवाणीशी बोलताना स्पष्ट केलं.
****
राज्य सरकारच्या विविध विभागातली ५२४ रिक्त पदं भरण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४, येत्या २१ जुलैला होणार आहे. आयोगानं काल याबाबतचं पत्रक प्रसिद्ध केलं. या आधीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा येत्या ६ जुलैला होणार होती.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका आणि इतर संबंधित प्रमाणपत्राचं वाटप येत्या सोमवारी केलं जाणार आहे. या संदर्भातलं परिपत्रक राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्ध केलं.
****
राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालय देशात सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल, राज्यपाल बैस यांच्या हस्ते काल या संचालनालयाचा 'राज्यपालांचे प्रशस्तीपत्र' प्रदान करण्यात आलं. एनसीसी प्रशिक्षण सर्वांसाठी अनिवार्य केलं तर तो एक चांगला निर्णय ठरेल, असं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
लैंगिक शोषणाचे आरोप असलेला धर्मनिरपेक्ष जनता दलाचा खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याला आज पहाटे बंगळुरु विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं. रेवण्णा यांच्या भारतात परत येण्याबद्दल इंटरपोलनं माहिती दिल्यानंतर कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकानं त्याला तत्काळ अटक केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
काँग्रेस पक्षाचा राज्याचा दुष्काळ पाहणी दौरा आजपासून छत्रपती संभाजीनगर इथून सुरु होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा दौरा सुरू होणार आहे.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं बोलताना दुष्काळाच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली. जनावरांना दावणीपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, बँकाकडून सुरू असलेली कर्जवसुली थांबवण्यात यावी, आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या. शेतकऱ्यांना मोफत वीज, बियाणे, खते उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधलं.
वडेट्टीवार यांनी काल जालना जिल्ह्यातही दुष्काळी भागाची पाहणी केली. दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांकडे शासनाचं सपशेल दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
****
जागतिक तंबाखूविरोधी दिन आज पाळण्यात येत आहे. तंबाखू सेवन करणाऱ्यांनी, तंबाखू न खाण्याची शपथ घ्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर दयानंद मोतीपवळ यांनी केलं आहे.
तंबाखू सेवनाने गंभीर स्वरुपाचे आजार होतात. त्याच्यामध्ये रक्तदाब आहे, उच्चदाब आहे, ह्रदयविकार आहे, कर्करोग आहे. १३ ते १५ वर्ष वयोगटातले ३० टक्के मुलं हे घरीच तंबाखुचं सेवन करतात, असं आढळलं. ज्यांना कोणाला तंबाखू सोडायची आहे, त्यांनी टोल फ्री क्रमांक आहे, 1800112356. याच्यावर जर आपण फोन केला, तर त्याच्याकडून लगेचच आपल्याला प्रतिसाद मिळतो. जिल्हा स्तरावर तंबाखू नियंत्रण पथक आहे, त्यांच्याकडे जाऊन समूपदेशन करुन तंबाखू सोडायला मदत होते.
****
नैर्ऋत्य मोसमी पाऊस काल नेहमीपेक्षा दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कर्नाटक, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं, हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं.
दरम्यान, देशाच्या वायव्य प्रांतातली तीव्र उष्णतेची लाट कालपासून ओसरत आहे. तसंच पश्चिमेकडच्या जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात येत्या दोन जून पर्यंत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं मोहपात्रा यांनी सांगितलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या एक हजार १०२ पाणी नमुन्यांपैकी २३४ नमुने दूषित असल्याचं आढळलं आहे. जिल्ह्यातल्या ६२२ पैकी १९६ ग्रामपंचायतींना जिल्हा आरोग्य प्रशासनानं पिवळे कार्ड दिलं असून, पाण्यासंबंधी दक्षता घेण्याची सूचना नागरिकांना केली आहे.
****
छत्रपती संभाजनगर इंथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा ना. वि. देशपांडे ग्रंथभेट पुरस्कार, यंदा जिंतूर तालुक्यातल्या, बोरी इथल्या जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाला जाहीर करण्यात आला आहे. ग्रंथभेट योजनेतली पंचवीस हजार रुपयांची पुस्तकं आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार प्रदान समारंभ, उद्या शनिवारी, बोरी मध्ये वाचनालय परिसरात होणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातला एकही शेतकरी खरीप पिक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. धाराशिव इथं काल आगामी खरीप हंगामाच्या पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत ते बोलत होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँकांनी गावनिहाय शिबिराचं आयोजन करून शेतकऱ्यांकडून कागदपत्राची पूर्तता करावी, असं त्यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेच्या कामांना अद्याप अपेक्षित गती आलेली नसून, अशा कामांना गती देण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. पाणी टंचाई उपाययोजना आणि जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या काल बोलत होत्या.
दरम्यान, लातूर इथं लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन इथं होणार असून, याठिकाणी तयारीचा आढावा जिल्हाधिकार्यांनी काल घेतला.
****
जालना जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जबाबदारी आणि निष्ठेने आपापली कामं करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली आहे.
****
धाराशिव तालुक्यात एका पोलीस पाटलाच्या नूतनीकरणाच्या प्रकरणात पोलीस निरीक्षक नागरगोजे यांनी दाखल केलेला गुन्हा हा बेकायदेशीर असून, संबंधित पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकार्यावर प्रशासकीय कारवाई करून त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. कोणतीही कायदेशीर बाबींची शहानिशा न करता तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना बेकायदेशीर केलेली अटक या विरोधात महसूल विभागातल्या कर्मचार्यांनी काल सलग दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन केलं. त्यामुळे जिल्ह्यात महसूल विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात २४ ते २६ मे दरम्यान वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे शासनानं तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकरी कुटुंबांना मदत करावी अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे. ते काल धाराशिव जिल्ह्यातल्या सांगवी, कामेगाव, दाऊपूर, भंडारवाडी या भागाला दिलेल्या भेटीनंतर बोलत होते. शासनानं निकष बाजूला ठेवून मदत करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
****
थकित मालमत्ता करापोटी लातूर महापालिकेनं काल सहा गाळ्यांना सील ठोकलं असून, एका दिवसात पाच लाख रुपयांचा करही वसूल केला आहे. शहरातल्या व्यापारी संकुलात असणाऱ्या ज्या गाळेधारकांकडे थकबाकी आहे त्यांनी थकबाकी भरावी, अन्यथा कारवाईचा इशारा महापालिका उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी दिला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात जिंतूर जवळ खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस जोधपूरहून हैदराबादकडे जात होती. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
****
No comments:
Post a Comment