Tuesday, 10 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.09.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 September 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      कर्करोगाच्या औषधांवरच्या जीएसटीत सात टक्के कपात-मंकीपॉक्सच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी करण्याचे केंद्राचे निर्देश

·      राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान

·      महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतल्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात १९ टक्के वाढ 

·      आज घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन-ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलल्या

आणि

·      पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या बारा दरवाजातून सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू

****

कर्करोगा औषधांवरचा जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर १२ वरुन पाच टक्के करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. काल नवी दिल्लीत परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. फरसाण आणि इतर पदार्थांवर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के जीएसटी लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्य विम्यावर लादलेला १८ टक्के जीएसटी कमी करण्याचा मुद्दा मंत्र्यांच्या गटाकडे पाठवला आहे. त्यांना ऑक्टोबरपर्यंत शिफारशी सुचवायला सांगितल्या असून, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

****

मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या रोगाबाबत जनतेत असलेली भीती दूर करण्यासाठी तसंच जनजागृतीसाठी उपाय योजावेत, असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं एकंदर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असून, याबाबत सर्व राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितलं आहे.

****

मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर येत्या ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकाकर्ते मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी ही माहिती दिली.

****

शाळा, शालेय आवार तसंच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. या समितीनं २९ ऑक्टोबरपर्यंत आपल्या शिफारशी आणि सूचनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****

शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. काल मुंबईत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानात शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेऊन ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील. मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाच्या ॲपचं आज लोकार्पण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ही घोषणा केली. मार्च २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही वाढ लागू करण्यात आली आहे. महानिर्मिती कंपनीतील कामगारांनी ई.एस.आय.सी.ची वेतन मर्यादा ओलांडली असल्याने आता ऊर्जा विभागाच्या सर्व कंपन्यातील कंत्राटी कामगारांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा लागू करण्यात येत असल्याचंही फडणवीस यांनी जाहीर केलं.

****

प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये मंजूर आकृतीबंधाच्या ५० टक्के जागा मिळणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या या मागणीला काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. परळीतल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तसंच मागण्या प्राधान्यानं सोडवल्या जातील, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं.

****

राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून, शहरातल्या लोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजक तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. राजकीय पक्षांचे जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांना देखील चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास राज्यपालांचं शहरात आगमन होईल.

****

राज्यातल्या सगळ्या आदिवासी संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढच्या एकत्रित वाटचालीच्या दृष्टीनं राज्यात जळगाव, मनमाड आणि नागपूर इथे जाहीर कार्यक्रम घेणार असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं.

****

अखिल भारतीय मजलिस - - इत्तेहादूल मुसलमिन - एआयएमआयएम पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यामध्ये प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील, मालेगावातून आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, धुळे इथले आमदार फारुख शहा, सोलापूर इथून फारुख शाब्दी, तर मुंबई इथून रईस लष्करिया यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं ओवेसी यांनी सांगितलं.

****

नंदुरबार इथं काल बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांच्या बालसहकाऱ्यांच्या ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हा प्रशासनासह, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्थळावर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

****

गणेशोत्सवात आज घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होत आहे. घरोघरच्या विविध पद्धतींनुसार आज गौरींची स्थापना होईल, उद्या गौरी पूजन आणि परवा गौरी विसर्जन होईल. तीन दिवसांच्या या सोहळ्यात गौरी पूजनाचं सर्व साहित्य, नैवेद्यासाठी भाज्या आणि फळांसह, विविध प्रकाराच्या फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. विविध साहित्य खरेदीसाठी महिला वर्गाची बाजारपेठेत गर्दी झाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती काल शेतकरी, पोलीस तसंच स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल मुख्यमंत्री शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणेशाचं दर्शन घेतलं. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजासह इतरही गणेश मंडळांना शहा यांनी भेट दिली.

****

परदेशात गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, याचा आपण दररोज आढावा घेत आहोत. आज आपण जपानमध्ये टोक्यो इथल्या गणेशोत्सवाबाबत तिथे राहणाऱ्या प्राची धर्मे यांच्याकडून जाणून घेत आहोत...

आमच्या काही मित्रांच्‍या घरी गणपतीच्या मातीच्या सुंदर मूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली जाते. आम्ही बाप्पासाठी घरच्या प्रमाणे पारंपारिक पद्धतीने पदार्थ प्रसाद बनवतो. आणि त्यात अशा काही जपानी पदार्थांचाही समावेश करतो. प्रत्येकजण आपल्याला शक्य असेल तसं इथं असलेले भारतीय कुटुंब किंवा मित्रांच्या घरी तर काही जणं कम्युनिटी हॉलमध्ये जमतात आणि गणेशोत्सव साजरा करतात. या उत्सवानिमित्त आम्ही विविध उपक्रम आयोजित करतो. आणि विशेष म्हणजे या सांस्कृतिक देवाणघेवाणीत सामील होण्यासाठी आमचे जपानी मित्र सुद्धा आमच्या सोबत या उत्सवात सहभागी होतात.

****

हिंगोली जिल्ह्यात एक हजार चारशे चौसष्ट ठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. तर ७१० पैकी ३०५ गावांनी 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबवली आहे.

****

अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळेल, असं आश्वासन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलं आहे. काल नांदेड, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या नुकसानाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून अहवाल पाठवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात १२ हजार ७४५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, पाणी साठा साडे ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीवरचा नियोजित खरबी वळण बंधारा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.

****

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठीमुख्यमंत्री योजनादूतहा उपक्रम सुरू करण्यात आला असून, यात सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार चारशे शहाऐंशी जणांनी यासाठी नोंदणी केली आहे. या योजना दूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातल्या तेरखेडा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याला शासकीय मान्यता मिळाली आहे. आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी या आरोग्यविषयक महत्त्वाच्या मागणीला एक महिन्याच्या आत तात्काळ मंजुरी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 25 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...