आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२२ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
पशुसंवर्धन विभागानं पुढील दोन महिन्यांसाठी चारा नियोजन केलं असून, राज्यात चारा टंचाई भासणार नसल्याची ग्वाही, महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यात लोणी इथं ते काल प्रसार माध्यमांशी बोलत होते. चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन विभागातल्या अधिकाऱ्यांना चारा नियोजनाच्या सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा चारा उत्पादन करण्यासाठी शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना बियाणांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. तसंच शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या चाऱ्याचा दर शासनानं निश्चित केला असून, उत्पादीत झालेला संपूर्ण चारा खरेदी करण्याची हमी शासनानं घेतली असल्याचं, विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
पुणे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलांना दारू पुरवल्याप्रकरणी पुणे शहरातले हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल आणि परमिट रूम तसंच पबचे आस्थापनाविषयक व्यवहार जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ प्रभावाने बंद केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
****
यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान न केल्याबद्दल भाजपानं झारखंडमधल्या हजारीबाग मतदारसंघाचे विद्यमान खासदार जयंत सिन्हा यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सिन्हा यांनी मतदान न केल्यामुळं भाजपाची प्रतिमा मलीन झाली असल्याचं या नोटिशीत नमूद केलं आहे.
****
भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं नुकत्याच पार पडलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावल्यानंतर जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या क्रमवारीत पुन्हा अव्वलस्थानी झेप घेतली. या स्पर्धेच्या आधी ही जोडी तिसऱ्या क्रमांकावर होती. मात्र, उत्तम कामगिरीच्या जोरावर त्यांनी या स्पर्धेतले सर्व सामने थेट गेम्समध्ये जिंकले आणि जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान पुन्हा मिळवलं.
****
No comments:
Post a Comment