Sunday, 23 June 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.06.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 June 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जून २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल

·      नांदेड एटीएसकडून याच प्रकरणात लातूरच्या दोन शिक्षकांची आज पुन्हा चौकशी

·      १८ व्या लोकसभेचं उद्यापासून पहिलं अधिवेशन

आणि

·      टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर २१ धावांनी विजय

****

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रतेच्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने प्राथमिक माहिती अहवाल-एफआयआर दाखल केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून ही कारवाई केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी या प्रकरणाशी संबंधित देशभरात दाखल इतर प्रकरणांचा तपासही हाती घेण्याची कार्यवाही सीबीआयकडून केली जात आहे.

दरम्यान, याच प्रकरणात दहशतवाद विरोधी पथक-एटीएसच्या नांदेड शाखेने दोन शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून, त्यांचा या पेपरफुटी प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

संजय जाधव आणि जलील पठाण अशी या दोघांची नावं असून, ते दोघं जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी लातूर इथं मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी शिकवणी घेतात. हे दोन्ही शिक्षक लातूर इथं खाजगी शिकवणी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परीक्षा गैरप्रकारात यांचा काही हात आहे का, यादृष्टीने चौकशी सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

एटीएसने कालही या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन, आज सकाळी सोडून दिलं होतं.

****

१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. लोकसभेचे हंगामी सभापती ज्येष्ठ भाजप खासदार भर्तृहरी महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील. हे अधिवेशन ३ जुलै पर्यंत चालेल. यासोबतच लोकसभा सभापतीपदासाठी येत्या २६ जून रोजी निवडणूक होणार असून २७ तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरु होणार आहे.

****

सरोगसीद्वारे अपत्याला जन्म देणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मातृत्व आणि पितृत्व रजा लागू करण्यात आली आहे. यासंदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. या निर्णयामुळे महिलांना १८० दिवसांची तर फक्त एक अपत्य असलेल्या केंद्रीय कर्मचारी पालक पित्याला अपत्याच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत १५ दिवसांची पितृत्व रजा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

****

नाशिकच्या काळाराम मंदिराबाबत धमकी देणारं पत्र प्रसारित करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. वैमनस्य असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला बदनाम करण्याच्या हेतूनं त्यानं धमकी देणारं हे पत्र प्रसारित केलं होतं. या कृत्यामागे कोणाचा हात आहे, कुठल्या हेतूनं हे पत्रक काढलं आहे याचा संपूर्ण शोध घेतला जात असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवून शेतकऱ्यांना वेळेवर निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश राज्याचे वनं आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नियोजन सभागृहात कृषी विभागासोबत खरीप हंगामाचा आढावा घेतांना ते बोलत होते. पीक कर्ज वाटपात विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बँकांनी विशेष शिबीरं घेऊन पीक कर्जवाटप करावं अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या.

****

मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, तर थेट मंडल आयोगाविरोधात आंदोलन छेडणार, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यंत मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांपैकी एकही नोंद रद्द केली तर पुढचा लढा मंडल आयोग रद्द करण्यासाठी असेल, अशा शब्दांत जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याबरोबरच जर मुस्लिमांची देखील कुणबी म्हणून सरकारी नोंद निघाली तर राज्यातील सर्व मुस्लिमांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी समांतर जल वाहिनी च्या कामाचा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज प्रत्यक्ष कामाचा ठिकाणी जाऊन आढावा घेतला. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सुचना सावे यांनी संबंघित अधिकाऱ्यांना दिल्या.

****

पुष्पक या पुनर्वापर करण्यात येणाऱ्या प्रक्षेपक यानाची तिसरी आणि अंतिम चाचणी यशस्वी झाल्याची माहिती भारतीय अंतराळ संथा-इस्रोनं दिली आहे. पुष्पकच्या यापूर्वी झालेल्या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. कर्नाटकात चित्रदुर्ग इथं घेतलेल्या चाचणीत आज आव्हानात्मक परिस्थितीत अत्याधुनिक आणि स्वायत्त क्षमतांचं प्रदर्शन घडवत पुष्पक यानानं निर्धारित जागेवर अचूकपणे अवतरण केलं.

****

टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियावर २१ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियासमोर अफगाणिस्ताननं सहा बाद १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला विसाव्या षटकाचे चार चेंडू शिल्लक असतांना सर्वबाद १२७ धावा करता आल्या.

 

सुपर एट फेरीच्या गट एकमध्ये गुणांकनानुसार पहिल्या स्थावर असलेल्या भारताचा उद्या ऑस्ट्रेलियासोबत सामना आहे.

या स्पर्धेत आज अमेरिका आणि इंग्लंड यांच्यात सुपर एट गटातला सामना होणार आहे. बारबाडोस इथं रात्री आठ वाजेपासून हा सामना खेळवला जाणार आहे. तर उद्या दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात सामना होणार आहे. अँटीग्वा इथं सकाळी सहा वाजेपासून हा सामना खेळवला जाईल.

****

बंगळुरू इथं भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघात सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण अफ्रिकन महिला संघानं प्रथम फलंदाजी करतांना निर्धारीत ५० षटकांत आठ बाद २१५ धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी २१६ धावांची आवश्यकता असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या आठव्या षटकांत बिनबाद ४५ धावा झाल्या होत्या. यापूर्वी झालेले दोन्ही सामने जिंकून भारतीय महिला संघानं मालिकेत दोन - शून्य अशी आघाडी घेतली आहे.

****

राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी तालुका क्रीडा संकुलांना ५ कोटी तर जिल्हा संकुलांना १० कोटी रुपये अनुदान जाहीर केलं आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या सहकार्याने ऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यात घेतलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. इतर देशात खेळामध्ये मुलामुलींना समान संधी दिली जाते. याची अंमलबजावणी आपल्याकडेही व्हायला हवी, यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेईल, असं आश्वासन बनसोडे यांनी दिलं. खेलो इंडिया आणि राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे, खेळाडूंचे सातत्य असंच कायम राहिल्यास ही रक्कम तिप्पट केली जाईल असं आश्वासनही बनसोडे यांनी यावेळी दिलं.

****

लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती, आजच्या पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. बाभळगावच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरु होती. शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी ८०० उमेदवारांना आज बोलवण्यात आलं होतं. आज रद्द झालेल्या उमेदवारांची चाचणी परवा २५ जून रोजी घेण्यात येणार आहे. या चाचणीसाठी पात्र उमेदवारांनी पहाटे चार वाजता हजर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक देविदास सौदागर यांचा आज धाराशिव इथं जिल्हा पत्रकार संघ आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. उसवण कादंबरीतून सर्वसामान्यांचं जगणं मांडलं, ते लोकांना आपलं वाटलं, यापुढेही साहित्य सेवा अशीच सुरू ठेवणार असल्याची भावना सौदागर यांनी यावेळी व्यक्त केली. युवा साहित्य अकादमी नामांकन मिळालेल्या केतन पुरी आणि पूजा भडांगे या युवा साहित्यिकांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं सातारा परिसरातल्या रहिवाशांनी आज गुंठेवारीविरोधात आंदोलन केलं. आपली घरं गुंठेवारीतून मुक्त करावी अशी मागणी आंदोलनाकांनी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी आंदोलकाशी संवाद साधत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या.

****

विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथून निघालेली मानाची श्रीसंत गजानन महाराजांची पालखी आज मराठवाड्यात दाखल झाली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा फाटा इथं ही दिंडी पोहोचली. दिंडी दाखल होताच परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या पालखीचा पहिला मुक्काम सेनगाव इथं तर उद्या दुसरा मुक्काम हिंगोली जिल्ह्यातीलच डिग्रस कऱ्हाळे इंथ होणार आहे. त्‍यानंतर औंढा मार्गे ही पालखी पंढरपूरकडे रवाना होईल.

****

छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर मागील चार दिवसांपासून विद्यार्थी विविध मागण्यासाठी साखळी उपोषणाला बसले आहेत. एसएफआय विद्यार्थी संघटनेनं या आंदोलनाचं नेतृत्‍व केलं असून, विविध विद्यार्थी संघटनांनी त्‍याला पाठिंबा दिला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉक्‍टर वाल्‍मीक सरवदे यांच्यासोबत उपोषणकर्त्यांची चर्चा झाली. मात्र, त्‍यात तोडगा निघाला नसल्यामुळं आज चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच असल्याचं आमच्या वार्ताहारनं कळवल आहे.

****

नाशिक शहरासह जिल्ह्यात काही भागांमध्ये आज दिवसभर पावसाने चांगली हजेरी लावली, यामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. दिवसभरात ११ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही आज दुपारी पाऊस झाला.

****

No comments: