Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 18 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १९ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी-काँग्रेस
पक्षाचा विरोध
· चांद्रयान-४, व्हिनस ऑर्बिटर तसंच रबी हंगामासाठी खतांच्या
अनुदालाही केंद्राची मान्यता
· राज्यभरात ३१ ऑक्टोबरपर्यंत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन
आणि
· गणपती विसर्जनानंतर मुंबईत सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्याचं संकलन
****
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं
मंजुरी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासाठीचं विधेयक संसदेत सादर केलं जाणार
आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य
संस्था अशा दोन टप्प्यात निवडणुका होतील, असं वैष्णव यांनी सांगितलं.
ते म्हणाले –
इसका इम्पिमेंटेशन दो फेजेस्
में होगा। फर्स्ट फेज मे लोकसभा और असेंब्लीज के इलेक्शन्स को कराने प्रयास है। और
उसके सेकंड फेज मे लोकल बॉडी इलेक्शन विधीन हंड्रेड डेज ऑफ जनरल इलेक्शन के करवाना
है। जिससे की एक बार में सारे इलेक्शन का प्रोसेस कंप्लीट हो और अगले पांच साल मे सब
के सब देश के निर्माण मे लगे रहे। जो कमिटी की रिकमेंडेशन्स है, उनको पुरे देश भर मे
डिस्कशन किया जायेगा। मल्टीपल इसके जो इंम्पॅक्टस् है, उन सब के उपर डिस्कशन्स करें।
और एक इम्प्लिमेंटेशन ग्रुप इसके बाद मे डेव्हलप किया जायेगा, जिससे लीगल प्रोसेस से
इसको इंम्प्लिमेंट करे।
काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेतले विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन
खरगे यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा लोकशाहीवर घाला असल्याचं सांगत, देशात जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा तेव्हा निवडणूक
घ्यावी लागेल,
असं खरगे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, आज केंद्रीय मंत्रिमंडळानं महत्त्वाचे
इतरही अनेक निर्णय घेतले. चंद्रावरुन पृथ्वीवर परतण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी
चांद्रयान-४ तसंच व्हिनस ऑर्बिटर अर्थात शुक्र कक्षा मोहिमेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी
दिली. रबी हंगामासाठी फॉस्पेट आणि पोटॅश खताकरता २४ हजार कोटी रुपये अनुदान, पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण योजना सुरू ठेवणं, ७९
हजार १५६ कोटी रुपयांचं पंतप्रधान आदिवासी उन्नत ग्राम अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं
आज मंजुरी दिली.
ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस् आणि गेमिंग
संदर्भात एका राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला तसंच जैवतंत्रज्ञान संशोधन नवाचार आणि
उद्योगविकास योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव
यांनी दिली.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर
केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेचा आज शुभारंभ झाला.
नवी दिल्ली इथं झालेल्या या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नागपूर जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग
होता. नागपूरमधल्या बेलतरोडी इथल्या स्कूल ऑफ स्कॉलर्सचे विद्यार्थी या सोहळ्याचं दूरदृश्य
यंत्रणेच्या माध्यमातून सहभागी झाले.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत
विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीनं ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात मोफत सामुदायिक आरोग्य
शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांमध्ये सुमारे दीड हजार रुग्णालयांचा समावेश
असणार आहे. वैद्यकीय शिक्षण संस्था, धर्मादाय रुग्णालयं, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि लोक सहभागातून ही आरोग्य शिबीरं घेतली जाणार
आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित या शिबीरांच्या माध्यमातून
२५ हजारांहून अधिक ठिकाणी ४० लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्यांचं उद्दीष्ट निर्धारीत
करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं छावणी भागात महिला आणि बालकांसाठी
१०० खाटांचं रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या
हस्ते या रुग्णालयाचं आज लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या
कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर तसंच मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र
जाधव यावेळी उपस्थित होते. या रुग्णालयात महिला आणि बारा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांवर
आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातील, तसंच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी
शिवभोजन व्यवस्था करण्यात आल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं.
****
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह
वक्तव्य करून धमकी देणारे भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात अमरावतीत गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार
बळवंत वानखेडे,
यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त
कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘एक पेड मां के
नाम‘ अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या
प्रादेशिक कार्यालयांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास सात हजार झाडं लावली आहेत. आकाशवाणीच्या
छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रातही या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवड्याला आजपासून नवी मुंबईत सुरूवात करण्यात
आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, ‘स्वच्छ महाराष्ट्र मिशन’चे राज्य संचालक नवनाथ वाठ यांच्यासह स्वयंसेवी संस्था
प्रतिनिधी,
एनएसएसचे विद्यार्थी, शालेय
विद्यार्थी,
महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं
उपस्थित होते.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं काल विविध चौपाट्यांवर, समुद्र किनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवून ३६३ मेट्रिक टन तर नैसर्गिक आणि कृत्रिम
विसर्जन स्थळांवरून एकूण सुमारे
५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलित केलं. या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केलं जाणार
असून,
महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये हे वापरण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४६ गणेश मूर्ती संकलन केंद्रावर
एकूण २८ हजार ३२ मूर्ती संकलित करण्यात आल्या, यापैकी
२४ हजार २८४ मूर्तींचं विसर्जित करण्यात आलं तर दान स्वरुपात स्वीकारलेल्या तीन हजार
७४८ मूर्ती,
विविध १६ मूर्तीकारांकडे सोपवण्यात आल्या. मूर्ती तसंच सुमारे
३३ टन निर्माल्य दान करणाऱ्या भाविकांना महानगरपालिके मार्फत प्रमाणपत्र तसंच सेंद्रीय
खत देण्यात आलं. सुमारे १० टन सेंद्रीय खताचं काल वितरण करण्यात आलं.
****
जालना शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा आज दुपारी अडीच वाजेच्या
सुमारास समारोप झाला. सार्वजनिक गणेश मंडळाचे ४१३ तर सुमारे २४ हजारावर घरगुती गणेश
मूर्तींचं इथे विसर्जन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात सुमारे २५ हजार गणेश मूर्तींचं
विसर्जन करण्यात आलं. मुंबईत मोठ्या गणेशमूर्तीचं विसर्जन आज सकाळपर्यंत तर पुण्यातलं
गणपती विसर्जन आज दुपारपर्यंत सुरू होतं.
****
कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगारक्षम
बनवण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता
आणि नाविन्यता विभागामार्फत “आचार्य
चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही
नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ २० सप्टेंबर रोजी करण्यात येणार
आहे. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली.
नांदेड जिल्ह्यात २५ महाविद्यालयांमध्ये या केंद्रांची स्थापना
होणार आहे. युवकांनी या योजनेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या जवळच्या महाविद्यालयामध्ये
उपस्थित राहावं,
असं आवाहन कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या
सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलं आहे.
****
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण
अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात
आला आहे. या मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे
पार पाडावी,
असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
सोलापूर इथं येत्या २५ सप्टेंबर रोजी या योजनेचा वचनपूर्ती सोहळा
आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा
व्यवस्थित मिळतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात नेवासे इथं उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर
सृष्टीचा प्रकल्प आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर
करावा,
असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. ते आज अहमदनगर इथं याबाबतच्या आढावा बैठकीत
बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यासह जिल्हा प्रशासनातील
इतर अधिकारी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यात ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२४ या कालावधीत
होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली होती. याचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द
करण्यात आला आहे. याबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी उद्या १९ सप्टेंबरला
सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात स्वत: हजर
राहून किंवा कार्यालयाच्या मेलवर आक्षेप नोंदवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment