Thursday, 23 May 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २३ मे २०२४ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 23 May 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार आहे. या टप्प्यात ८ राज्यांतील ५८ जागांसाठी परवा २५ तारखेला मतदान होणार आहे. यात बिहारच्या ८, हरियाणा १०, जम्मू काश्मिर १, झारखंड ४, दिल्लीतल्या ७, ओडिशा ६, उत्तर प्रदेश १४ आणि पश्चिम बंगालमधल्या ८ जागांचा समावेश आहे. या ५८ जागांसाठी एकोणनव्वद उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

****

पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाला जामीन देण्याचा निर्णय बाल न्याय मंडळाने रद्द केला असून त्याला पाच जूनपर्यंत बालनिरीक्षणगृहात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तत्पूर्वी, या प्रकरणात नव्या कायद्याच्या आधारे अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करण्यात आला होता. या निर्णयाला जनतेतून विरोध झाला, त्यानंतर अल्पवयीन मुलाला समुपदेशनासाठी बालनिरीक्षणगृहात पाठवण्याबाबत पुणे पोलिसांनी बाल न्यायमंडळाकडे अर्ज केला होता. 

****

उजनी जलाशयात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील सर्व सहा मृतदेह आज राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या हाती लागले आहेत. तीन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा मृतात समावेश आहे. गेल्या २१ तारखेला ही दुर्घटना घडली तेव्हा एकज पोहून किनारी आला होता. गेले दोन दिवस राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांची या जलाशयात शोधमोहीम सुरु होती. दुर्घटनेनंतर ४६ तासांनी हे मृतदेह सापडले.

****

मुंबईत घाटकोपर इथं महाकाय फलक कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी परवाना विभाग तसंच अतिक्रमण विभागाला सतर्क होऊन अनधिकृत होर्डींगविरोधी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, संबंधित विभागानं अनधिकृत होर्डिंग विरोधात धडक कारवाई करत आतापर्यंत मुंबईतल्या ३४ होर्डींग्जवर निष्कासनाची कारवाई केली आहे.

****

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचं आज पहाटे कोल्हापूर इथं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेले नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी पाटील यांची ओळख होती. जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व आपण गमावलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

****

पश्चिम बंगाल सरकारनं २०१० नंतर जारी केलेली इतर मागासवर्ग-ओबीसीची सर्व प्रमाणपत्र कोलकाता उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहेत. ओबीसी प्रमाण-पत्र जारी करण्याच्या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं २०१० नंतर तयार करण्यात आलेल्या ओबीसी सूचीला बेकायदेशीर ठरवलं. न्‍यायालयाने पश्चिम बंगाल मागासवर्ग आयोगाला पश्चिम बंगाल मागासवर्ग आयोग अधिनियम १९९३ च्या आधारे ओबीसीची नवीन यादी तयार करण्याचे निर्देशही दिले आहेत. जे मागासवर्गीय आधीपासून सेवेत आहेत, आरक्षणाचे लाभार्थी आहेत किंवा राज्य भरती प्रक्रियेत यशस्वी म्हणून घोषित करण्यात आले आहेत त्यांच्या सेवेवर या निर्णयामुळे कोणताही परिणाम होणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 

****

येत्या दोन दिवसात राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून राज्यात काल सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक चार, बीड ४३ पूर्णांक एक, तर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथं ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियममध्ये, साखळी सामन्यात अर्जेंटीनाचा ५-४ अश्या गुणांनी पराभव केला. या सामन्याचा निर्णय शूटआउट नंतर झाला. या शुटआऊट मध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले तर अभिषेकने पाचवा गोल केला. उद्या पुरुष हॉकी संघाचा सामना यजमान बेल्जियमशी होणार आहे.

दरम्यान भारतीय महिला हॉकी संघाला यरोपीय दौऱ्याच्या पहिल्या साखळी सामन्यात  अर्जेंटीनाकडून शून्य-पाच अश्या फरकाने पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॅकी संघाचा सामना  आज बेल्जियमशी होणार आहे.

****

No comments: