Tuesday, 17 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 17.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 17 September 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १७ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. निजाम आणि रझाकारांच्या अत्याचारांवर मात करत, एकजुटीनं लढलेल्या मराठवाड्यातील जनतेच्या संघर्षाचं स्मरण आपण आज करतो, असं शाह यांनी शुभेच्छासंदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, आज मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झालं. मराठवाड्याचा अनुशेष भरुन काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. गेल्यावर्षी छत्रपती संभाजीनगर इथं मंत्रिमंडळीच बैठक घेऊन यात पंचेचाळीस हजार कोटीपेक्षाही अधिक कामं सुरु करण्याचा निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी सुरु असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मराठवाड्यातील युवकांना रोजगार, पाणीटंचाई, यासारख्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्य कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध विकासयोजनांच्या कामांचं भूमीपूजन केलं. त्यानंतर शिंदे यांनी शासकीय रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी विभागाची पाहणी करुन डॉक्टरांशी संवाद साधला.

***

जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.

बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यानिमित्त जिल्ह्यातल्या पेडगांव इथं मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

***

धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सावंत यांनी हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

***

नांदेड इथं माता गुजरीजी विसावा उद्यानात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यानिमित्त जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला, तर लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.

***

हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

***

पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त सरकारकडून दोन ऑक्टोबरपर्यंत स्वच्छताही सेवा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सरकारी कार्यालये, सार्वजनिक जागा याठिकाणच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

***

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या वतीनं मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचं औचित्य साधत येत्या अठरा तारखेला मुंबईत वीस देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा होणार आहे.

****

आठव्या ‘भारत जल सप्ताहा‘ला आजपासून सुरुवात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दिल्लीत भारत मंडपम इथे या सप्ताहाचं उद्घाटन करणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात चाळीस देशांतल्या दोनशे प्रतिनिधींसह सुमारे चार हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात, जलक्षेत्रात काम करणारे शंभरहून अधिक स्टार्टअप्स आपापल्या संकल्पना मांडतील.

***

लातूर जिल्ह्यात औसा इथल्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्या बुधवारी होणार आहे. औसा शहरातल्या विजय मंगल कार्यालयात दुपारी होणा-या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन असतील. यावेळी औसा शहरातल्या तक्षशिला बुद्ध विहार ध्यान धारणा केंद्राचं लोकार्पण तसंच भव्य प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, उद्यान विकास आणि इतर  विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे.

***

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात उद्या १८ सप्टेंबर रोजी होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.

***

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यात ६ लाख २५ हजार १३९ अर्ज पात्र झाले आहेत. यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागात ४२ हजार ९७६ तर लातूर विभागात ७१ हजार ४७४ अर्ज पात्र झाले आहेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्ह्यांच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनानं केलं आहे.

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...