Friday, 13 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.09.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 September 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      हवाई वाहतूक क्षेत्रात लक्षणीय परिवर्तनामुळे प्रवास अधिक सुखकर-पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसोबत सामंजस्य करार

·      एसटी महामंडळाला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा

·      मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी खासदार सीताराम येचुरी यांचं निधन

आणि

·      जायकवाडी धरणाच्या विसर्गात कपात तर मांजरा धरणाचा पाणी साठा ७५ टक्क्यांवर-नागरिकांना सतर्कतेचा इशारा

****

देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन होत असून, त्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत नागरी विमान वाहतूक या विषयावर दुसऱ्या आशिया- प्रशांत मंत्रिपरिषदेत मार्गदर्शन करत होते. या परिषदेत दिल्ली ठराव जाहीर करण्यात आला. त्याचा सर्व सदस्य देशांनी स्वीकार केला.

****

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं प्रतिपादन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. तरंग शक्ती २४ या युद्धाभ्यासासह भारत रक्षा विमानन प्रदर्शनाला राजस्थानात जोधपूर इथं कालपासून प्रारंभ झाला. या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. वायूसेनेनं सदैव संपूर्ण जगभरात देशाचा मान वाढवला असल्याचं राजनाथसिंह यांनी नमूद केलं. तरंग शक्ती सरावाचा हा दुसरा अंक असून त्यात १० देश सहभागी झाले आहेत.

****

जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचं काल ओडिशातल्या बालासोर जिल्ह्याच्या चांदीपूर इथं यशस्वी परीक्षण करण्यात आलं. कमी अंतरावरच्या लक्ष्याचा वेध घेणारं हे क्षेपणास्त्र युद्धनौकांवर वापरलं जाणार आहे.

****

मुंबई महानगर क्षेत्रः जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकासया नीती आयोगाच्या अहवालाचं काल मुंबईत प्रकाशन करण्यात आलं. यावेळी MMRDA अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी दुप्पट होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकला जोडणाऱ्या कनेक्टरचं काल लोकार्पण करण्यात आलं. यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता अवघ्या १० मिनिटात पूर्ण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा झाला आहे. राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास तसंच सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करत असल्याचं, महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

****

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी खासदार सीताराम येचुरी यांचं काल दिल्लीत निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. श्वसनमार्गात संसर्गामुळे त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. येचुरी यांचा पार्थिव देह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दिल्लीतल्या मुख्यालयात उद्या सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर येचुरी यांचा देह रुग्णालयाला दान केला जाणार आहे

येचुरी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ भालचंद्र कांगो यांनी, येचुरी यांच्या निधनानं डाव्या चळवळीची हानी झाल्याची भावना व्यक्त केली.

‘‘अत्यंत मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता. विशेषत कम्युनिस्टामध्ये फार कमी गुण असतात की पक्षाच्या बाहेर लोकांना त्यांच्या बद्दल आपले पण वाटते. सिताराम येचुरी असे एक नेते होते की त्यांच्या वक्तृत्व गुणांमुळे आणि त्यांच्या पर्सनॅलिटीमुळे ते अनेकांना आपले हवेहवेसे वाटत होते. मला असं वाटतं की हे फार महत्वा त्यांचं योगदान होतं की कम्युनिस्ट पक्षाचे पुढारी असतांना फक्त वर्गीय पुढारी न राहता ते आम जनतेचे पुढारी झाले होते. त्यामुळे त्याचं नसणं हे डाव्या चळवळीला फार मोठी हानी आहे असं माझ मतं आहे.’’

भाकपचे राज्य सह सचिव राम बाहेती यांनी, येचुरी यांच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळीची मोठी हानी झाल्याचं, तर अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर यांनी, कम्युनिस्ट चळवळीतला प्रगल्भ तारा हरपला, असं म्हटलं आहे. भाकप राज्य कार्यकारिणीचे सदस्य विधीज्ञ अभय टाकसाळ यांनी, येचुरी यांचा प्रभावी आवाज आणि मुद्देसूद मांडणी देशाच्या कायम स्मरणात राहील, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

****

हिंगोली जिल्ह्यातले मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक पुरभाजी सखाराम हेंद्रे यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. आज आखाडा बाळापूर इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यासंदर्भात काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाचं भूमिपूजन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातल्या तारांगणाचं उद्घाटन, विविध रस्ते तसंच विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं ई भूमिपूजन होणार आहे.

****

काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने काल नागपूर इथल्या संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. गांधी यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर बीड जिल्ह्यातल्या परळी तसंच छत्रपती संभाजीनगर इथं आंदोलन करण्यात आलं.

****

शिवसेना जातीच्या नावाने उमेदवारांची चाचपणी करत नाही आणि करणार नाही, असं शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते बीड इथं पक्षाच्या आढावा बैठकीत बोलत होते. दरम्यान, दानवे यांनी काल धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. गाव पातळीपर्यंतच्या शिवसैनिकांशी त्यांनी काल संवाद साधला.

****

तीन दिवसीय महालक्ष्मी उत्सवाची काल सांगता झाली, गणेशोत्सवाची येत्या १७ तारखेला सांगता होणार आहे. गणेश विसर्जनासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरात ४६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापन केली आहेत. महानगरपालिकेला निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना अर्धा किलो खताचं पाकीट भेट म्हणून दिलं जाणार आहे.

****

हिंगोली इथं गणपती आणि गौरीसमोर वेगवेगळे देखावे साकारण्यात आले. माजी नगरसेवक चंदू लव्हाळे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मीच्या आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून महिला जनजागृतीचा संदेश देण्यात आला.

****

परदेशात गणेशोत्सव कसा साजरा होतो, याबाबत माहिती आपण जाणून घेत आहोत. ऑस्ट्रेलियातल्या गणेशोत्सवाबाबत मेलबर्न इथं राहणाऱ्या अनुपमा कट्यारे यांनी माहिती दिली...

‘‘गेल्या दहा - पंधरा वर्षात इथं फुलवाती, कापूर, हळद - कुंकू, एवढेच नव्हे तर अगदी पेण च्या गणपती मूर्ती देखील मिळू लागल्या आहेत. अगदी घरगुती पद्धतीने केलेल उकडीचे मोदकही इथे मिळतात. जसं जसं गणपती जवळ येतो, तसं तसं लोकांना मोठमोठ्या सुंदर - सुंदर मूर्ती दिसू लागतात. विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी, नोकरी- धंद्यानिमित्त आलेले नागरिक, असे सुमारे पाच सातशे जण यात सहभागी होतात. ढोल, ताशा पथकंही इथे आहे. घरगुती गणेशोत्सवामध्ये काही घरांमध्ये तर एकवेळी ७०-८० लोक एकत्र येऊन आरत्या म्हणत असतात. काही घरांमध्ये गौरी - गणपतीही होतात.’’

****

आशियाई पुरूष हॉकी स्पर्धेत भारतानं काल दक्षिण कोरियाचा ३-१ अशा फरकानं पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला भारत याआधीच उपांत्य फेरीत दाखल झाला. परवा १६ सप्टेंबरला उपांत्य सामने होणार असून, उद्या भारताची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. अंतिम सामना मंगळवारी १७ तारखेला होईल.

****

पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे बंद करण्यात आले आहेत. धरणाचा पाणीसाठी साडे ९८ टक्क्यांवर गेल्यानं तसंच पाण्याची आवक सुरू असल्यानं, धरणाच्या १८ दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला होता. सध्या धरणाच्या सहा दरवाजातून सुमारे तीन हजार शंभर घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात धनेगाव इथलं मांजरा धरण ७५ टक्क्यांपेक्षा अधिक भरलं आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक जास्त झाल्यास कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून मांजरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येईल, त्यामुळे संबंधित गावांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.

****

लातूर- धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माकणी इथल्या निम्न तेरणा धरणाची पाणी पातळी ६०३ पूर्णांक ५५ मीटर झाली आहे. पाण्याची होणारी आवक पाहता धरणातून पाणी सोडण्यात येऊ शकतं, त्यामुळे निलंगा तालुक्यातील तेरणा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे.

****

मनमाड - काचिगुडा अजिंठा एक्सप्रेस आता मनमाड स्थानकावरून दररोज रात्री आठ वाजून ४० मिनिटांनी म्हणजे सध्याच्या वेळेपेक्षा दहा मिनिटं लवकर सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विविध कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. येत्या ११ नोव्हेंबर पर्यंत ही बंदी लागू असेल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...