Wednesday, 22 May 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.05.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 May 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ मे २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसंच प्रचारकांनी सभ्यतेचं पालन करण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना. 

·      कोरोना विषाणूच्या केपी २ या नवीन उपप्रकाराचे पुण्यात सर्वाधिक ५१ रुग्ण.

·      छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास क्षेत्रात अनधिकृत विकास कामं प्रकरणी फौजदारी कारवाईचे विभागीय आयुक्तांचे निर्देश.

आणि

·      बीड जिल्ह्याच्या वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई तालुक्यांत गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर.

****

लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसंच प्रचारकांनी सभ्यतेचं पालन करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. भारतीय जनता पक्ष तसंच काँग्रेस पक्षानं परस्परांविरोधात दाखल केलेल्या तक्रारींच्या संदर्भात आयोगानं दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. आचारसंहिंता भंग होईल, अशी विधानं कोणी करू नयेत, यासाठी आपल्या पक्षांच्या प्रचारकांसाठी औपचारिक सूचना जारी करण्याचे निर्देश आयोगाने या पत्रात दिले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी येत्या २५ मे रोजी तर सातव्या टप्प्यासाठी येत्या एक जून रोजी मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यात देशभरातल्या आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५८ मतदार संघात तर सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातही आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५७ मतदार संघात मतदान होणार आहे. निवडणुकीतल्या सर्व टप्प्यातल्या मतदानाची चार जून रोजी मोजणी होणार आहे.

****

पुणे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलांना मद्य पुरवल्याप्रकरणी पुणे शहरातले हॉटेल, ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड, आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर मॅरियट सूट- ब्लॅक, या दोन्ही हॉटेल आणि परमिट रूम, तसंच पबचे आस्थापनाविषयक व्यवहार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ प्रभावाने बंद केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं पुणे शहरातल्या सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये, मध्यरात्री दीड वाजेनंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये, महिला वेटर्समार्फत रात्री साडे नऊ नंतर कोणतीही विदेशी दारू पुरवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

****

मुंबईतल्या घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विशेष तपास पथक - एसआयटीची स्थापना केली आहे. या पथकामध्ये एकूण सहा अधिकारी असतील. एसआईटी चमूने मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या घरी शोध मोहीम हाती घेतली आणि होर्डिंग कराराशी संबंधित काही महत्वपूर्ण कागदपत्रं ताब्यात घेतली. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते.

****

कोरोना विषाणूच्या केपी २ या नवीन उपप्रकाराचे सर्वाधिक ५१ रुग्ण पुणे जिल्हयात आढळून आले आहेत. हा जेएन-१ व्हेरियंटचा उपप्रकार आहे. सध्याच्या रूग्णांच्या नमुन्याचे जिनोम सिक्वेन्सिकग केले असता ७० टक्के नमुने केपी २ पॉझिटिव्ह आढळून आले ओहत. कोरोना विषाणूच्या संसंर्गाविरूध्द प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनाही या नव्या उपप्रकाराचा संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती या विभागाचे राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आज कोविडचे दोन नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये एक पुरुष तर एका महिला रुग्णाचा समावेश आहे.

****

यंदाच्या खरीप हंगामात ४८ लाख टन खत पुरवठ्याचं नियोजन प्रस्तावित करण्यात आलं आहे. कृषी संचालक विकास पाटील यांनी ही माहिती दिली. युरिया आणि डीएपी या खतांचा साठा संरक्षित कऱण्याचा निर्णय शासनानं घेतला असून, या खतांच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे युरिया खताच्या ४५ किलो गोणीची किंमत २६६ रूपये ५० पैसै असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव इथल्या द सहकारी संस्था पिंपळगाव या धान खरेदी केंद्रात जे शेतकरीच नाहीत अशा नागरिकांचे बोगस सातबारा काढून त्यांना ऑनलाइन बोनस देण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. एकट्या पिंपळगाव धान खरेदी केंद्रावर २५ बोगस शेतकरी आढळून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बुद्धपौर्णिमा उद्या साजरी होत आहे. यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास क्षेत्रात अनधिकृत विकास कामांच्या प्रकरणात फौजदारी कारवाईसंदर्भात विभागीय आयुक्त मधुकर राजेआर्दड यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निर्देश दिले आहेत. अशा प्रकारात सामील विकासक, त्यांना मदत करणारे सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर फौजदारी कार्यवाही आवश्यक असल्याचं, त्यांनी याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे. अशी प्रकरणं तपासून, फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेशित करावे तसंच याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी सादर करावा, असंही या पत्रात नमूद आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ तर  बीड, गेवराई, शिरुर, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातील महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली असून या भागांना विविध सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४३ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ३४६ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली. पाणी तसंच चारा टंचाई भासणाऱ्या गावांनी संबंधित तहसीलदार कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे...

जिल्हाभरामध्ये सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने एकूण ६७८ टँकरद्वारे जवळजवळ ४१२ गावं आणि ६१ वाड्या यांना ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरु आहे. जवळजवळ २८५ गावांसाठी ३४६ विहिरींचं अधिग्रहण केलेलं आहे. या सर्व सुविधेनंतरही काही गावांमध्ये पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या तीन दिवसांमध्ये तहसीलदाराकडे एक रितसर निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा. वस्तुस्थितीदर्शक तो अहवाल किंवा मागणी असली पाहिजे. कुठलाही नागरिक, कुठल्याही गावातील व्यक्ती पाणी पुरवठ्यावाचून वंचीत राहणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतो आहोत.

****

बार्शी इथं एका तरुणाकडून पोलिसांनी गावठी बनावटीचं एक पिस्तुल आणि दोन काडतुसं जप्त केली आहेत. भूम इथं राहणारा आकाश गाडे नावाचा हा युवक, बार्शी-लातूर रस्त्यावर संशयितरित्या थांबल्याचं पोलिसांच्या गस्ती पथकाला दिसला. पोलिसांना पाहताच तो पळून जात असतांना त्याला पकडून झडती घेतली असता, त्याच्याजवळ परवाना नसलेलं पिस्तुल आणि दोन काडतुसं आढळली. या तरुणाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सुरतहून धुळ्याकडे येणाऱ्या एका खासगी बस चालकाला चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या दोन संशयितांना धुळे शहर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना पोलिसांनी एका पडक्या शाळेच्या आवारातून औषधांचा नशा करतांना रंगेहाथ पकडलं. या कारवाईत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा आणि दुचाकीसह एकूण ५८ हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

****

जालना जिल्ह्यातल्या मंठा इथल्या पंचायत समितीमधल्या एका कंत्राटी अभियंत्याला गाय गोठ्याच्या बांधकाम अनुदानाची रक्कम देण्याकरिता पाच हजार रुपये लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं आज रंगेहाथ पकडलं. महेश बोराडे असं या अभियंत्याचं नाव असून त्यानं तक्रारदाराकडे गोठा बांधकाम अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम देण्याकरिता ७ हजार रुपयांची मागणी केली होती.

****

छत्रपती संभाजीनगर इथली १२वी ची गुणवंत विद्यार्थिनी तनिषा बोरामणीकर हिचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सत्कार केला. देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थिनी असलेल्या तनिषा हिने वाणिज्य शाखेत ६०० पैकी ६०० गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला, या यशाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी तिचं कौतुक केलं. तनिषाचे पालक, शिक्षक तसंच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

महाराष्ट्र खो खो संघटनेच्या स्वीकृत उपाध्यक्षपदी लातूर जिल्ह्यातील औसा इथले आमदार अभिमन्यू पवार यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे सरचिटणीस चंद्रजीत जाधव यांनी आज पुणे इथं संघटनेच्या कार्यकारिणीसह विविध समित्यांची घोषणा केली. या सर्व समित्या २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी काम पाहाणार आहे.

****

No comments: