Saturday, 14 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.09.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 14 September 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

गृहमंत्री अमित शहा यांनी आज हिंदी दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. संविधान सभेनं १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलं. हिंदी दिवसाला ७५ वर्षे पूर्ण होत असून राजभाषा म्हणून हिंदी दिन साजरा केला जात असल्याचं त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे.

या वर्षीच्या हिंदी दिनाचे महत्त्व सांगून सर्व भारतीय भाषा या देशाचा अभिमान आणि वारसा आहे तसंच या भाषांना समृद्ध केल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये स्पर्धा नाही, हिंदी आणि सर्व स्थानिक भाषांत मित्रत्व आहे. प्रत्येक भाषा हिंदीला बळ देते आणि हिंदी सुद्धा गुजराती, मराठी, तेलगूसह सर्व प्रादेशिक भाषांनाही बळ देत असल्याचं गृहमंत्री म्हणाले. दरम्यान, राजभाषा हीरक जयंती उत्सवानिमित्त चौथी अखिल भारतीय राजभाषा परिषद नवी दिल्लीत होत असून अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं.

****

जम्मू-काश्मीर इथं आज सकाळी उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. क्रिरी भागातील चक-ए-टेप्पर या गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली. लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही तीन दहशतवाद्यांच्या मृत्यूसंदर्भात दुजोरा दिला आहे.

****

कांद्यावरील किमान निर्यात शुल्क हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळं राज्यातल्या हजारो कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कांद्यावरील निर्यात बंदी अगोदरच उठविण्यात आली होती, मात्र निर्यात शुल्क लावण्यात आलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत होतं असं ते म्हणाले. आता कांदा निर्यातीत लक्षणीय वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कांदा निर्यातीवरचे किमान शुल्क हटवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानले.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री लातूर विमानतळावर पोहचले असून  तिथून हेलिकॉप्टरने ते परांड्याकडे  रवाना झाले आहेत.  

****

येत्या सोमवारी १६ तारखेला साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद सणानिमित्त दिली जाणारी सार्वजनिक सुटी १८ तारखेला जाहीर करण्यात आली आहे. ईद निमित्त मुस्लिम बांधव जुलूस मिरवणूक काढतात, या पार्श्वभूमीवर १७ तारखेची अनंत चतुर्थी लक्षात घेता सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित राहण्यासाठी सुटीच्या तारखेत बदल करण्यात आल्याचं याबाबतच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद आज सुरु झाली आहे, या परिषदेचं उद्घघाटन खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते झालं. मराठवाड्याला सातत्यानं निसर्गाच्या  असमतोलतेचा अधिक फटका बसला आहे, या परिषदेच्या माध्यमातून निसर्ग आणि पायाभूत सुविधेचा समतोल राखण्यास सहाय्य होईल, अशी  अपेक्षा कराड यांनी याप्रसंगी व्यक्त केली. ग्रामीण विकासाला नवा दृष्टीकोन देणारी ही परिषद ठरेल, असा विश्वास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर गजानन सानप यांनी व्यक्त केला. शाश्वत विकास, पर्यावरण आणि समाज कल्याणासंबिधत प्रश्न आणि आव्हान या विषयावरील दोन दिवसीय परिषदेमध्ये ६०हून अधिक संशोधक उपस्थिती लावणार आहेत.

****

स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशात येत्या १७ तारखेपासून २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मोहिमेत कार्यालयं, आस्थापनांमध्ये स्वच्छता राखण्याच्या दृष्टिनं विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. स्वच्छता हा एक संस्कार बनावा, यासाठी यामध्ये प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

भालाफेकपटू नीरज चोप्रा आज ब्रुसेल्स इथं होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेत नीरज गेल्या वर्षी दुसऱ्या स्थानावर होता, तर २०२२ साली त्यानं ही स्पर्धा जिंकली होती. सध्या नीरज चोप्रा डायमंड लीग स्पर्धेच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

****

नागपूरच्या काटोल मार्गावरील रामदेव टेकडी इथल्या रामदेवबाबा विद्यापीठाच्या डिजिटल टॉवरचे उ‌द्घघाटन उद्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन्, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिनी, उद्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा दीक्षांत समारंभ होणार आहे. या २२ व्या दीक्षांत समारंभात एकूण १ हजार २२५ जणांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...