Monday, 9 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.09.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 September 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      केंद्र सरकारची महाराष्ट्रात किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता    

·      स्थानिक भाषा संवर्धनासाठीच नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा आग्रह-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन

·      मुंबईतल्या केंद्रीय जीएसटी अधीक्षकासह तीन जणांना २० लाख रुपये लाच घेताना अटक

·      पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे ९८ टक्के-नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आणि

·      पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा शानदार समारोप-२९ पदकांसह भारत पदकतालिकेत १६ व्या स्थानी

****

केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असून, याचा मनापासून आनंद होत असल्याची भावना मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेलं चार हजार २०० कोटी रुपये अनुदान येत्या दोन-तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर थेट जमा करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातल्या दहा जिल्ह्यात सुमारे आठ लाख ४८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. कापूस, सोयाबीन आणि ज्वारी आदी पिकांचं आणि कांदा तसंच भाजीपाल्याचंही नुकसान झाल्याचं कृषी विभागाच्या अहवालात म्हटलं आहे.

****

स्थानिक भाषांचं संवर्धन गरजेचं असून, त्यासाठीच मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षणाचा आग्रह करणारं शैक्षणिक धोरण आणल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. मुंबई समाचार या गुजराती वृत्तपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त काल मुंबईत एका लघुपटाचं शहा यांच्या हस्ते प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. कुटुंबीयांनी आपापसात मातृभाषेतच संवाद साधण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले...

‘‘नई जो शिक्षा नीती लेकर आए हैं प्राथमिक शिक्षा मातृभाषा मे कंप्लसरी करने का काम हमने किया है. मै आप सभी से अपील करना चाहता हूं, निवेदन करना चाहता हूं कि घर मे कम से कम अपनी भाषा मे बोलना शुरू करो, बच्चे भाषा को आगे ले जाएंगे.’’

दरम्यान, गृहमंत्री शाह आज लालबागचा राजा, त्यानंतर वांद्रे पश्चिमेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणपतीचंही ते दर्शन घेणार आहेत.

****

वारकरी पंथाचं आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान राजकीय अधिष्ठानापेक्षा मोठं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. देवाची आळंदी इथं झालेल्या वारकरी संतपूजन सोहळ्यात ते काल बोलत होते. आपल्या सरकारनं गेल्या दोन वर्षांत घेतलेले ६०० निर्णय सर्व समाजघटकांसाठी होते, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. घरचं अर्थकारण सांभाळणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते, असं सांगून या योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मारुती महाराज कुरेकर यांना शांतिब्रह्म पुरस्कार, तर रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

****

राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर पाचशे स्टार्टस्अपना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. योजनेची अधिक माहिती एम एस आय एन एस डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

****

केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य आठ जणांनी अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. मागणी केलेल्या रकमेपैकी ३० लाख रुपये हवाला मार्फत घेतल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे.

****

देशात मंकिपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. या आजाराचा प्रसार झालेल्या देशातून हा रुग्ण नुकताच परत भारतात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं काल सांगितलं. या रुग्णाला एका विशेष रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या रुग्णाची प्रकृती ठीक असून, अशा प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी देश पूर्ण तयार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी येत्या २७ तारखेपर्यंत आपल्या सूचना १८०० - ११ - ७८०० हा टोल फ्री, क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲप किंवा माय जी ओ व्ही ओपन फोरमवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे ९८ टक्के झाला आहे. धरणात सध्या १५ हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु असून, उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असून, विविध मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारे देखावे बघण्यासाठी नागरीकांची झुंबड उडत आहे.

दरम्यान, दीड दिवसाच्या गणपतींच काल विसर्जन झालं. ठिकठिकाणी गणेश विर्सजनासाठी महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली होती.

नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. नागरिकांनी या तलावात दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं.

****

श्रोते हो, विविध देशात कशारितीने गणेशोत्सव साजरा केला जातो हे आपण जाणून घेत आहोत. श्रीलंकेत कोलंबो मधल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती सांगत आहेत, तिथे राहणार्या, मीनल रेणावीकर,

‘‘श्रीलंकेमध्ये यावर्षी आम्ही पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. इथेही हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहाय्य केलं. इथल्यां कारुगराकडून डाव्या सोंडेची सुंदर दोन फुटाची मूर्ती बनवून घेतली. येथील श्रीलंकन मुलांना आपल्या लेझिमचे प्रशिक्षण देऊन आणि सिंहली ढोल पथकांच्या सहाय्याने ढोल, ताशा, लेझिमच्या गजरात बाप्पाचं विसर्जन केलं. हा सोहळा इंडियन हाय कमिशनच्या स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर, कोलंबो, येथे दणक्यात साजरा झाला. या गणेशोत्सवाला भारतीय बांधव तर प्रचंड संख्येनी उपस्थित होतेच, पण श्रीलंकन, तमिळ, सिंहलीज आणि काही फ्रेंच नागरीकही उपस्थित होते.’’

****

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा काल शानदार सोहळ्यानं समारोप झाला. यावेळी पॅरिस प्रशासनाने पॅरालिम्पिक ध्वज आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष ॲण्ड्र्यू पार्सन यांच्याकडे सोपवण्यात आला, त्यांनी हा ध्वज लॉस एंजेलिस प्रशासनाकडे सोपवला. २०२८ च्या पॅरालिम्पिक स्पर्धा लॉस एंजेलिस मध्ये होणार आहेत. या समारोह सोहळ्यात सुवर्ण पदक विजेते तीरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल हे भारतीय पथकाचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्यपदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन पदकतालिकेत सोळावं स्थान पटकावलं. या स्पर्धेच्या इतिहासात ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.

****

राज्य शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, एक्वाडाम, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, व्हाय वेस्ट आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने युवा सहभाग जलप्रबंधन कार्यक्रम राज्यात राबवला जात आहे. या अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथल्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रीन क्लबला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय महाराष्ट्र शासनाचं पुरस्कार नामांकन घोषित झालं आहे. या मोहिमेत वेगवेगळ्या पद्धती वापरून अंदाजे ४० दशलक्ष घनमीटर पाणी वाचण्याची संकल्पना आहे.

****

धाराशिव इथं अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीनं काल भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या जलभूमी व्यवस्थापन संस्थेचे माजी प्रमुख डॉक्टर रमेश पांडव यांचं यावेळी भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय या विषयावर भाषझालं. सामाजिक न्याय - संविधानाच्या प्रकाशात बघण्याची गरज, त्यांनी व्यक्त केली.

****

अंबाजोगाई इथल्या नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानचा नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार प्राध्यापक डॉ. तसनीम पटेल यांना आज अंबाजोगाई इथं प्रदान केला जाणार आहे. २१ हजार रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनादूत उपक्रमासाठी परभणी जिल्ह्यातून एकूण ९७२ योजनादूतांची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे.

****

हवामान

येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...