Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 14 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १४ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळेच देशभरात विविध क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम
क्रमांकावर-परंडा इथं महिला सशक्तीकरण अभियानात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
· राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थांमधल्या संविधान मंदिराचं उद्या उपराष्ट्रपतींच्या
हस्ते उद्घाटन-राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची
येत्या शुक्रवारी पंतप्रधानांच्या हस्ते स्थापना
· कलाकारांनी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यावर लक्ष केंद्रित करावं-अभिनेते सचिन पिळगावकर
यांचा सल्ला
आणि
· आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी मोहीम कायम
****
जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळेच देशभरात विविध क्षेत्रात
महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं
आहे. धाराशिव जिल्ह्यात परंडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला
सशक्तीकरण अभियानात मुख्यमंत्री आज बोलत होते. देशभरातल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी
५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. ते म्हणाले –
आज एकूण गुंतवणुकीच्या
५२ टक्के गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे. आपलं राज्य नंबर एकला आहे. महाविकास
आघाडी सरकारमध्ये आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर गेलं होतं. मला अभिमान आहे, तुमच्या शुभेच्छांमुळे,
आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर एकला आलं. आज जीडीपी असेल, परदेशी गुंतवणूक असेल,
उद्योग असेल या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आहे.
या कार्यक्रमापूर्वी धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी
तुळजाभवानी मातेची कवड्यांची माळ तसंच सन्मानचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं.
ज्येष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख यांच्या हस्ते पांडुरंगाची मूर्ती, वीणा आणि घोंगडी देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्यासह
अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी मुख्यमंत्र्यांना ओवाळून
राख्या बांधल्या.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचं मुंबईहून विमानानं लातूर
इथं आज सकाळी आगमन झालं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचं
स्वागत केलं. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
होते. लातूरहून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री परंडा इथं दाखल झाले. सायंकाळी मुख्यमंत्री
लातूर मार्गे मुंबईकडे रवाना झाले.
****
युवकांच्या हाताला काम देऊन त्यांना
प्रशिक्षित करून नवा आत्मविश्वास पेरण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त
ठरणार असल्याचं,
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज
धरणगाव इथं ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत नियुक्ती पत्र वाटप आणि रोजगार मेळाव्यात बोलत होते.
यावेळी २७४ प्रशिक्षणार्थीना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात
सहभागी होण्यासाठी येत्या १७ सप्टेंबरपर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी
महायोजनादूत डॉट ओआरजी या संकेतस्थळावर अर्ज करावा, असं
आवाहन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं केलं आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राज्यातल्या
४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं उद्या धनखड यांच्या
हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचंही
धनखड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२
ते १५ तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणीसह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधानावर आधारित
विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
केंद्र शासनाच्या ‘पीएम
विश्वकर्मा’
योजनेतून कुशल कारागिरांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून
या योजनेचा वर्षपूर्ती सोहळा येत्या २० सप्टेंबर रोजी वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या उपस्थितीत होणार आहे. अमरावती इथल्या पीएम मेगा टेक्सटाईल पार्कची पायाभरणीही
यावेळी आभासी पद्धतीनं होणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नियोजित सभास्थळाची
पाहणी करून संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.
पंतप्रधानांच्या या दौऱ्यात राज्यातल्या एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये
‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’ची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३ महाविद्यालयांचा
समावेश आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन
केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी ही माहिती दिली.
****
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला सर्व प्रकारची मदत करण्याची
ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते आज मुंबईत
पारसी समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. पारसी समुदायाची लोकसंख्या ५० हजाराच्या
खाली येऊ नये,
यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे, असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, ‘भगवान बुद्ध यांच्या मध्यम मार्गाद्वारे
भविष्यातील जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शन’ या विषयावरच्या एक दिवसीय संमेलनाला रिजिजू
यांनी संबोधित केलं. भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चाललं तर जगाचं नेतृत्व करणं
सोपं होईल,
असा विश्वास रिजिजू यांनी व्यक्त केला.
****
कलाकारांनी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी दिला
आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन च्या सभागृहात विद्यार्थ्यांशी
संवाद साधत होते. अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी
विचारलेल्या प्रश्नांना सचिन सुप्रिया यांनी दिलखुलास उत्तरं दिली. सचिन यांच्या गाण्यानं
कार्यक्रमाचा समारोप झाला.
****
आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतानं पाकिस्तानवर २-१
अशी मात करत,
या स्पर्धेतलं आपलं विजयी अभियान अबाधित ठेवलं. चीनमध्ये सुरू
असलेल्या या स्पर्धेत आज भारतीय संघाचे दोन्हीही गोल कर्णधार हरमनप्रितसिंहने केले.
यंदाच्या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला भारत याआधीच उपांत्य फेरीत दाखल
झालेला आहे. परवा १६ सप्टेंबरला उपांत्य सामने तर अंतिम सामना मंगळवारी १७ तारखेला
होणार आहे. या स्पर्धेत यापूर्वी भारत चार वेळा अजिंक्य ठरला आहे.
****
खाद्यतेलाच्या आयातीवर २० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्रानं
घेतला आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या निर्णयाबद्दल आभार
मानले आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादकांना अधिक किंमत मिळेल, असं
पटेल यांनी म्हटलं आहे. रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलावर
आयात शुल्क साडे बारा टक्क्यांवरून साडे ३२ टक्के करण्याच्या निर्णयाचंही पटेल यांनी
स्वागत केलं आहे.
****
****
लोकशाही अधिक बळकट, सक्षम
आणि समृद्ध करण्यासाठी प्रत्येकानं मतदान करण्याचं आवाहन अहमदनगरचे अतिरिक्त मुख्य
निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केलं आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात बेलगाव
इथं ‘युवा संवाद’
कार्यक्रमात बोलत होते.
****
नांदेड पोलिसांनी आज नवीन नांदेड भागात दोघा जणांकडून तीन गावठी
पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसं जप्त केले. या कारवाईत ६४ हजाराचा मुद्देमालही जप्त
करण्यात आला. या प्रकरणात बलबीरसिंघ प्रतापसिंघ जाधव आणि शेख आदिल शेख शकील या दोघांविरुद्ध
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून येता
२ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ
भारत दिवस” म्हणून साजरा केला जाणार आहे.
त्यानिमित्तानं येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा अभियान” राबवण्यात येणार असल्याची माहिती परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
नतिशा माथुर यांनी दिली आहे. यावर्षीच्या अभियानासाठी “स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता” ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा
बीड इथं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांच्या नेतृत्वात निषेध
आंदोलन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment