Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
·
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी-काँग्रेस
पक्षाचा विरोध
·
चांद्रयान-४, व्हिनस ऑर्बिटर तसंच रबी हंगामासाठी खतांच्या अनुदालाही केंद्राची मान्यता
·
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर,
पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात
होणार सहभागी
·
‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’ कृषी पुरस्कारानं
मुख्यमंत्र्यांचा गौरव
आणि
·
राज्यस्तरीय स्वच्छता ही सेवा पंधरवाड्याला आजपासून आरंभ
सविस्तर बातम्या
एक
राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. संसदेच्या
हिवाळी अधिवेशनात यासाठीचं विधेयक संसदेत सादर केलं जाणार आहे. माहिती आणि प्रसारण
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन टप्प्यात
निवडणुका होतील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले...
इसका
इम्पिमेंटेशन दो फेजेस् में होगा। फर्स्ट फेज मे
लोकसभा और असेंब्लीज के इलेक्शन्स को कराने प्रयास है। और उसके सेकंड फेज मे लोकल
बॉडी इलेक्शन विधीन हंड्रेड डेज ऑफ जनरल इलेक्शन के करवाना है। जिससे की एक बार
में सारे इलेक्शन का प्रोसेस कंप्लीट हो और अगले पांच साल मे सब के सब देश के
निर्माण मे लगे रहे। जो कमिटी की रिकमेंडेशन्स है, उनको
पुरे देश भर मे डिस्कशन किया जायेगा। मल्टीपल इसके जो इंम्पॅक्टस् है, उन सब के उपर डिस्कशन्स करें। और एक
इम्प्लिमेंटेशन ग्रुप इसके बाद मे डेव्हलप किया जायेगा, जिससे
लीगल प्रोसेस से इसको इंम्प्लिमेंट करे।
काँग्रेस
अध्यक्ष तथा राज्यसभेतले विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र या निर्णयाला
विरोध दर्शवला आहे. हा लोकशाहीवर घाला असल्याचं सांगत, देशात जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा तेव्हा निवडणूक घ्यावी
लागेल, असं
खरगे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक राष्ट्र एक निवडणूक प्रस्तावाचं
स्वागत केलं आहे.
****
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळानं
कालच्या बैठकीत महत्त्वाचे इतरही अनेक निर्णय घेतले. चंद्रावरुन पृथ्वीवर परतण्याचं
तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चांद्रयान-४ तसंच व्हिनस ऑर्बिटर अर्थात शुक्र कक्षा
मोहिमेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सुधारित गगनयान मोहिम, तसंच भारतीय अंतराळ स्थानकाच्या
स्थापनेलाही काल मान्यता देण्यात आली. २०४० मध्ये चंद्रावर मानव पाठवण्यासाठी स्वदेशी
बनावटीच्या अंतराळ यानाच्या निर्मितीलाही मंजुरी मिळाली आहे.
****
रबी
हंगामासाठी फॉस्पेट आणि पोटॅश खताकरता २४ हजार कोटी रुपये अनुदान, तसंच ७९ हजार १५६ कोटी रुपयांच्या
पंतप्रधान आदिवासी उन्नत ग्राम अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली.
पंतप्रधान
अन्नदाता उत्पन्न संरक्षण योजना सुरू ठेवण्यालाही काल मान्यता देण्यात आली. याअंतर्गत दाळी, तेलबियांच्या उत्पादनाला
प्रोत्साहन देण्यासह किमान आधारमूल्य आणि बाजार भाव यातल्या फरकाची भरपाई शेतकऱ्यांना
दिली जाईल.
ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस् आणि
गेमिंग संदर्भात एका राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला तसंच जैवतंत्रज्ञान संशोधन नवाचार
आणि उद्योगविकास योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याची माहिती अश्विनी
वैष्णव यांनी दिली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या, 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील
वर्धा दौऱ्यावर येणार आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात
ते सहभागी होतील. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते अमरावती इथं पीएम मित्र पार्कची पायाभरणी
होणार आहे. तसंच पंतप्रधान महाराष्ट्र शासनाच्या "आचार्य चाणक्य कौशल्य विकास
केंद्र" योजनेचा आरंभ करतील. परभणी जिल्ह्यात १४ महाविद्यालयांमध्ये, लातूर जिल्ह्यात १८ महाविद्यालयांमध्ये
तर नांदेड जिल्ह्यात २५ महाविद्यालयांमध्ये या केंद्रांची स्थापना होणार आहे.
****
अल्पवयीन
बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला कालपासून प्रारंभ झाला. शून्य ते
अठरा वयोगटातील बालकांसाठी ही पेन्शन योजना आहे. शुभारंभाच्या सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातले
५० बालकं ऑनलाईन पधतीनं सहभागी झाले होते. यापैकी १० बालकांना कायम निवृती वेतन -प्राण
कार्ड देण्यात आलं. तर काल पहिल्याच दिवशी
५५ खाती उघडण्यात आली.
****
पर्यावरण
रक्षण, शाश्वत
विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन
‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने काल सन्मानित करण्यात
आलं. जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईत
मुख्यमंत्री शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा जागतिक कृषी पुरस्कार राज्यात
राबणाऱ्या शेतकऱ्यांना अर्पण करत असल्याचं सांगून महाराष्ट्राला शेतीच्या क्षेत्रातही
पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.
जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर
उमटवली आहे अशा शब्दात राज्यपालांनी प्रशंसा
केली.
****
राज्यातल्या
पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या हस्ते उद्घाटन झालं. नवी मुंबईत महापे इथं, आरआरपी ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यामार्फत हा प्रकल्प
उभारण्यात येत आहे. दोन टप्यात होणाऱ्या या प्रकल्पात इटली आणि फ्रान्स सरकारचा २७%
वाटा आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २४ हजार ५३८ कोटी एवढी गुंवतणूक करण्यात येणार
असून, दोन्ही
टप्यातील घटकाची महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूक ३६ हजार ५७३ कोटी एवढी असणार आहे. १२
हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून चार हजार रोजगार निर्मिती होईल.
****
बुलडाणा
इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय
यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले
आहेत. सोलापूर इथं येत्या २५ सप्टेंबर रोजी या योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात
आला आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यात नेवासे इथं उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा आणि
अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश राज्याचे महसूल
मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. ते अहमदनगर
इथं झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
****
स्वच्छता
ही सेवा पंधरवड्याचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत
होणार आहे. गिरगाव चौपाटी इथून या मोहिमेची सुरुवात होणार आहे.
नांदेड
जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा २०२४ ही मोहीम ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येत आहे.
या मोहिमे अंतर्गत राज्यासह नांदेड जिल्ह्यात सर्वत्र एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी
हा उपक्रम घेण्यात येणार आहे.
****
जालना
शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा काल दुपारी समारोप झाला. सार्वजनिक गणेश मंडळाचे ४१३
तर सुमारे २४ हजारावर घरगुती गणेश मूर्तींचं जालन्यात विसर्जन करण्यात आलं.नांदेड जिल्ह्यात
सुमारे २५ हजार गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं.
मुंबईत
मोठ्या गणेशमूर्तीचं विसर्जन काल सकाळपर्यंत तर पुण्यातलं गणपती विसर्जन काल दुपारपर्यंत
सुरू होतं.
छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिकेनं परवा अनंत चतुदर्शीला ४६ गणेश मूर्ती संकलन केंद्रावर एकूण
२८ हजार ३२ मूर्ती संकलित केल्या, यापैकी २४ हजार २८४ मूर्तींचं विसर्जित करण्यात आलं तर
दान स्वरुपात स्वीकारलेल्या तीन हजार ७४८ मूर्ती, विविध १६ मूर्तीकारांकडे सोपवण्यात आल्या. मूर्ती
तसंच सुमारे ३३ टन निर्माल्य दान करणाऱ्या भाविकांना महानगरपालिके मार्फत प्रमाणपत्र
तसंच सेंद्रीय खत देण्यात आलं. सुमारे १० टन सेंद्रीय खताचं या उपक्रमात वितरण करण्यात
आलं.
****
लातूर
जिल्ह्यात औसा इथं तक्षशिला बुद्ध विहार विकास कामांचं केंद्रीय सामाजिक न्याय आणि
सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. या बुद्ध
विहाराच्या माध्यमातून गौतम बुद्धांचे शांतता आणि समानतेचे विचार समाजापर्यंत पोहचण्यास
मदत होणार असल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
****
टीबी
मुक्त अभियानात परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायती कौतुकास्पद कार्य करत असल्याचं अपर
जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत
काल टिबीमुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्यावेळी डॉ. काळे बोलत होते.
****
नांदेड
जिल्ह्यात गेल्या ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात
आली. याचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. याबाबत उमेदवारांना
काही आक्षेप असल्यास त्यांनी आज १९ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत
जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात स्वत: हजर राहून किंवा कार्यालयाच्या ईमेलवर आक्षेप
नोंदवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
निजामाबाद
पुणे आणि नांदेड पुणे या गाड्या २१ आणि २२ सप्टेंबर रोजी परभणी, परळी, लातूर, कुर्डुवाडी, दौंड या मार्गाने धावणार
आहेत. दौंड निजामाबाद आणि पुणे नांदेड या गाड्या २२ आणि २३ सप्टेंबर रोजी दौंड, कुर्डुवाडी, लातूर, परळी, परभणी या मार्गाने धावतील.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाने ही माहिती कळवली आहे.
****
No comments:
Post a Comment