Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date 11 September
2024
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ११ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पाकिस्तानी सैन्याने आज जम्मू जिल्ह्यातील
अखनूर सीमेवरील भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला आणि युद्धविराम कराराचे उल्लंघन
केले. या गोळीबारास बीएसएफच्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. सीमा सुरक्षा दलाचा
एक जवान या बेछूट गोळीबारात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल
करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. ते म्हणाले
की, सैनिक हाय अलर्टवर आहेत आणि आंतरराष्ट्रीय सीमा तसच नियंत्रण रेषेवर
कडक नजर ठेवत आहेत.
****
राज्यातले शेतकरी फळ लागवडीस
मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत असून भौगोलिक मानांकनं प्राप्त फळांच्या लागवडीस विशेष
चालना देण्याच्या दृष्टीने विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना फलोत्पादन मंत्री
दादाजी भुसे यांनी दिल्या. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासंदर्भात मंत्रालयात
आयोजित आढावा बैठकीत काल मंत्री भुसे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मार्गदर्शन
केलं. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना फळांवरील प्रक्रियेच्या माध्यमातून
अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने विभागानं नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. डाळिंबाच्या
फळापासून रस निर्मितीच्या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषी विद्यापीठांनीही
या संदर्भात संशोधनाचे पूरक तपशील नवीन उपक्रमासाठी घ्यावं, शेतकऱ्यांना
सोयीचं ठरणारं कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्याचं नियोजन करावं, त्या-त्या तालुक्यातील
फलोत्पादन पद्धतीनुसार फळ लागवड करण्यास प्रोत्साहन द्यावं, अशा सूचना
दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या.
****
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात
सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत ३० कोटी रुपये निधी वितरित करण्यास कृषी विभागाने
मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील
शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ
मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा
सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत २०२४-२५ या आर्थिक
वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये केलेल्या तरतुदीतून
३० कोटी रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
****
ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट
सिस्टिम असलेल्या खाजगी वाहनांना राष्ट्रीय महामार्ग तसंच एक्स्प्रेस वे वर दररोज २०
किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. २००८ मधील राष्ट्रीय महामार्ग
शुल्क नियमात दुरुस्ती करुन रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं हा आदेश जारी केला
आहे. जीएनएसएस प्रणाली असलेल्या वाहनांनाच २० किलोमीटर इतक्या अंतराच्या प्रवासासाठी
ही सवलत असेल. २० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना पूर्ण अंतराचं शुल्क द्यावं
लागेल.
****
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या
समारंभाची पूर्वतयारी बैठक बीड इथे निवासी उप जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या
अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी
शैलेश सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार आणि
संबधित विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी
यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासंबधी सर्व संबंधित विभागास
कार्यक्रमाच्या पुर्वतयारीसाठी सूचना दिल्या.
****
एकपात्री, नाट्य, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमातून गेली पन्नासहून अधिक वर्षे रसिकांचं मनोरंजन करणारे
जेष्ठ रंगकर्मी, हास्य कलाकार दिलीप हल्याळ
यांचं काल पुण्यात हृदयविकारानं निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. बंपर लाफ्टर, नजराणा हास्याचा या कार्यक्रमातून त्यांनी रसिकांची मनं जिंकली. एकपात्री कलाकार परिषदेचे ते माजी अध्यक्ष होते.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला
जाणार आहे. त्या निमित्ताने नांदेड तसंच हिंगोलीसह अनेक ठिकाणी 'स्वच्छता ही सेवा' ही मोहीम १७
सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबवण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment