Monday, 9 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.09.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 September 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे केंद्र सरकारचे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

·      मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर येत्या ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

·      शाळा, शालेय आवार तसंच शालेय वाहतुकीदरम्यान विद्यार्थी सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून सात सदस्यीय समिती स्थापन

आणि

·      पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे अर्धा फूट उचलून नदीपात्रात पाणी विसर्ग सुरू

****

मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिले आहेत. या रोगाबाबत जनतेत असलेली भीती दूर करण्यासाठी तसंच जनजागृतीसाठी उपाय योजावेत, असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं या रोगाबाबतच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असून, याबाबत सर्व राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितलं आहे.

****

 

मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर येत्या ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकाकर्ते मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी ही माहिती दिली. २०१९ मध्ये सामाजिक आणि आर्थिक मागास वर्ग या श्रेणीतून मराठा समाजाला दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात वैध ठरलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण रद्दबातल ठरवलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, यासाठी विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केलेली आहे.

****

शाळा, शालेय आवार तसंच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. बदलापूर बाललैंगिक अत्याचारासारख्या दुर्दैवी घटना रोखण्याच्या अनुषंगानं या समितीनं २९ ऑक्टोबरपर्यंत आपल्या शिफारशी आणि सूचनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****

नाशिक इथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज नाशिक इथं जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ही माहिती दिली. या प्रस्तावित विद्यापीठात ऐंशी टक्के आदिवासी तर वीस टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश असेल, असं नमूद करत, या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील, असं राज्यपाल म्हणाले. आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असून, राजभवनात आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.

****

राज्यातल्या सगळ्या आदिवासी संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रातला आदिवासी आता एकत्र झाला असून, त्यांच्या पुढच्या एकत्रित वाटचालीच्या दृष्टीनं राज्यात जळगाव, मनमाड आणि नागपूर इथे जाहीर कार्यक्रम घेणार असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं.

****

स्वातंत्र्याच्या लढ्यात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना आज ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधीजींच्या चलेजाव च्या नाऱ्यानं प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणारे बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदाद शहा, धनसुकलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा यांच्यावर इंग्रज पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता. आज जिल्हा प्रशासनासह, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी देखील हुतात्मा स्थळावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.

****

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आज तिसऱ्या दिवशीही बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती आज शेतकरी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर असून, आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीही दर्शन घेतलं. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजासह इतरही गणेश मंडळांना शहा यांनी भेट दिली.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली.

हिंगोली जिल्ह्यात एक हजार चारशे चौसष्ट ठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातल्या ७१० पैकी ३०५ गावांनी 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबवली आहे. याशिवाय, गणेश मंडळांनी सामाजिक देखावे सादर करण्यासोबतच गरजूंना मदत करण्याचाही निर्णय घेतला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

उल्हासनगर इथल्या एका बिस्किट कंपनीला आज दुपारी मोठी आग लागली. विद्युत यंत्रणेतल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

****

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळेल, असं आश्वासन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलं आहे. आज नांदेड तालुक्यातल्या आलेगाव आणि निळा या गावांच्या शेतशिवारात जाऊन त्यांनी नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते.

राज्य आपत्कालीन राखीव दलाच्या तुकडीचं मुक्कामाचं ठिकाण धुळे ऐवजी हिंगोली इथे करण्यात यावं, यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळू शकेल, अशी मागणी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी केली.

पाटील यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या अतिवृष्टीबाधित भागाचीही पाहणी केली. या नुकसानाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून अहवाल पाठवण्याचे निर्देश यावेळी पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात तीन हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे. आज दुपारी बारा वाजेपासून या विसर्गाला सुरुवात झाली. सध्या धरणात दहा हजार ७४६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. आवक वाढल्यास अथवा कमी झाल्यास, विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये तसंच नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीवरचा नियोजित खरबी वळण बंधारा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या बंधाऱ्याबाबत काढलेली निविदा तातडीनं रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. हिंगोलीत खरबी इथे कयाधू नदीवर बंधारा बांधून ते पाणी ईसापूर धरणात आणि त्यानंतर नांदेडला नेण्याचं प्रस्तावित आहे. याबाबत हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध केला आहे.

****

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, यात सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार चारशे शहाऐंशी जणांनी यासाठी नोंदणी केली असून, येत्या १३ तारखेपर्यंत इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार असून, या योजना दूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

****

येत्या अकरा तारखेला, बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथले संत जरजरीजरबक्ष यांच्या उर्सनिमित्त जिल्हा प्रशासनानं स्थानिक सुटी जाहीर केली आहे. राज्य न्यायालयाच्या अधिकार कक्षेतली कार्यालयं, केंद्रीय प्रशासनाची कार्यालयं आणि बँकांच्या कक्षेतली कार्यालयं सोडून जिल्ह्यातली इतर सगळी शासकीय, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयं, शासकीय कोषागारं आणि महामंडळांच्या कार्यालयांना ही सुट्टी लागू राहणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...