Wednesday, 4 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.09.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 04 September 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०४ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण होणार आहे. त्यांचं नांदेड विमानतळावर आगमन होत असून, त्यानंतर त्या हेलिकॉप्टरने उदगीरला रवाना होतील. बुद्ध विहाराच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान तसंच शासन आपल्या दारी या संयुक्त अभियानात त्या सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडे चार वाजेदरम्यान, राष्ट्रपतींचं नांदेड विमानतळावर आगमन होईल. सायंकाळी सव्वा पाच वाजता त्या तख्त श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वाऱ्याला भेट देऊन, सायंकाळी सहा वाजेदरम्यान नांदेड विमानतळावरून राष्ट्रपती दिल्लीकडे प्रयाण करतील.

****

मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पिकांचं झालेलं नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, यासंदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत, अतिवृष्टीमुळे तात्पुरतं स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात, त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी, असं मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सांगितलं आहे.

****

दरम्यान, मराठवाड्यातही बहुतांश जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी पावसानं झालेल्या नुकसानाची काल पाहणी केली. बीड जिल्ह्यात परळी इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी, परभणी जिल्ह्यात आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार राहुल पाटील यांनी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातल्या नुकसानाची गिरीश महाजन यांनी पाहणी केली. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित एकही शेतकरी भरपाई पासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. नुकसानाचे पंचनामे करून यासंबंधी भरपाईचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना यावेळी दिल्या. छत्रपती संभाजीनगर तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या नुकसानाची अब्दुल सत्तार यांनी काल पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातली पूर परिस्थिती ओसरू लागली आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे आता सहा दरवाजे उघडे आहेत. ६२ हजार २९४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीची पाणीपातळीही ३५५ मीटरवरून ३५० मीटरवर आली आहे. त्यामुळे नांदेड शहरात गोदावरी काठावरील अनेक सखल भागातलं पाणी आता ओसरत आहे.

हिंगोली जिल्ह्यात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचा पाणीसाठा ९० टक्क्याच्या वर गेला आहे.

****

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात पाऊस जास्त झाल्यानं कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार यासारख्या जलजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग उपाययोजना करत असून, सर्वाधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता असलेल्या गावांची यादीही तयार करण्यात येत आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत जलजन्य आजारांमुळे राज्यात १० रुग्ण दगावल्याचं आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आलं आहे.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. जयदीप याच्यावर पुतळ्याच्या बांधकामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे. पुतळा कोसळल्याच्या दिवसापासून तो फरार आहे. या प्रकरणातला दुसरा आरोपी चेतन पाटील याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग इथल्या मंडळ अधिकार्याला दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. जयंत गायकवाड असं त्याचं नाव असून, तक्रारदाराच्या शेतात सपाटीकरण करण्यासाठी किरकोळ रॅायल्टी भरुन घेऊन कोणतीही कारवाई न करण्यासाठी, त्यानं ही लाच मागितली होती.

****

वेगवेगळ्या जणांचे आधार क्रमांक वापरून लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातल्या निमसोड इथल्या दांम्पत्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल चौकशीसाठी ताब्यात घेतलं.  या दांम्पत्याने ३० वेगवेगळ्या जणांच्या आधारकार्डचा उपयोग करून नोंदणी करत योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे तीस पैकी २६ नोंदणी या एकाच बॅंकेत केल्या असून, एकाच महिलेची वेशभूषा आणि केशरचना बदलत काढलेले फोटो नोंदणी करताना वापरल्याचं पोलिस चौकशीत समोर येत आहे. ते अर्ज मंजूर होऊन, संबंधित महिलेच्या खात्यावर ७८ हजार रुपये लाभ देखील जमा झाला आहे.

****

जागतिक बँकेनं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज सात टक्क्यापर्यंत वाढवला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 26 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...