Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
· लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातला प्रचार आज संपला. शनिवारी आठ राज्यांतील ५८ मतदारसंघात मतदान.
· डोंबिवली एमआयडीसीत अमुदान रसायन कंपनीत भीषण स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू, २४ जण जखमी.
· राज्यात दोन दुर्घटनेत आठ जणांचा बुडून मृत्यू, तर उजनी जलाशयातल्या नौका दुर्घटनेतील सहा मृतदेह सापडले.
आणि
· मराठवाड्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातला प्रचार आज संपला. या टप्प्यात ८ राज्यांतील ५८ मतदारसंघात येत्या शनिवारी २५ तारखेला मतदान होणार आहे. यात बिहारच्या ८, हरियाणा १०, जम्मू काश्मिर १, झारखंड ४, दिल्लीतल्या ७, ओडिशा ६, उत्तर प्रदेश १४ आणि पश्चिम बंगालमधल्या ८ जागांचा समावेश आहे. या ५८ मतदारसंघांमध्ये एकोणनव्वद उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याखेरीज जम्मू काश्मीरमध्येही अनंतनाग-राजौरी मतदारसंघात शिल्लक राहिलेलं मतदान शनिवारी होणार आहे.
****
मराठवाड्याच्या दुष्काळासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं बैठक घेतली. पाणी पातळी वाढवण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. पाण्याचं नियोजन व्यवस्थित व्हावं, यासाठी सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात सध्या एक हजार २५० गावांमध्ये एक हजार ८३७ टँकर सुरु असून, टँकर्सची आवश्यकता भासली तर ग्रामसेवकांपर्यंत, तलाठ्यांपर्यंत सूचना दिलेल्या असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विभागातल्या सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री या बैठकीला उपस्थित होते.
****
ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या एमआयडीसीत अमुदान या रसायन कंपनीत भीषण स्फोट होऊन आग लागली. आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत चार कामगारांचा मृत्यू झाला. तर पाच महिलांसह २४ कामगार जखमी झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं दिली आहे.
या स्फोटामुळं एक ते दीड किलोमीटर परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून अग्निशमन दलाच्या बंबांद्वारे आग आटोक्यात आणली जात आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, कंपनीतील स्फोट झाल्याची घटना दु:खद असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत बचाव कार्य सुरु असताना राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील तीन जवान, दोन तरुण, आणि एक स्थानिक नागरीकांसह सहा जणांचा मृत्यू झाला. काल प्रवरा नदीत दोन मुलं बुडाल्यानंतर त्यांचा शोध आणि बचाव कार्याची मोहीम सुरु असताना ही घटना घडली. जवान कर्तव्यावर असताना पाण्याच्या भोवऱ्यात बोट अडकून उलटल्यानं हा अपघात झाला. यात धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, राहुल गोपिंचंद पावरा आणि वैभव सुनिल वाघ यांचा समावेश आहे. मृत जवानांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे धुळे इथं श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
****
उजनी जलाशयात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील सर्व सहा मृतदेह आज राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या हाती लागले आहेत. तीन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा मृतात समावेश आहे. गेल्या २१ तारखेला ही दुर्घटना घडली होती. दोन दिवसांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांची या जलाशयात शोधमोहीम सुरु होती. दुर्घटनेनंतर ४६ तासांनी हे मृतदेह सापडले.
****
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या बोरपाडा धरणात बेडकी इथल्या दोन सोळा वर्षीय मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. उज्वला जयंत्या गावित आणि मिखा सानू गावित अशी दोघींची नावं आहेत. गावालगतच्या बोरपाडा धरणाच्या किनारी त्या आज सकाळी आंघोळीला गेल्या, त्यावेळी ही घटना घडली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील वरवंडी इथं बिबट्यानं हल्ला केल्यानं एका चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. वेदिका श्रीकांत ढगे असं या मृत मुलीचं नाव आहे. मुलगी अंगणात खेळताना बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला होता.
****
मुंबईत घाटकोपर इथं महाकाय फलक कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नवी मुंबईत अनधिकृत फलकाविरोधात महानगरपालिकेकडून धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ३६ मोठे अनाधिकृत फलक काढण्यात आले असून कोल्हापूर, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातही सर्वेक्षणानंतर ३१ अवैध फलक अतिक्रमण विभागाकडून काढण्याचं काम सुरू आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचं आज पहाटे कोल्हापूर इथं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. आमदार पाटील यांच्या पार्थिवावर करवीर तालुक्यातील सडोली खालसा या त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांनी २० वर्ष कोल्हापूर काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद भूषवलं होतं. आमदार पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुखः व्यक्त केलं. पाटील यांच्या निधनानं राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाटील यांच्या निधनानं सामाजिक, राजकीय क्षेत्रातील एक जाणतं नेतृत्व आपल्यातून निघून गेलं, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. तर आमदार पाटील यांच्या निधनानं जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व आपण गमावलं, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
****
वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आज ठिकठिकाणी साजरी होत आहे. भगवान बुद्धांचा जन्मदिवस आणि त्यांच्या ज्ञान प्राप्तीचा हा दिवस त्यांच्या शिकवणीचं स्मरण करुन साजरा करण्यात येत आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील जागजई इथं बुद्धपोर्णिमेनिमित्त गोंडवाना समाजातील बांधवांची जत्रा फुलली आहे. बुद्धपोर्णिमे निमित्त 'देव आंघोळ' आणि देवदर्शन करण्यासाठी आदिवासी समाज बांधव इथं एकत्र जमतात. पुर्वापार वर्धा नदी पात्रात ही देव आंघोळ घातली जाते. याठिकाणी काळाचौरव, पांढराचौरव, राव, माणकोबाई ह्या देवांना भक्तगण आंघोळीसाठी आणतात. वाजतगाजत हजारो आदिवासी समुदाय इथं आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवितात.
****
हिंगोली शहरात बुद्ध पोर्णिमेच्या निमित्तानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा इथून आज सकाळी फेरी काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. नांदेड शहरात पौर्णिमानगर इथं वैशाख पौर्णिमेच्या व बुद्ध जयंतीच्या निमित्तानं तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं.
****
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मध्ये आज ८९ मचाणावरून प्राणी गणना केली जाणार आहे. ‘निसर्ग अनुभव’या नावाने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशाच्या लख्ख प्रकाशात हा उपक्रम राबवला जातो. यावर्षी प्रथमच ‘कोअर झोन’ वगळता ‘बफर’ सहा परिक्षेत्रातील मचाणांवर प्राणीगणना होणार आहे
****
निवृत्तीवेतनधारकांना कोषागार कार्यालयाच्या नावानं येणारे बनावट दुरध्वनी उचलू नये, असं आवाहन जिल्हा कोषागार विभागानं केलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये निवृत्तीवेतनधारकांना फोन करुन ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर, कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचं खोटं सांगितलं जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. पण, कोषागारामार्फत निवृत्ती विषयक, लाभ प्रदान करताना किंवा वसुलीबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात नसुन, ऑनलाईन व्यवहाराविषयी देखील सूचित करण्यात येत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही दुरध्वनी, संदेशांना प्रतिसाद देऊ नये तसंच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथम कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन अप्पर कोषागार अधिकारी सतीश गोसावी यांनी केले आहे.
****
लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. शहरी भागासोबतच जिल्ह्यातील कोणत्याही गाव, वाडी-वस्त्यांवर पाणी टंचाई जाणवल्यास, तातडीनं उपाययोजना करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाईविषयक आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
****
मराठवाडा, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळ, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली.
****
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानात कमालीची वाढ झाली असून काल अकोला इथं सर्वाधिक ४४ पूर्णांक आठ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्याखालोखाल मालेगाव, नाशिक, सोलापूर, अहमदनगरसह विदर्भ आणि मराठवाड्यात पारा चाळीशीच्यावर होता. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक चार, बीड इथं ४३ पूर्णांक एक, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक चार तर नांदेड इथं ४१ पूर्णांक दोन अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment