Wednesday, 22 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:22.05.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 22 May 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २२ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      बारावीचा निकाल ९३ टक्के-छत्रपती संभाजीनगरच्या तनिषा बोरामणीकर हिचा वाणिज्य शाखेत राज्यात प्रथम क्रमांक

·      पुण्यात दोन जणांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत अल्पवयीन चालकाच्या पित्यास छत्रपती संभाजीनगरातून अटक-मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे निर्देश

·      नाशिकच्या भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू-सोलापूरच्या उजनी धरणात नाव उलटून सात जण बेपत्ता

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाची अंतिम फेरीत धडक

सविस्तर बातम्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं, फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल, काल जाहीर झाला. या परीक्षेत यंदा ९३ पूर्णांक ३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक असून, त्याची टक्केवारी ९५ पूर्णांक ४४ इतकी आहे, तर ९१ पूर्णांक ६० टक्के इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७ पूर्णांक ५१ टक्के इतका लागला असून, सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९१ पूर्णांक ९५ टक्के इतका लागला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ९४ पूर्णांक शून्य आठ टक्के, तर लातूर विभागाचा निकाल ९२ पूर्णांक ३६ टक्के इतका लागला आहे.

छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयातली विद्यार्थीनी तनिषा सागर बोरामणीकर हिनं वाणिज्य शाखेत ६०० पैकी ६०० गुण घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

 

छत्रपती संभाजीनगर विभागात इयत्ता बारावीच्या निकालात बीड जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९५ पूर्णांक सत्तर टक्के, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा निकाल प्रत्येकी ९४ पूर्णांक ७१ टक्के, हिंगोली ९४ पूर्णांक शून्य आठ टक्के, तर परभणी जिल्ह्याचा निकाल ९० पूर्णांक ४२ टक्के इतका लागला आहे.

लातूर विभागात लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक म्हणजे ९२ पूर्णांक एकोणचाळीस टक्के निकाल लागला असून, धाराशिव जिल्ह्याचा निकाल ८९ पूर्णांक ७८ टक्के, तर नांदेड जिल्ह्याचा निकाल ८९ पूर्णांक ७४ टक्के लागला आहे.

बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं असून, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, इतर विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीनं पुन्हा सुरुवात करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियांना येत्या एक जून पासून सुरुवात होणार आहे. कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी काल ही माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी पारंपारिक अभ्यासक्रमांसोबतच रोजगाराभिमुख असे अनेक नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या उद्योग कंपन्यांशी सामंजस्य करार करून, कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमांसह, व्हॅल्यू ॲडेड अभ्यासक्रम राबवले जाणार असल्याचं कुलगुरू चासकर यांनी सांगितलं.

****

पुण्यात भरधाव कार चालवून दोन तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील, विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर इथून अटक करण्यात आली. बांधकाम व्यावसायिक असलेले अग्रवाल छत्रपती संभाजीनगर इथं असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार स्थानिक पोलिसांनी मंगळवारी पहाटेपूर्वी रेल्वेस्थानक परिसरातल्या एका लॉजमधून अग्रवाल यांना, तर शहराच्या मध्यवर्ती भागातल्या अन्य एका लॉजमधून त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करून पुणे पोलिसांकडे सोपवलं. तिन्ही आरोपींना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बार मालक आणि मॅनेजरला देखील ताब्यात घेतलं आहे.

याप्रकरणी कुणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन या अपघात प्रकरणाचा आढावा घेतला, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत, अपघातग्रस्त कार चालवणाऱ्या १७ वर्ष आठ महिने वय असलेल्या या आरोपीचा सज्ञान म्हणून विचार करण्यासंदर्भात बालहक्क आयोगात दाद मागणार असल्याचं सांगितलं. सुधारित बालगुन्हेगारी कायद्यातल्या तरतुदींनुसार पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन आरोपीवर कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, कारवाईचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. आरोपीला सज्ञान समजून सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यासाठी पुणे पोलिसांची सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

****

म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतल्या, विविध गृहनिर्माण योजनांमधल्या, एक हजार ४९५ सदनिका आणि भूखंडांच्या विक्रीसाठीच्या, ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी, अर्ज करण्याची मुदत सव्वीस मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव इथल्या गृहनिर्माण योजनांचा समावेश आहे. म्हाडाच्या हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर सोडतीबाबतची संपूर्ण माहिती आणि अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.

****

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या भावली धरणाजवळ सहलीसाठी आलेल्या पाच जणांचा काल धरणात बुडून मृत्यू झाला. यात तीन युवती आणि दोन युवकांचा समावेश आहे. हे सर्व मृतदेह काल बाहेर काढण्यात आले. भावली धरणावर मार्गदर्शक नियमावली आणि सावधानी घेण्याबाबतचे फलक लावावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.  

****

सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणात प्रवासी वाहतूक करणारी नाव उलटून सात जण बेपत्ता झाले. इंदापूर तालुक्यातल्या कळाशी इथून करमाळा तालुक्यातल्या कुगावकडे ही बोट प्रवास करत होती. एका प्रवाशाने पोहत आपला जीव वाचवला असून, इतरांचा शोध सुरु आहे.

****

राज्यात येत्या तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसपडण्याचं अंदाज आहे.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात वरुड चक्रपाण शिवारात काल दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, घरावरचे पत्रे उडाले आणि काही ठिकाणी विद्युत खांबही कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

येत्या खरीप हंगामात लातूर जिल्ह्यात बियाणं, खतं, कीटकनाशकं इत्यादि कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता आणि दर्जाबाबतच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी अकरा तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा स्तरावरच्या नियंत्रण कक्षाशी ९४ ०४ ५० ५६ २० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

****

जपान मध्ये सुरू असलेल्या जागतिक पॅराॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एकता भयाननं क्लब थ्रो या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताच्याच कशिश लकडानं रौप्य पदक जिंकलं. मरियप्पन थंगावेलूनं उंच उडी टी 63 प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं, तर भालाफेक मध्ये सुमित अंतिलनं सुवर्ण पदकाची कमाई केली. या प्रकारात संदीपनं कांस्य पदक जिंकलं.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या पहिल्या उपान्त्य सामन्यात कोलकाताच्या संघाने सनरायजर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतला दुसरा उपान्त्य सामना आज अहमदाबाद इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स संघादरम्यान होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी खेळला जाणार आहे.

****

कल्पकतेच्या माध्यमातून समाजातल्या सभ्यतेला जपणं, हेच लेखकाचं सर्वश्रेष्ठ काम आहे, असं प्रतिपादन प्रसिद्ध लेखक कृष्णात खोत यांनी केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या परभणी शाखेनं दिवंगत कादंबरीकार भारत काळे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्तानं आयोजित केलेल्या, 'मी आणि माझे कादंबरी लेखन', या विषयावरील व्याख्यानात ते काल परभणी इथं बोलत होते. बी. रघुनाथ महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला, मसापच्या परभणी शाखेच्या अध्यक्ष सरोज देशपांडे, डॉ. आसाराम लोमटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या खडकत इथल्या अवैध कत्तलखान्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी या गावातून अहमदनगर जिल्ह्यात किंवा अहमदनगर जिल्ह्यातून खडकत या गावात पशु वाहतूक करण्याला पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी याबाबतचा आदेश जारी केला.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वेमार्गाच्या देखभालीच्या कामामुळे येत्या सोळा जूनपर्यंत काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे. त्यामध्ये नांदेड-मनमाड-नांदेड ही गाडी नांदेड ते पूर्णादरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. तर, नांदेड -मुंबई आणि नांदेड -अमृतसर या दोन गाड्या औरंगाबाद ते रोटेगाव दरम्यान अनुक्रमे चाळीस आणि पंचेचाळीस मिनिटं उशिरा धावणार आहेत.

****

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे उद्या गुरुवारी जालना दौऱ्यावर येत आहेत. गुरु गणेश तपोधाम परिसरात सुरू असलेल्या तेरापंथ समाजाच्या आचार्य महाश्रावणजी यांच्या दीक्षा महोत्सवाला ते उपस्थित राहणार आहेत. महेश भवन इथं आयोजित मारवाडी माहेश्वरी समाजातल्या काही तरुण उद्योजकांसोबत ते चर्चा आणि मार्गदर्शनही करणार आहेत.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 24 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...