Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 08 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०८ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
राज्यात ९० दिवसांसाठी किमान
हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारची मान्यता
·
समाज घडवण्याचं काम वारकरी संप्रदाय
करतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
·
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
·
गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस, दीड दिवसाच्या गणपतींच विसर्जन
आणि
·
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा
आज समारोप, स्पर्धेत २९ पदकांची कमाई करत
भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद
****
केंद्र
सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने
सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी
यासंदर्भात केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. सरकारने या दोन राज्यांमध्ये
सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली
आहे. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असून, याचा मनापासून आनंद होत असल्याची भावना कृषिमंत्री मुंडे यांनी
व्यक्त केली आहे.
मागील
वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं. मात्र
त्याही परिस्थितीत राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी
पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्यासाठी, चार हजार २०० कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिलं आहे. येत्या दोन-तीन दिवसात या
अनुदानाचं थेट वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
समाज
घडवण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. देवाची आळंदी इथं झालेल्या
वारकरी संतपूजन सोहळ्यात ते आज बोलत होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, मोठी संत परंपरा आपल्याला लाभल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचं अध्यात्मिक आणि धार्मिक
अधिष्ठान मोठं असल्याचं नमूद केलं.
आपल्या
सरकारनं गेल्या दोन वर्षांत घेतलेले ६०० निर्णय सर्व समाजघटकांसाठी होते, मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे त्यापैकी अनेक
निर्णय काहीसे झाकोळले गेले, असं
मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. घरचं अर्थकारण सांभाळणारी लाडकी
बहीण सगळ्यात हुशार असते, असं
सांगून या योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. सरकारनं ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला, युवांसाठी आणलेल्या योजनांचा पुनरुच्चार करून आपल्या सरकारचे
हात अधिक बळकट करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते मारुती महाराज कुरेकर यांना शांतिब्रह्म पुरस्कार, तर रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
राज्य
सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या
महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला
स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर
पाचशे स्टार्टस्अपना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
योजनेची अधिक माहिती एम एस आय एन एस डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. संध्याकाळी साडेसात
वाजता मुंबई समाचारच्या द्विशताब्दी निमित्त तयार केलेल्या लघुपटाचं ते अनावरण करतील.
१८२२ मधे मुंबईत सुरु झालेलं हे गुजराती वर्तमानपत्र आशियातल्या सर्वात जुन्या वर्तमानपत्रांपैकी
एक आहे.
गृहमंत्री
शाह उद्या दिवसभर मुंबईतल्या विविध भागातल्या गणेश मंडळांना भेट देणार आहेत. उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी तसंच त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
वर्षा निवासस्थानी जाऊन ते गणपती दर्शन घेतील. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला
आणि त्यानंतर वांद्रे पश्चिमेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला शाह भेट देणार आहेत.
****
केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयनं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या
साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या
सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य आठ जणांनी
अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त
झाली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. मागणी केलेल्या लाचेपैकी ३०
लाख रुपये हवाल्यानं स्वीकारले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे.
****
आंतरराष्ट्रीय
साक्षरता दिवस आज साजरा केला जात आहे. व्यक्ती, समुदाय तसंच समाजाच्या दृष्टीनं साक्षरतेच्या महत्त्वाचं स्मरण करून देण्यासाठी
दरवर्षी ८ सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. “बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन आणि
परस्पर सामंजस्य तसंच शांततेसाठी साक्षरता” ही यंदाच्या साक्षरता दिनाची संकल्पना आहे.
****
देशात
मंकिपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण या आजाराचा प्रसार झालेल्या देशातून
नुकताच परत भारतात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. या रुग्णाला एका विशेष रुग्णालयात
विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या रुग्णाची प्रकृति ठीक असून, अशा प्रकारच्या आजारांचा सामना
करण्यासाठी देश पूर्ण तयार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
गणेशोत्सवाचा
आज दुसरा दिवस असून, सर्वत्र
भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं
दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. विविध मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण
मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारे देखावे बघण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे.
दरम्यान, दीड दिवसाच्या गणपतींच विसर्जन आज होत आहे. ठिकठिकाणी गणेश विर्सजनासाठी
महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे.
नांदेड
जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपतीचं आज सकाळपासून विसर्जन सुरु आहे. देगलूर इथं लेंडी
नदीच्या काठी देगलूर नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे. या तलावामध्ये
भाविक आपल्या मूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात तीन हजार ५२० सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची
स्थापना केली आहे. त्यामध्ये नांदेड शहरात एक हजार ३९८ तर ग्रामीण भागात दोन हजार १२२
सार्वजनिक मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव
यांनी दिली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच
जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी
अभिजित राऊत यांनी यासंदर्भातले आदेश जारी केले.
****
पॅरिस
पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होणार आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग
आणि धावपटू प्रीती पाल हे या समारोप समारोहात भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत.
या स्पर्धेत एकूण २९ पदकांची कमाई करुन भारतानं पदकतालिकेत सोळावं स्थान पटकावलं आहे.
भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ
रौप्य आणि १३ कांस्य पदकं मिळवून स्पर्धेच्या इतिहासात भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची
नोंद केली.
****
राज्य
शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, एक्वाडाम, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, व्हाय वेस्ट आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने युवा सहभाग जलप्रबंधन
कार्यक्रम राज्यात राबवला जात आहे. या अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथल्या
कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या
ग्रीन क्लबला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय महाराष्ट्र शासनाचं पुरस्कार नामांकन घोषित
झालं आहे. यामध्ये सर्व बाबींमध्ये नळदुर्ग महाविद्यालयाने १०० पैकी ९९ गुण प्राप्त
केले आहेत. या मोहिमेत वेगवेगळ्या जल संरक्षण पद्धतीच्या अवलंबनाने अंदाजे ४० दशलक्ष
घन लिटर पाणी वाचण्याची संकल्पना आहे.
****
शासनाच्या
विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनादूत
उपक्रमासाठी परभणी जिल्ह्यातून एकूण ९७२ योजनादूतांची निवड होणार आहे. या उपक्रमात
सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org
या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा
प्रशासनाने केलं आहे. या योजनादूतांना दरमहा १०
हजार रुपये मानधन दिलं
जाणार आहे.
****
अंबाजोगाई
इथल्या नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यंदाचा नारायणदादा
काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार प्राध्यापक डॉ. तसनीम पटेल यांना जाहीर झाला आहे. शैक्षणिक
किंवा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना हा पुरस्कार दिला जातो. उद्या
अंबाजोगाई इथं सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण
होणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९६ टक्क्याच्या वर गेला
आहे. धरणात सध्या १५ हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू असून, उजव्या
कालव्यातून माजलगाव धरणासाठी ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणातली
आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग
करावा लागू शकतो, त्यामुळे
गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment