Sunday, 22 September 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २२ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 22 September 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २२ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      पुढच्या दोन महिन्यात देशातल्या २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार - केंद्रीय जलसंधारण मंत्री सी. आर. पाटील यांची माहिती

·      वंचित बहुजन आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर

·      मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी घनसावंगी तालुक्यात रास्तारोको आंदोलन, बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला सर्वत्र प्रतिसाद

आणि

·      चेन्नई कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड, विजयासाठी सहा बळींची आवश्यकता

****

सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच एकूण देशांतर्गत उत्पन्न - जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते काल ठाणे इथं मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद-२०२४ या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातली ५२ टक्के गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं, ते म्हणाले...

आपण जे एम ओ युज साईन केले, इंडस्ट्रीज्‌ आली, आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आलेला आहे. महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर वन आहे. इंडस्ट्रीमध्ये नंबर वन आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहे. पूर्ण देशाचं जे परदेशी गुंतवणूक आहे, त्याच्या ५२ टक्के फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत, ह्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आहे देशामध्ये

****

आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन मोहीमआणि स्वच्छता ही सेवाअभियानानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव काल मुंबईत जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.

परभणीतही जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा अभियानाचा काल शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत जिल्ह्यात वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, एक पेड माँ के नाम, एकल वापर प्लास्टिक बंदी, कंपोस्ट खत निर्मिती, सांस्कृतिक कार्यक्रमातून स्वच्छतेची जनजागृती असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

****

देशातली लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढच्या दोन महिन्यात देशातल्या २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार असल्याचं, केंद्रीय जलसंधारण मंत्री सी. आर. पाटील यांनी सांगितलं आहे. पुण्यात नाम फाउंडेशनच्या ९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सुरतच्या आमदार संगीता पाटील, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यात नाम फाऊंडेशनचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.

****

अल्पसंख्यांक विकास विभागाला ५०० कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा आणि प्रशिक्षण देण्यात येईल, असं राज्याचे अल्पसंख्यांक आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते. अल्पसंख्यांक समाजातल्या विद्यार्थ्यांना महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येत असून, याचा लाभ घेण्याचं आवाहन सत्तार यांनी यावेळी केलं.

****

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे, नांदेड दक्षिणमधून फारूक अहमद, नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले यांना उमदेवारी देण्यात आली आहे. याशिवाय रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली शेवगाव आणि खानापूर मतदारसंघातले उमेदवार त्यांनी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २६ सप्टेंबर रोजीचा नियोजित वाशिम जिल्हा दौरा पुढे ढकलण्यात आला असून, ते आता पाच ऑक्टोबर रोजी या दौऱ्यावर येणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळाची पाहणी करून नंगारा संग्रहालयाच्या कामाचा आढावा घेतला.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत येत आहोत

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काल घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी, बानेगाव, भोगगाव, रामसगाव इथं मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे तीर्थपुरी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलकांनी पुकारलेल्या बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला काल सर्वत्र प्रतिसाद मिळाला. तर लातूर जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या सोमवारी लातूर जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे.

****

दरम्यान, जालना जिल्ह्यात वडीगोद्री फाटा इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचंही उपोषण सुरू असून, पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणारा हा रस्ता बंद केला आहे. तो रस्ता सुरू करावा, अशी मागणी करत वडीगोद्री इथं काल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांकडूनही प्रत्युत्तर देतांना घोषणाबाजी करण्यात आली. याठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळाची भेट घेत दोन्ही समाजांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं. त्यांनी वडीगोद्री - आंतरवाली सराटी - नालेवाडी -चंदनापुरी या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याचे आदेश जारी केले.   

****

बीड जिल्ह्याने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा 'स्कॉच २०२४  राष्ट्रीय पुरस्कार'  बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना काल प्रदान करण्यात आला. मुंडे बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी विविध पावलं उचलण्यात आली, त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, या काळात होणारे आणि होत असलेले बाल विवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं.

****

भारत आणि बांग्लादेश दरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या कालच्या तिसर्या दिवशी, शुभमन गिल आणि रिषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं दुसरा डाव चार बाद दोनशे सत्त्याऐंशी धावांवर घोषीत केला. पाचशे पंधरा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं दिवसभर चार बाद एकशे अठ्ठावन्न धावा केल्या. रविचंद्र आश्विननं तीन तर जसप्रीत बुमराहनं एक गडी बाद केला. बांगलादेशला विजयासाठी अजून ३५७ धावांची गरज आहे, तर भारताला विजयासाठी सहा बळींची आवश्यकता आहे.

****

अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा दिवंगत भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार काल प्रख्यात नाट्य कलावंत आणि नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. गोवा राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती अंबादास जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे, यशवंतराव चव्हाण समितीचे सचिव दगडू दगडू लोमटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

हवामान

नांदेड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या भाटशिरपूरा इथं वीज कोसळून अजय गायकवाड हा तरुण ठार झाला. सोयाबीनची गंज लावत असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, या पावसामुळे सोयाबीन काढणीच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असून सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी येत्या २४ सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं प्रेरणा फाउंडेशन आणि एमआयटी शैक्षणिक संस्थेच्या वतीनं काल भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...