Monday, 16 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.09.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 16 September 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

ग्रीन फ्युचर आणि नेट झीरो अर्थात हिरवं भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. री इन्व्हेस्ट २०२४ या जागतिक नवीकरणीय उर्जा गुंतवणुकदार संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज गुजरातच्या गांधीनगर इथं बोलत होते. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर झालेल्या पॅरिस कराराचं लक्ष्य भारतानं ठरलेल्या कालमर्यादेच्या आधी नऊ वर्ष पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजनच्या क्षेत्रात जगात सर्वात पुढे राहण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. या संमेलनात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि नॉर्वे या देशांसह जगभरातल्या अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर असून, भुज ते अहमदाबाद या देशातल्या पहिल्या वंदे भारत मेट्रोला ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आठ हजार रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी देखील त्यांच्या हस्ते होत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान राज्यातल्या तीन नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करणार आहेत. यामध्ये पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

****

देशभरात आज ईद - - मिलाद - उन - नबी उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनांना बळ देण्यासाठी प्रेरित केलं, त्यांनी समाजात दया, मानवतेचा प्रसार केला असं सांगून राष्ट्रपतींनी मुस्लीम समुदायाला पवित्र कुराणातली शिकवण आत्मसात करण्याचं आवाहन केलं.

देशातला सद्भाव आणि एकजूट नेहमी कायम रहावी आणि सर्वत्र आनंद आणि समृद्धी नांदावी, अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही ईद निमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला हा सण त्यांच्या प्रेम, दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण करुन देतो, असं राज्यपालांनी आपल्या  याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, ईद निमित्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी आज, तर बीड जिल्ह्यात येत्या बुधवारी १८ तारखेला सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.

****

आज आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस पाळला जात आहे. पृथ्वीभोवती असलेल्या ओझोन वायुच्या मुलायम कवचामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पृथ्वीचं आणि तिच्यावरच्या सजीवसृष्टीचं रक्षण होतं. मानव वापरत असलेल्या अनेक रासायनिक पदार्थांमुळे ओझोन थराचं अत्यंत नुकसान होतं, असं मानलं जातं. माँट्रियल प्रोटोकॉल-वातावरण संरक्षणासाठी पुढे पडणारी पावलं, हा या वर्षीच्या या दिनाचा विषय आहे.

****

स्पर्धा परिक्षांना होणारा विलंब आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष यातून मार्ग काढणं अत्यावश्यक असल्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळ मागितला आहे. एका पत्रातून पवार यांनी ही मागणी केली आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिल्याची माहिती पवार यांनी आपल्या समाजमाध्यमावरुन दिली आहे.

****

दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची उद्या सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरातील विविध विसर्जन विहिरी आणि कृत्रिम तलावांची पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला.

लातूर इथं गणपती विसर्जनाच्या अनुषंगानं, जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षीततेच्या दृष्टीनं शहरातल्या विसर्जन मार्गावर वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे.

****

उद्या साजरा होणार्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधून 'मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा ७५ मिनिटांचा नाट्य माहितीपट आज सह्याद्री वाहिनीवर दुपारी २ वाजता प्रसारीत होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...