Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ राज्यांमधल्या ५८ मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधल्या १४, हरियाणा दहा, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी आठ, दिल्ली सात, ओडिशा सहा, झारखंड चार, तर जम्मू काश्मीरमधल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे.
****
निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचा प्रचारानं वेग घेतला आहे. या टप्प्यात आठ राज्यांमधल्या ५७ लोकसभा मतदारसंघात येत्या एक जून रोजी मतदान होईल.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशात शिमला इथं प्रचार सभा घेतली. यानंतर ते आज पंजाबच्या दौर्यावर जाणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज उत्तर प्रदेशातल्या बलिया आणि सोनभद्र जिल्ह्यात प्रचार करतील. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज शिमला इथल्या रोहडू गावात प्रचार फेरीत सहभागी होणार आहेत.
****
देशात रोजगार निर्मिती आणि निर्यात क्षेत्रात या वर्षीच्या मे महिन्यात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या १८ वर्षाच्या तुलनेत प्रथमच ही वाढ नोंदवल्याचं एच एस बी सी च्या एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे. एच एस बी सी फ्लॅश खरेदीच्या व्यवस्थापकीय निर्देशांकांनुसार, देशात जुलै २०१० पासून खाजगी क्षेत्रातल्या उत्पादनात झालेल्या वाढीमुळे सेवा क्षेत्र मजबूत झालं असून, त्यामुळे एकूण आर्थिक विस्ताराला गती मिळाल्याचंही या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४६ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पुण्यात लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महिला कॅडेटची तुकडीही संचलन सोहळ्यात सहभागी झाली होती. महिला तुकडीच्या सहभागामुळे नारी शक्तीचं प्रदर्शन झाल्याचं सांगत लष्कर प्रमुखांनी आपल्या भाषणात त्यांचं अभिनंदन केलं. या दीक्षांत समारंभात हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सतप्रकाश बन्सल उपस्थित होते. या सोहळ्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सारंग हेलिकॉप्टर्सचं नयनरम्य प्रदर्शन झालं.
****
ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधल्या अमुदान केमिकल कंपनीत काल झालेल्या भीषण स्फोटातील मृतकांची संख्या ११ वर पोहोचली आहे. दुसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून शोधकार्य सुरु आहे. या घटनेत ६० हून अधिक जण जखमी असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतकांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला आहे. मुंबईच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी १४ जूनला गो. ब. देवल पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात येतं. परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. दरवर्षी नाट्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीनं केला जातो. यानिमित्तानं कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसंच १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेला 'नाट्यकलेचा जागर' यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्तानं सादर होणार असल्याचं दामले यांनी सांगितलं.
****
मलेशियात क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधुनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात सिंधुनं आज चीनच्या हान यू हिचा २१-१३, १४-२१, २१-१२ असा पराभव केला. महिला एकेरीच्या सामन्यात भारताच्या अश्मिता चलिहाला चीनच्या खेळाडुकडून पराभव पत्करावा लागला.
या स्पर्धेत इतर गटात भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पुरुष एकेरीत किरण जॉर्जचा, पुरुष दुहेरीत साई प्रतीक आणि क्रिष्णा प्रसाद गरागा यांचा, तर महिला दुहेरीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांचा पराभव झाला.
****
भारतीय दिव्यांग थाळीफेकपटू मोनू घंगास ने काल जपानमधल्या कोबे इथं झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ३४ पूर्णांक सात मीटरचा पल्ला गाठत पॅरिस पॅरालिम्पिकसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे. मात्र अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानल्याने मोनू पदक जिंकू शकला नाही.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स आणि सनारायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. या सामन्यातला विजेता संघ येत्या रविवारी अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत खेळेल.
****
येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment