Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 September
2024
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
दिल्लीचे
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण
सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला आहे. दहा लाख रुपयांच्या
जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी केजरीवाल यांना
कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करता येणार नाही तसंच कार्यालयात जाऊन कोणत्याही सरकारी
कागदपत्रांवर स्वाक्षरी करता येणार नाही या अटींवर जामीन मंजूर करण्यात आल्याचं न्यायालयानं
दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, केजरीवाल
यांना मिळालेल्या जामीनातून देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम असल्याची बाब स्पष्ट
झाली असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे.
****
काँग्रेस
नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाबाबत केलेल्या
वक्तव्याविरोधात भरतीय जनता पक्षातर्फे आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात
येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या
नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात चेंबूर
इथं मूक आंदोलन तसंच, अकोल्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
****
शासनाच्या
विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या
उपक्रमासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या उपक्रमासाठी आतापर्यंत एक लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी
नोंदणी केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक
पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा
महिन्यांसाठी निवड केली जाणार असून, या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिलं
जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी
www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातल्या जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील
संशोधन आणि प्रशिक्षणासाठी, कोल्हापूरच्या सीमा बायोटेक, आणि भारत सरकारच्या
इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर, या दोन संस्थांशी
सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल या
करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
****
लातूर जिल्ह्यात
उद्यापासून दोन ऑक्टोबरपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवण्यात येणार
आहे. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ करावा, असं
आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. या अभियानाच्या आढावा बैठकीत
त्या काल बोलत होत्या. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त प्रभात फेरी काढून स्वच्छतेबाबत
जनजागृती करावी असं आवाहनही घुगे यांनी केलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात
जलसंधारणाच्या उकृष्ट कामगिरीबद्दल मोताळा तालुक्यातल्या शेलगाव ग्रामपंचायतीला
राज्य शासनाचा अटल भूजल योजनेंतर्गत सुरु असलेल्या भूजल ग्रामसमृद्ध स्पर्धेत बक्षिस
मिळालं आहे. काल नाशिक इथं झालेल्या कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव
पाटील यांच्या हस्ते शेलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी हे बक्षिस स्वीकारलं.
****
बीड
जिल्ह्यात अंबाजोगाई नगरपालिकेतर्फे यावर्षी गणेश विसर्जनासाठी शहरात तीन कृत्रिम
हौद तयार करण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी ही
माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यात “एक पेड
मां के नाम” या अभियानांतर्गत येत्या मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात
येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्याचे छायाचित्र मेरी लाईफ
पोर्टलच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहन शासनातर्फे करण्यात आलं आहे. या
अभियानांतर्गत राज्यात मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट आहे.
****
मनमाड - काचिगुडा अजिंठा
एक्सप्रेस आता मनमाड स्थानकावरून दररोज रात्री आठ वाजून ४० मिनिटांनी म्हणजेच सध्याच्या
वेळेपेक्षा दहा मिनिटं लवकर सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून ही
माहिती देण्यात आली.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विविध कार्यक्रमामध्ये लेझर
लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. येत्या ११ नोव्हेंबर
पर्यंत ही बंदी लागू असेल, असे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केले आहेत.
****
पैठण इथल्या
जायकवाडी धरणाचे आणखी दोन दरवाजे आज बंद करण्यात आले असून, विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या चार दरवाजातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
येत्या
दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात
तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment