Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 September
2024
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते आज सकाळी सेमीकॉन इंडिया २०२४ या परिषदेचं उद्घाटन करण्यात
आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आजचे युग हे सिलिकॉन डिप्लोमसीचे
युग आहे. हा कार्यक्रम योग्यवेळी ठेवण्यात आला आहे. आज भारत सर्वच क्षेत्रांमध्ये
जगाला आत्मविश्वास निर्माण करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत
पोहोचण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. सेमीकंडक्टर संबंधित पायाभूत सुविधांवर आम्ही लक्ष केंद्रित
केले आहे. भारतात डेटा सेंटरची मागणी सातत्याने वाढत आहे. ती पूर्ण केली जाईल.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी, राज्य शासनाने
भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. "मुख्यमंत्री
तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे
नांदेडहून २० ते २२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी
प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह
विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी
दिली. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७०० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २००
अर्ज पात्र ठरले आहेत. यातील १०० ज्येष्ठांनी अयोध्या दर्शनाचा पर्याय निवडला
आहे तर ७० हून अधिक ज्येष्ठ तिरुपती बालाजी दर्शनासाठी इच्छुक आहेत. अयोध्यासमवेत
नांदेडहून अमृतसर इथल्या सुवर्णमंदिर दर्शनासाठीही तयारी केली जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेअंतर्गत
ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
****
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रकाशयोजनेतील जागतिक आघाडीवर
असलेल्या सिग्नीफायने देशातील सर्वात मोठ्या प्रदीप्त मोदकांचे अनावरण केले आहे. मुंबईत
स्थापन झालेल्या या प्रदीप्त मोदकाचे नाव एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले
गेले आहे. १६ फूट उंच आणि ४ फूट पायथ्याशी असलेल्या या मोदकाला प्रकाश देण्यासाठी फिलिप्सचे
दिवे लावण्यात आले आहेत. हा मोदक ७ सप्टेंबरपासून पुढील ११ दिवसांसाठी चिंतामणी गणपती
मंडळ आणि मुंबईतील लाल बागचा राजा चौकात बसवण्यात आला आहे.
****
लातूर महानगरपालिकेने
गेल्या ५ दिवसात शहरातून एक हजार ६४० मेट्रिक टन कचरा उचलला आहे. आगामी ८ दिवसात
उर्वरित कचरा उचलण्याची ग्वाही मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी
नियुक्त संस्थेच्या कंत्राटाचा कालावधी संपला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर
घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी संस्था नेमण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचं, महापालिकेकडून
सांगण्यात आलं आहे.
****
नवी मुंबई महापालिकेचे 'पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय
आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आरोग्य
आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची १ जुलै रोजी दिल्ली येथे भेट घेऊन तात्काळ
परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती.
****
भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने
नदी, नाल्यांना पूर आला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखिल तुटला आहे. जिल्ह्यातील
जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे
२७ दरवाजे दीड मीटरने तर ६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. या पावसामुळे नदीकाठावर
असलेल्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात
आला आहे. तर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी
जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या विविध
भागात मुसळधार पाऊस पडल्यानं १७ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. विविध भागात
अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भात येत्या
२४ तासात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे
वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment