Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
· बारावीचा निकाल ९३ पूर्णांक ३७ टक्के-छत्रपती संभाजीनगरची तनिषा बोरामणीकर हिचा वाणिज्य शाखेत राज्यात प्रथम क्रमांक.
· छत्रपती संभाजीनगर विभागातून ९४ टक्के, तर लातूर विभागातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.
· पुण्यात दोन जणांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत अल्पवयीन चालकाच्या पित्यास छत्रपती संभाजीनगरातून अटक.
आणि
· मराठवाड्यासह राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला. या परीक्षेत यंदा ९३ पूर्णांक ३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी ९५ पूर्णांक ४४ इतकी आहे, तर ९१ पूर्णांक ६० टक्के इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७ पूर्णांक ५१ टक्के इतका लागला असून, सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९१ पूर्णांक ९५ टक्के इतका आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ९४ पूर्णांक शून्य आठ टक्के, तर लातूर विभागाचा निकाल ९२ पूर्णांक ३६ टक्के इतका लागला आहे. त्याशिवाय पुणे विभागाचा ९४ पूर्णांक ४४, नागपूर ९३ पूर्णांक १२, कोल्हापूर ९४ पूर्णांक २४, अमरावती ९३, तर नाशिक विभागाचा ९४ पूर्णांक ७१ टक्के निकाल लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयातली विद्यार्थीनी तनिषा सागर बोरामणीकर हिने वाणिज्य शाखेत ६०० पैकी ६०० गुण घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे
छत्रपती संभाजीनगर विभागात इयत्ता बारावीच्या निकालात बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर असून या जिल्ह्याचा निकाल ९५ पूर्णांक सत्तर टक्के इतका लागला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा निकाल ९४ पूर्णांक ७१ टक्के, हिंगोलीचा ९४ पूर्णांक ०८टक्के, तर परभणी जिल्ह्याचा निकाल ९० पूर्णांक ४२ टक्के इतका लागला आहे.
लातूर विभागात लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक म्हणजे ९२ पूर्णांक एकोणचाळीस टक्के निकाल लागला असून, धाराशिव जिल्ह्याचा निकाल ८९ पूर्णांक ७८ टक्के तर नांदेड जिल्ह्याचा निकाल ८९ पूर्णांक ७४ टक्के लागला आहे.
हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी पाच जूनपर्यंत सशुल्क ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं असून, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, या परीक्षेत यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीनं पुन्हा सुरुवात करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
****
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियांना येत्या एक जून पासून सुरुवात होणार आहे, कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी ही माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी पारंपारिक अभ्यासक्रमांसोबतच रोजगाराभिमुख असे अनेक नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या उद्योग कंपन्यांशी सामंजस्य करार करून, कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमांसह व्हॅल्यू ॲडेड अभ्यासक्रम राबवले जाणार असल्याचं कुलगुरू चासकर यांनी सांगितलं.
****
पुण्यात भरधाव कार चालवून दोन तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील, विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर इथून अटक करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक असलेले अग्रवाल छत्रपती संभाजीनगर इथं असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार स्थानिक पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातल्या एका लॉजमधून अग्रवाल यांना तर शहराच्या मध्यवर्ती भागातल्या अन्य एका लॉजमधून त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करून पुणे पोलिसांकडे सोपवलं.
दरम्यान, अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बार मालक आणि मॅनेजरला देखील ताब्यात घेतलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन या अपघात प्रकरणाचा आढावा घेतला, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत, सदर आरोपी १७ वर्ष आठ महिने वयाचा असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. या आरोपीचा वयस्क म्हणून विचार करण्यासंदर्भात बालहक्क आयोगात दाद मागणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आयोगाचा एकदोन दिवसांत निर्णय येऊन सदर आरोपीचा रिमांड मिळेल, अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आज दहशतवाद विरोधी दिवस पाळण्यात आला. २१ मे १९९१ रोजी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम या दहशतवादी संघटनेनं तामिळनाडूमधल्या श्रीपेरुम्बुदूर इथं केलेल्या बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांचं निधन झालं होतं. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना अभिवादन केलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या राजघाट इथल्या वीर भूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळावर त्यांना आदरांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
मुंबईत मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी रोशनी कदम पाटील यांनी दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली.
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या उपस्थितीत राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना दहशतावाद तसंच हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ देण्यात आली.
****
राज्यात येत्या तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात वरुड चक्रपाण शिवारात आज दुपारी साडेतीनच्या सुमाराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, घरावरचे पत्रे उडाले आणि काही ठिकाणी विद्युत खांबही कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसात खामगाव तालुक्यातल्या पळशी इथे अंगावर वीज कोसळून भगवान धानोरकर या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईचं काम एप्रिल महिन्यापासून सुरू झालेलं असून आतापर्यंत सुमारे पंचाहत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांनी, नागरिकांच्या याबाबतीतल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या नागरिकांना नालेसफाईच्या कामाबाबत तक्रार नोंदवायची असेल त्यांनी ती नियंत्रण कक्षाच्या ८५ ५१ ०५ ८० ८० या भ्रमणध्वनी क्रमांकावर नोंदवावी असं आवाहन कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी केलं आहे.
****
येत्या खरीप हंगामात लातूर जिल्ह्यात बियाणं, खतं, कीटकनाशकं इत्यादि कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता आणि दर्जाबाबतच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी अकरा तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती लातूरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्हा स्तरावरच्या नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४ ०४ ५० ५६ २० हा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
****
जपान मध्ये सुरू असलेल्या जागतिक पॅराॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताच्या एकता भयाननं क्लब थ्रो या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताच्याच कशिश लाकडानं रजत पदक जिंकलं. या स्पर्धा येत्या पंचवीस तारखेपर्यंत चालणार आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज प्लेऑफसाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबाद इथं संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
****
कल्पकतेच्या माध्यमातून समाजातल्या सभ्यतेला जपणं, हेच लेखकाचं सर्वश्रेष्ठ काम आहे, असं प्रतिपादन प्रसिद्ध लेखक कृष्णात खोत यांनी केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या परभणी शाखेनं दिवंगत कादंबरीकार भारत काळे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्तानं आयोजित केलेल्या 'मी आणि माझे कादंबरी लेखन'या विषयावरील व्याख्यानात ते आज परभणी इथे बोलत होते.
****
No comments:
Post a Comment