Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 September
2024
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १० सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
आज घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होत आहे. घरोघरच्या विविध पद्धतींनुसार आज गौरींची स्थापना होईल, उद्या गौरी पूजन आणि परवा गौरी विसर्जन होईल. तीन दिवसांच्या या सोहळ्यात गौरी पूजनाचं सर्व साहित्य, नैवेद्यासाठी भाज्या आणि फळांसह, विविध प्रकाराच्या फुलांनी छत्रपती संभाजीनगरमधील बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. विविध साहित्य खरेदीसाठी महिला वर्गाची बाजारपेठेत गर्दी झाली आहे.
****
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि
मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना”
राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे तसेच त्यांचा जास्तीत
जास्त नागरिकांना लाभ पोहचविण्यासाठी ५० हजार योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली
आहे. योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय
यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नेमणूक केलेल्या योजनादूतांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून
देण्यात येणार आहे. तसेच योजनादूतांच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात
येणार आहे.
****
मृत्यूनंतर एका व्यक्तीनं केलेलं अवयवदान अनेकांसाठी
आयुष्य देणारं ठरतं. त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प घेऊन मरावे परी अवयवरुपी
उरावे हे ब्रीदवाक्य अंगीकारावं, असं आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. अकोला कृषी
उत्पन्न बाजार समिती इथे आयोजित अवयवदान जनजागृती महाअभियान सोहळ्यात ते बोलत होते.
अकोला जिल्ह्यात १६ हजार नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. हा संकल्प एक विक्रम
असून, अकोला जिल्ह्याप्रमाणे
देशभरातील नागरिकांनी अवयवदान करण्याचा संकल्प घेतल्यास गरजूंना त्याचा लाभ होईल असं
ते म्हणाले. ही चळवळ जनमानसात रुजवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन मंत्री
प्रतापराव जाधव यांनी केलं. नेत्रदान आणि अवयवदानाचा संकल्प घेतलेल्या व्यक्तींचा कृतज्ञता
पत्र देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
****
अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन
करण्यात येणार आहे. थोड्या वेळात म्हणजे साडे अकरा वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल.
****
शाळांमधील मुला-मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अकोला जिल्ह्यातील १ हजार ८२५ शाळांमध्ये गेल्या
६ तारखेपर्यंत सखी सावित्री समित्या गठीत करण्यात आल्या असून शाळा स्तरावरील या समित्यांकडून
विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची कारवाई
करण्यात येणार आहे. अलीकडच्या कालावधीत घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये या समित्या
गठीत करण्याची उपयुक्तता अधिक वाढली आहे. त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि अनुदानित तसंच विनाअनुदानित
१ हजार ८३५ पैकी १ हजार ८२५ शाळांमध्ये सखी सावित्री समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात १५
हजार ४६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, पाणी साठा साडे ९८
टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
राज्यपाल सी
पी राधाकृष्णन आज
छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून, शहरातल्या लोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजक तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते
चर्चा करणार आहेत. राजकीय पक्षांचे जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांना देखील चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास राज्यपालांचं शहरात आगमन होईल.
****
कर्करोगा औषधांवरचा जीएसटी
अर्थात वस्तू आणि सेवा कर १२ वरून पाच
टक्के करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. काल नवी दिल्लीत परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. आरोग्य विम्यावर लादलेला
१८ टक्के जीएसटी कमी करण्याचा मुद्दा
मंत्र्यांच्या गटाकडे पाठवला आहे.
त्यांना ऑक्टोबरपर्यंत शिफारशी
सुचवायला सांगितल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment