Friday, 20 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 20 September 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २० सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचं तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्धा इथं होत असलेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांनी या योजनांचा प्रारंभ केला. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री जयंत चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येत असून, या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर येण्यापूर्वी पंतप्रधानांनी या ठिकाणी उभारलेल्या विविध कारागीरांच्या कक्षांना भेट देऊन, त्यांनी घडवलेल्या वस्तुंची पाहणी केली.

राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.

अमरावती, इथं पीएम मित्रपार्क या समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे.

****


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज रांची मधल्या नमकुम इथं राष्ट्रीय माध्यमिक कृषी संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन झालं. यावेळी राज्यपाल संतोष कुमार गंगवार, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन उपस्थित होते.

****

देशातून नक्षलवादाची विचारधारा मार्च २०२६ पूर्वी पूर्णपणे नष्ट करण्याचा सरकारचा निर्णय असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमधील नक्षलवादी हिंसाचारातील जवळपास ५५ पीडितांशी शाह यांनी आज संवाद साधला, बस्तरचे चार जिल्हे वगळता संपूर्ण देशातील नक्षलवाद संपवण्यात केंद्राला यश आल्याचं त्यांनी सांगितलं. नक्षल गटांना शस्त्रे आणि हिंसाचार सोडून आत्मसमर्पण करावं, अन्यथा सरकार लवकरच त्यांच्याविरोधात कारवाई करेल, असंही अमित शाह यांनी नमूद केलं.

****

तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा मुद्दा गंभीर असल्याचं केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून प्रसादाच्या लाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आढळल्याची पुष्टी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेने दिली आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं जोशी म्हणाले.

****

प्रत्येक गोष्टीत न्याय केला तर मानवाची प्रगती होईल, त्यासाठी शांतता आणि न्यायाची भूमिका घेणं  आपले सर्वांचे कर्तव्य अहे असं मत, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते तथा आंतरराष्ट्रीय मुस्लिम धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांनी व्यक्त केलं आहे. ईद-ए- मिलादनिमित्त ते आज जळगाव इथं झालेल्या प्रवचनात बोलत होते. यावेळी राज्य तसंच देशातील विविध प्रातांमधून आलेले २२ धर्मगुरू उपस्थित होते.

****

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

****

जालना जिल्ह्यात आज सकाळी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई इथून जालन्याकडे जाणारी बस आणि जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली, बस मधल्या किरकोळ जखमींना अंबड इथल्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

****

दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता  पुणे - करीमनगर - पुणे विशेष गाडीच्या ०८ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. पुणे करीमनगर गाडी पुणे स्थानकावरुन २१ आणि २८ आक्टोबर तसंच ४ आणि ११नोव्हेंबरला रात्री पावणे अकराला सुटेल. तर परतीच्या प्रवासात २३ आणि ३० ऑक्टोबर तसंच ६ आणि १३ नोव्हेंबरला करीमनगर स्थानकावरुन सकाळी ६ वाजता सुटेल असं दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...