Wednesday, 4 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.09.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 September 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लातूर आणि नांदेड दौऱ्यावर-उदगीर इथं बुद्ध विहाराचं आज लोकार्पण

·      विधान परिषदेचा शताब्दी समारोहात राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान-मराठवाड्यातल्या अनेक लोकप्रतिनिधींचा गौरव 

·      अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना 

·      विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर-मुख्यमंत्र्यांकडून आज बैठकीचं आयोजन

आणि

·      पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भारताची आणखी पाच पदकांची कमाई

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लातूर आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. नांदेड विमानतळावर सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान, त्यांचं आगमन होईल. त्यानंतर त्या हेलिकॉप्टरने उदगीरला रवाना होतील. बुद्ध विहाराच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान तसंच शासन आपल्या दारी या संयुक्त अभियानात त्या सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडे चार वाजेदरम्यान, राष्ट्रपतींचं नांदेड विमानतळावर आगमन होईल. सायंकाळी सव्वा पाच वाजता त्या तख्त श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वाऱ्याला भेट देऊन, सायंकाळी सहा वाजेदरम्यान नांदेड विमानतळावरून राष्ट्रपती दिल्लीकडे प्रयाण करतील.

दरम्यान, काल मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेचा शताब्दी समारोह राष्ट्रपती मूर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलणं, त्यात सुधारणा करणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं सांगितलं. महिलांच्या र्वांगीण विकासाशिवाय देशाचा अपेक्षित विकास साध्य होणं शक्य नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

या कार्यक्रमात २०१८ पासूनचे उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, बाळासाहेब थोरत, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, सुजितसिंग ठाकूर, सतीश चव्हाण, दिवंगत विनायक मेटे, प्रकाश सोळंके, संजय शिरसाट, प्रशांत बंब, गोपीकिशन बाजोरीया, विक्रम काळे, अब्दुल्ला खान दुर्राणी, प्रज्ञा सातव, अभिमन्यू पवार, रमेश बोरणारे, राम सातपुते, आदी मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सतकार करण्यात आलं.

दरम्यान, काल राष्ट्रपतींनी दादर इथं चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. काल पुण्यात सिम्बायोसिस विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षांत समारंभाला देखील त्यांनी संबोधित केलं.

****

- गव्हर्नन्समुळे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची रक्कम कमी वेळेत थेट खात्यात जमा होणं शक्य झाल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत ई - गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. "विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई - सेवा वितरण" अशी या परिषदेची संकल्पना आहे.

****

मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पिकांचं नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, तात्पुरतं स्थलांतर केलेल्या लोकांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी, असं मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सांगितलं आहे.

दरम्यान, मराठवाड्यातही बहुतांश जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी पावसानं झालेल्या नुकसानाची काल पाहणी केली. बीड जिल्ह्यात परळी इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी, परभणी जिल्ह्यात आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार राहुल पाटील यांनी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातल्या नुकसानाची गिरीश महाजन यांनी, छत्रपती संभाजीनगर तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या नुकसानाची अब्दुल सत्तार यांनी काल पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जालना जिल्ह्यात घनसावंगी माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा आणि परतूर तालुक्यातल्या नुकसानाची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी काल पाहणी केली.

**

नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातल्या रेणापूर इथं नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण काल वाहून गेले. अन्य एक जण पोहत असतांना गाळात रुतल्याने त्याला काढण्याच्या प्रयत्नात नदीत उतरलेले भरत मुळेकर आणि यश भगत हे दोघे वाहून गेले, त्या दोघांचा शोध घेतला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड इथं रविवारी सायंकाळी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह काल सापडल्याचं वृत्त आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन जणांचा पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. यामध्ये टेंभुर्णी इथले सुभाष सवंडकर आणि औंढा तालुक्यातल्या चैतन्या ठोंबरे या बालिकेचा समावेश आहे.

**

हिंगोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख ५८ हजार ८९८ हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं असून, शंभरावर पाळीव जनावरं दगावली, तर ६३२ घरांची पडझड झाली आहे.

जालना शहराला पाणी पुरवठा करणारं घाणेवाडी जलाशय १२ फूट भरला असून, भोकरदन तालुक्यात शेलूद इथलं धामणा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं, पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे. यामुळे भोकरदन शहरासह तालुक्यातल्या २५ गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. परभणी जिल्ह्यात अनेक जलप्रकल्प भरले आहेत, यामध्ये मासोळी धरण शंभर टक्के, लोअर दुधना ६२ तर येलदरी धरण ५३ टक्के भरलं आहे. बीड जिल्ह्यातलं मांजरा धरण ६५ टक्के भरलं आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ९१ टक्क्यांच्यावर पोहोचला आहे. धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याने, गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातला खडकपूर्णा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. धरणाचे सर्व १९ दरवाजे काल उघडण्यात आले असून प्रशासनाने वैनगंगा नदीकाठच्या ३१ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, पूर्व विदर्भ आणि लगतच्या तेलंगणावरचा तीव्र कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकला आहे, त्यामुळे येत्या दोन दिवसांत विदर्भात बहुतांश ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

जल विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी विविध सात कंपन्यांसोबत राज्यशासनानं सामंजस्य करार केले आहेत. यामुळे ४० हजार ८७० मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल मुंबईत हे करार झाल्यानंतर बोलत होते. राज्यात दोन लाख चौदा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार असून, राज्याची अर्थव्यवस्था तीन ट्रिलीयन डॉलर करण्याच्या उद्देशास या करारामुळे गती मिळणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं.

****

शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करणाऱ्या प्राथमिक विकास सेवा संस्थांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी या संस्थांच्या शेतकरी भाग मर्यादेत २० हजार रूपयांवरून ५० हजार रुपयांपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. सहकार विभागासंदर्भातल्या विविध विषयांबाबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्राथमिक विकास सेवा संस्थांसाठीचे निकष ठरवण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

****

राज्य परिवहन महामंडळ-एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे राज्यभरात एसटीच्या जवळपास १२ हजार फेऱ्या काल रद्द झाल्या. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत आज मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे.

****

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने काल पाच पदकांची कमाई केली. महिलांच्या ४०० मीटर टी - ट्वेंटी धावण्याच्या शर्यतीत दीप्ति जीवनजीने कांस्य पदक, तर पुरुषांच्या उंच उडी टी - 63 प्रकारात शरद कुमारने रौप्य आणि मरियप्पन थंगावेलूने कांस्य पदक जिंकलं. पुरुषांच्या भालाफेक एफ - 46 स्पर्धेत अजीत सिंह ने रौप्य आणि सुंदर गुर्जरने कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं, अशी एकूण २० पदकं जिंकली आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वाई गोरक्षनाथ इथं काल सुमारे १० हजार बैलजोड्यांनी गोरक्षनाथाचं दर्शन घेतलं. गेल्या अनेक वर्षांच्या या परंपरेविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,

हिंगोलीसह शेजारच्या तीन जिल्ह्यातल्या आठ ते दहा हजार बैलजोड्यांनी येथे हजेरी लावत गोरक्षनाथाला प्रदक्षिणा घातल्या. गोरक्षनाथाच्या मंदिराला प्रदक्षणा घातल्या की, बैलांना कोणताही आजार होत नाही, बैल शेतीकामासाठी तंदुरुस्त राहतात, अशी धारणा आहे.  ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर हा महापोळा उत्साहात साजरा करण्यात आला.’’

आकाशवाणी बातम्यांसाठी, रमेश कदम, हिंगोली.

****

बीड इथं १९ व्या छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रिय पोलीस कर्तव्य मेळाव्याचं उद्घाटन काल जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या हस्ते झालं. सहा तारखेपर्यंत चालणार्या या मेळाव्यात विविध कार्यक्रम तसंच स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

आंतरराष्ट्रीय युवा परिषद आणि नांदेड इथल्या पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज नांदेड इथं एक दिवसीय प्रादेशिक भाषा आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यासाठी शाश्वत विकासाची आव्हाने हा परिषदेचा विषय आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथल्या हजरत शेख मुन्तजबोद्दीन जरजरी बक्ष यांचा ऊर्स येत्या ९ ते १७ तारखेदरम्यान होत आहे. या ऊर्समध्ये भाविक, महिला यांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य देऊन त्यादृष्टीने सर्व व्यवस्था पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधित यंत्रणाना दिले आहेत. उत्सवाच्या पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 22 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...