Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 19 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १९ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं राष्ट्रपतींचं
आवाहन
· पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा
दौऱ्यावर
· महिला अत्याचार प्रकरणी फाशीची तरतूद करण्यासंदर्भात काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची
ग्वाही
आणि
· बांगलादेशविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या दिवसअखेर सहा बाद ३३९
धावा
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत
घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज मध्यप्रदेशात उज्जैन
इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासियांमध्ये
स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या.
२०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे
उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली
इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदूर विमानतळावर राज्यपाल
मंगुभाई पटेल,
मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा
महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदूर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे किंमत अदा केली. इंदूरच्या देवी अहिल्या
विद्यापीठाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यालाही राष्ट्रपतींनी संबोधित केलं.
****
आपल्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच, जोखीम कमी करण्यासाठी आपण सुसज्ज असण्याची आवश्यकता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. त्या आज पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापनादिन
सोहळ्यात बोलत होत्या. जगभरात आज होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ४५% व्यवहार
भारतात होतात,
हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन
सीतारामन यांनी केलं. भारताचं यूपीआय हे ॲप भूतान, नेपाळ, सिंगापूर,
श्रीलंका, संयुक्त अरब अमिरात, मॉरिशस आणि फ्रान्स या सात देशांमध्ये वापरण्यात येत असल्याकडे सीतारामन यांनी
लक्ष वेधलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येणार असून राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. यावेळी
विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जं त्यांच्या हस्ते देण्यात
येतील तसंच योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त टपाल तिकिटही जारी करतील. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग उद्यानाची पायाभरणी मोदी यांच्या
हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर असलेलं हे उद्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केलं जाणार आहे. पंतप्रधान महाराष्ट्र
सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचाही आरंभ करतील.
****
महिला अत्याचाराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात
सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज बुलडाणा
इथं,
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले –
जसं मुख्यमंत्री माझी लाडकी
बहिण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण योजनादेखील आमची आहे. ज्या लोकांनी
माझ्या मुलीबाळींशी, माझ्या बहिणींशी पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय-अत्याचार
करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार
नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार
संजय गायकवाड,
यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार
यांचं आज दुपारी छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. विभागीय आयुक्त दिलीप
गावडे,
महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाण्याकडे रवाना
झाले
****
दरम्यान, स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय
अभियानाचा आज मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
झाला. मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करून पाण्याने धुतले
जातात,
त्यामुळे मुंबईचं प्रदूषण कमी झालं असून, सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे
गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. महात्मा गांधी जयंती पर्यंत राज्यातील नागरी आणि
ग्रामीण भागात चालणारं हे अभियान “स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता” या संकल्पनेवर
राबवण्यात येणार आहे. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई
उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, नगर विकास विभागाचे प्रधान
सचिव डॉक्टर के एच गोविंदराज यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रात
आज सर्व २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये जवळपास
तीन हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत स्वच्छता मोहीम राबवली.
स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत आज नांदेड रेल्वे स्थानकावर
‘एकल वापर प्लॅस्टिक’ च्या विरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य
व्यवस्थापक डॉक्टर विजय कृष्णा यांच्या मार्गदर्शनात जनजागृती फेरी काढण्यात आली. या
फेरीत रेल्वेचे अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी सहभागी झाले.
****
२७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’म्हणून साजरा केला जातो.
‘पर्यटन आणि शांतता’
हे यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाचं घोषवाक्य आहे. या दिनाचं औचित्य
साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांतर्फे
‘पर्यटन आणि शांतता’ या विषयाच्या अनुषंगानं परिसंवाद, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचं
आयोजन करण्यात येणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये
समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोचं
पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे.
त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.
****
आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने
कार्य केल्यास हमखास यश संपादन करता येतं, असं
प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोणी बुद्रुक
इथं प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला
राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पद्मश्री सावजी ढोलकीया, कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे यांच्यासह
इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री
सावजी ढोलकीया यांना राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘डॉक्टर
ऑफ सायन्स’
या मानद उपाधीनं सन्मानित करण्यात आलं. या पदवीदान समारंभात
९ स्नातकांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली, तर
विशेष गुणवत्ता प्राप्त १३ स्नातकांना सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं.
****
भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या
चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर भारतानं सहा बाद ३३९
धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विन १०२ तर रविंद्र जडेजा ८६ धावांवर खेळत आहेत. बांगलादेशनं
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत, अवघ्या ३४ धावांत भारताचे तीन फलंदाज बाद केले. शुभमन गिल शून्य तर रोहीत शर्मा आणि विराट
कोहली प्रत्येक सहा धावा काढून बाद झाले.
बांगलादेशच्या हसन महमूदनं चार तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराज नं प्रत्येकी एक
बळी घेतला.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शिवसेना आणि भाजपाचे
पदाधिकारी यांनी नुकतीच कांही आक्षेपार्ह विधानं केली असून यांच्यावर भाजपने अद्यापही
कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आज धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस
पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष
धीरज पाटील यांच्यासह काँग्रेसचे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे पदाधिकारी
आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत दीर्घकाळ सेवा करुन निवृत्त
झालेल्या अभियंत्याचा आज सत्कार करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी होते. निवृत्त अभियंत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत, नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड शहरात ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त जुलूस काढण्यात आले.
शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निझाम कॉलनी येथून निघालेली
मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत नेण्यात आली.
****
No comments:
Post a Comment