Tuesday, 3 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.09.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 03 September 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०३ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. यावेळी उच्च सदनाची आवश्यकता आणि महत्व या पुस्तकाचं प्रकाशन, तसंच उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे.

उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उदगीरमध्ये राज्य सरकारच्याशासन आपल्या दारीआणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या मेळाव्याला देखील त्या संबोधित करणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रपतींच्या या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा आढावा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी घेतला.

****

राज्य सरकारतर्फे दिले जाणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल जाहीर झाले. यावेळी विविध प्रवर्गांमधे ११० जणांची पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. यात ३८ प्राथमिक शिक्षक, ३९ माध्यमिक शिक्षक, आठ आदर्श शिक्षिका, दोन कला आणि क्रिडा विषयाचे विशेष शिक्षक, एक दिव्यांग शिक्षक, आणि एक स्काऊट आणि गाईडचे शिक्षक यांचा समावेश आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांना गौरवण्यात येणार आहे.

****

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी पात्र महिलांना आता सप्टेंबर मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून, अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन  त्यांनी केलं आहे.

****

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या विपणन आणि निरीक्षण संचालनालयाच्या नाशिक रोड उप कार्यालयातला वरिष्ठ विपणन अधिकारी विशाल तलवडकर याला एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रंगेहात पकडलं. धुळे जिल्ह्यातल्या एका डेअरी उत्पादन कंपनीच्या ब्रँडसाठी परवाना देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

आगामी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचं महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाकडून सांगण्यात आलं आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव, डोंगरगाव पूल आणि सावरखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असं सांगून त्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असं आश्वासन दिलं.

****

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी या गावांमध्ये नुकसानाची पाहणी करुन, शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. मंठा, परतूर तालुक्यातही ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या भागात नुकसानीची पाहणी केली. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी लोणीकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

****

सततच्या पावसामुळे आलेल्या पूरस्थितीबाबत नागरिकांनी दक्षता बाळगावी तर नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे प्रशासनातर्फे तातडीने व्हावेत, असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ११५ पूर्णांक आठ टक्के इतका पाऊस झाला आहे.

****

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. आज नांदेड-संबलपुर एक्स्प्रेस, शिर्डी  - काकीनाडा एक्स्प्रेस, तर उद्या काकिनाडा - शिर्डी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. आज नगरसोल-नरसापूर ही गाडी काझीपेट आणि  विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.

****

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची जोडीदार इंडनेशियाची आल्डिला सुतजियादी यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्यांनी झेक प्रजासत्ताकची बार्बोरा क्रेयचिकोव्हा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डेन या जोडीचा सात - सहा, दोन - सहा, दहा - सात असा पराभव केला. उपान्त्य फेरीत बोपण्णा - आल्डिला जोडीचा सामना उद्या टेलर टाऊनसेंड आणि डोनाल्ड यंग या अमेरिकन जोडीशी होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...