Monday, 9 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 09.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 September 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०९ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेची चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या वर्षी जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत लोखंड, पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर बारा टक्के समान जीएसटी दर लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य जनतेल्या पुरवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटं, बॅटरी-संचलित कार सेवा अशा सेवांवर जीएसटी लागू केला जाऊ नये अशीही शिफारस या परिषदेनं केली होती.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौर्यावर असून, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीची आरती करुन दर्शन घेतलं. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानासह, मुंबईतल्या विविध भागातल्या गणेश मंडळांना भेट देणार आहेत.

दरम्यान, शाह यांच्या उपस्थितीत काल मुंबईत राज्यातल्या प्रमुख भाजप नेत्यांची विशेष बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

****

महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं आयोजित सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्याअंतर्गत सातव्या दिवसापर्यंत देशभरात एक कोटी ७९ लाखापेक्षा जास्त उपक्रम राबवले गेल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. यात नवजात बालकांसाठीच्या पूरक आहाराशी संबंधित २० लाखापेक्षा जास्त उपक्रमांचा समावेश होता.

****

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं आजपासून उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथं दोन दिवसीय राष्ट्रीय आढावा परिषद आयोजित केली आहे. चिंतन शिबिर नावाच्या या परिषदेत देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सामाजिक न्याय आणि समाजकल्याण विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. उपेक्षित समाजाच्या कल्याणाच्या उद्देशानं विविध योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीवर या शिबिरात चर्चा करण्यात येईल.

****

शेतमाल तारण कर्ज योजनेमुळे राज्यातल्या शेतमालाला वाढीव बाजारभाव मिळाल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा शेतकर्‍यांना होत आहे. शिवाय बाजार समित्यांच्या उत्पन्नातही वाढ होत असल्यानं, या योजनेला शेतकरी आणि बाजार समित्यांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. राज्य कृषी पणन मंडळाच्या २०२३-२४ या हंगामामध्ये राज्यातल्या ६७ बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेत सहभाग घेतला. त्यामध्ये सुमारे दोन लाख ७७ हजार क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल तारणात स्वीकारला. त्यावर ३६ कोटी ३४ लाख २४ हजार रुपयांच्या कर्जाचं वाटप शेतकर्‍यांना करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. येत्या १३ सप्टेंबर रोजी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली.

****

सांगली जिल्ह्यातल्या तासगावच्या श्री गणपती पंचायतनचा, २४५वा रथोत्सव आणि संस्थानच्या दीड दिवसाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा काल पार पडला. गणपती मंदिर ते जवळच्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात भाविकांहस बाराबलुतेदारांनी हा रथ ओढला. रथासमोरचे मानवी मनोरे, झांजपथक यामुळे हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे पाच लाख रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलीसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणात साडे ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. आज दुपारी धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून तीन हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. नदीकाठावरील गावातल्या नागरीकांनी सतर्कता बाळगावी, कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये, असं आवाहन जायवाडी धरणाच्या नियंत्रण कक्षानं केलं आहे.

****

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या मांजरा धरणात ५३ पूर्णांक ३४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लातुर शहरासह बीड जिल्ह्यातल्या केज, अंबाजोगाई तसंच धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहराचा देखील पाणी प्रश्न मिटला आहे. याशिवाय मांजरा धरणावर आधारित असलेल्या शेतीसह सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या शंभर टक्के पाऊस झाला आहे. शिवाय जिल्ह्यात तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरू, देवर्जन, साकोळ, घरणी, मसलगा अशा मध्यम प्रकल्पात देखील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर भागातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 22 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...