Wednesday, 1 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:01.05.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date: 01 May 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

महाराष्ट्र दिन आज साजरा होत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून, आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. देशात सध्या लोकसभेसाठी निवडणुका सुरू आहेत, लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

दरम्यान, महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातल्या नागरीकांना उद्देशून दिलेल्या संदेशात राज्यपालांनी, देशाचं आर्थिक शक्तीस्थान असलेल्या महाराष्ट्रानं देशाच्या पायाभूत विकासात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं सांगितलं. 

****

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, तर नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

मराठवाड्यातही महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयं, तसंच इतर शासकी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण झालं.

छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी २८ पोलीस अधिकारी कर्मचार्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत नागरीकांनी आवर्जुन मतदान करुन लोकशाही समृद्ध करावी, असं आवाहन आर्दड यांनी केलं.

****

जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजरोहण झालं. यावेळी त्यांनी परेड निरीक्षण करून जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जालना इथल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी सहा जणांना पोलीस महासंचालक पदानं सन्मानित करण्यात आलं.

****

लातूर इथं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचं योगदान मोठं असून, भविष्यातही प्रगतीची नवनवीन शिखरे सर करण्याचा निश्चय आजच्या महाराष्ट्र दिनी करूया, असं बनसोडे यावेळी म्हणाले.

****

धाराशिव इथं पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या, तसंच संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.

****

नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. १०७ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, त्यांच्या योगदानामुळेच आपण आज समृद्ध जीवन जगत आहोत, असं सांगून त्यांनी जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

****

परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. आपल्या भाषणातून त्यांनी सर्व जनतेला महारष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाचं पथसंचलन झालं, तसंच उत्कृष्ट तलाठी पुरस्कार, लोकसभा निवडणुकीत जनजागृती करण्यासाठी रील्स स्पर्धा आणि मतदानाची गुढी या स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्र मनी यांच्या हस्ते ध्वारोहण करण्यात आलं.

पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक शेख महेबूब शेख महेमूद यांच्यासह सहा जणांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

****

बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आणखी तीन उमेदवारांची आज घोषणा केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना, कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना, तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

मतदार जनजागृतीसाठी आज नाशिक इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्य सादर करुन नागरीकांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

****

नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज नांदेड इथून संध्याकाळी सहा वाजता सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.

****

No comments: