Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 September 2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
·
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय
पर्वाला प्रारंभ, ठिकठिकाणी गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना
·
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर पदमुक्त
·
पंजाबातल्या तिहेरी हत्याकांड प्रकारणी सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं अटक
· धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात
आणि
·
पॅरिस
पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नवदीप सिंहला सुवर्ण, स्पर्धेचा आज समारोप
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला
कालपासून प्रारंभ झाला.
राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या
उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता
व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी
गणेशोत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
****
मुंबईत राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली. गणरायांचं कृपाछत्र सर्व जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
मुंबईत लालबागचा
राजा, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा
यासह सर्वच
मोठ्या गणेश मंडळांच्या मंडपात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पुण्यात पाच मानाच्या गणपतींसह, श्रीमंत दगडूशेट गणपतीचं ढोलताशाच्या गजरात आगमन झालं.
****
परदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. पाकिस्तानात कराची इथं गणेशोत्सव साजरा करणारे विशाल राजपूत यांनी या उत्सवाचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा...
“पाकिस्तानमध्ये पार्टीशनपासून गणेशोत्सव साजरा केला जातो.
आजपण आम्ही गणपतीची पूजा केली. माझे ब्रदल इन लॉ मूर्ती बनवतात. त्यांनी आम्हाला
मूर्ती दिली. आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो. गणपतीची तयारी आम्ही महिनाभरापासून
आधीपासून सुरू करतो. मोदक प्रसाद आम्ही घरी बनवतो. आणि गणपतीचे भजन, सत्संग सगळं साजरा करत असतो.”
****
छत्रपती संभाजीनगर इथं
घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचं
मोठ्या उत्साहात आगमन झालं. शहराचं ग्रामदैवत
असलेल्या संस्थान गणपतीची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. जिल्ह्यात एक हजार ६६०
गणेश मंडळाची नोंदणी झाली असून,
५४४ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जात आहे.
दरम्यान, शहरातल्या विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी काल पाहणी केली, या मार्गांवर लोंबकळणाऱ्या तारा १५ सप्टेंबरपूर्वी काढून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, उमेद
स्वयं सहाय्यता समूहातल्या महिलांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने
गणेश मूर्तीं विक्री उपक्रम राबवण्यात आला,
या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं वृत्त आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात काल
दिवसभर गणेशाच्या आगमनाचा उत्साह दिसून
आला. यावर्षी जालना गणेश फेस्टिवल
मध्ये आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं
आहे.
****
भाद्रपद महिन्यातला हा गणेशोत्सव, पार्थिव गणेश पूजन म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीच्या पुजेचा उत्सव असतो. पण प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीसह विविध साहित्यापासून साकारलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या गणेश मूर्तींमुळे मूळ संकल्पना असलेली पार्थिव गणेशाची मूर्ती काही अंशी दुर्लक्षित होत आहे. मात्र नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं काळ्या मातीच्या गणपतीची स्थापना करण्याची परंपरा आजही कायम आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर....
“काल घरोघरी गणेश स्थापनेची लगबग सुरू असतांना, देगलूर इथलं कोरलेपवार कुटुंब मात्र गणेशमूर्ती
घडवण्यात मग्न होतं. कुंभाराने पारंपरिक पद्धतीने साकारलेल्या काळ्या मातीच्या
गणेशमूर्ती बसवण्याची परंपरा या गावातल्या अनेक कुटुंबांनी आजही पाळली आहे. हे
कुटुंबीय आपापल्या घरून मूर्तीकाराकडे लाकडी पाट आणून देतात, थेट त्याच पाटावर कोरलेपवार कुटुंबीय काळ्या मातीची
मूर्ती घडवून देतात. प्लास्टर ऑफ पॅरीस आणि शाडू मातीच्या वादात काळ्या मातीच्या
या शंभरटक्के पर्यावरणपूरक असलेल्या काळ्या मातीच्या गणेश मूर्ती अधिक उठून
दिसतात.”
अनुराग पोवळे, आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेड
****
नांदेड इथं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण
यांच्या निवासस्थानी तर छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माणमंत्री अतुल सावे
यांच्या घरी मोठ्या उत्साहात 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात
आली.
बीड शहरात सिद्धिविनायक व्यापारी संकुल परिसरात असंख्य भाविकांनी गणेश मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. परभणी
इथं बाजारपेठांमध्ये मूर्ती, तसंच साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात अनेक गणेश
मंडळांनी पर्यावरणपूरक गणपती आणि देखावे साकारले आहेत.
****
उत्सवाच्या कालावधीत नागरिकांनी
मिठाई तसंच प्रसाद खरेदी
करताना योग्य ती खबरदारी
घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा
अन्न आणि औषध प्रशासनानं
केलं आहे. प्रसाद स्वतः
तयार करून वितरीत करणाऱ्या
गणेश मंडळांनी अन्न
सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं
अन्न पदार्थाची खरेदी
करताना खबरदारी घ्यावी
असंही या
विभागानं म्हटलं आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आलं आहे. खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावर केंद्र सरकारने त्यांना प्रशासकीय कायदा १९५४ नुसार कारवाई करत प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पदावरून पदमुक्त केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंजाबात फिरोजपूर इथं एकाच कुटुंबातल्या तीन सदस्यांची हत्या करणाऱ्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांनी अटक केली. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर पोलिसांनी काल सकाळी सापळा रचून या सर्वांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. या सर्वांना फिरोजपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरातल्या वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीत अफिम बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. त्याच्याकडून २७ ग्रॅम
अफिम जप्त करण्यात आलं. सुखविंदरसिंग कालो असं या
युवकाचं नाव आहे.
****
गुंगीकारक गोळ्यांची विक्री करणाऱ्या चार संशयितांना जालना
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल अटक केली. त्यांच्याकडून
नशा करण्यासाठी, गर्भपातासाठी तसंच उत्तेजना वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे आठ लाख १८ हजार रुपयांच्या
गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला.
या सर्वांविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातले तिघेजण मेडीकल चालक असल्याची माहिती गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली.
****
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास कालपासून
प्रत्यक्ष सुरूवात झाली. उपळा शिवारात वाहनं आणि यंत्राचं पूजन करून या कामास
प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यातलं हे काम ३०
महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे.
मात्र दोन वर्षांच्या आत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट
ठेवण्यात आलं असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी
सांगितलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भालाफेकमध्ये भारताच्या नवदीप सिंह यानं सुवर्ण पदकाची कमाई केली. तर
दोनशे मीटर ट्रॅक स्पर्धेत सिमरन शर्मा हिनं कांस्य पदक जिंकलं.
दरम्यान, या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. स्पर्धेच्या
पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण, नऊ
रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन सोळावं स्थान पटकावलं आहे. भारताच्या
पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज
हरविंदर सिंग
आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये
दोन पदकं जिंकली आहेत. आज समारोप
समारोहात हे दोघे
भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार
आहेत.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती
देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत लातूर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक याप्रमाणे ७८६ आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एका योजनादूताची
निवड होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर येत्या १३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
शिवसेना वैद्यकीय कक्ष तसंच रामहरि राऊत प्रतिष्ठान यांच्या
संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई इथं काल जयपूर फूट वाटप करण्यात
आलं. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, रामहरि राऊत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत पाच हजार मोफत तसंच सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, सव्वा दोन वर्षात ३२१ कोटींची मदत वाटप केल्याची माहिती, चिवटे यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के
भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे सुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात काल काही काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे बाजारातले विक्रेते तसंच ग्राहकांची तारांबळ उडाली. जालना शहर परिसरातही काल पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे.
****
दरम्यान,
येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची
शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment