Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 September
2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा
जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी
होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या
हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही त्यांच्या
हस्ते जारी करण्यात येईल. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित
वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर
उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून
विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र”
योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये
कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.
***
हायड्रोजन इंधनाचा वापर करुन इंधन
आयातीचं प्रमाण २२ लाख कोटी रुपयांवरुन ४ लाख
कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी
दिली आहे. यासाठी केंद्र सरकार मिराई प्रकल्प
राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
सोलापूर विमानतळा संदर्भात नवी दिल्ली
इथं काल केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. आमदार सचिन कल्याणशेट्टी,जिल्हाधिकारी कुमार
आशीर्वाद या बैठकीला उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत नवीन हवाई रस्ते मंजूर करण्याची
प्रक्रिया सुरु आहे, याअंर्तगत नोव्हेंबर महिन्यामध्ये
विमानसेवा सुरू होईल, सोलापूर ते गोवा,
सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैद्राबाद, सोलापूर ते मुंबई या
दरम्यानच्या हवाई मार्गाना प्राधान्याने उडाणे होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून
तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. तिथल्या डेलावेअर इथं होणाऱ्या क्वाड
देशांच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान विविध परदेशी अधिकाऱ्यांशी
तसंच अमेरिकेतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत.
***
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास
आघाडीतील तिन्ही पक्षांना एकत्र लढावं लागणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.आघाडीतील
जागावाटपासंदर्भात आज बैठक होणार असून या मुद्द्यावरुन
आघाडीत कोणताही वाद नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
***
वीजनिर्मिती कंत्राटी कामगारांना
मेडीक्लेम अंतर्गत राज्यातील उत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतील अशी
माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.ते काल नागरपूरमधील दहेगाव इथं
वीज निर्मिती कंत्राटी कामगारांच्या मेळाव्यात
बोलत होते.या कामगारांच्या सहा मागण्या मान्य
केल्याबद्दल कामगार संघटनेतर्फे यावेळी मुख्यमंत्र्यांचा
सत्कार करण्यात आला.
***
जालना वडीगोद्री मार्गावर शहापूर
गावाजवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास बस आणि आयशर ट्रकच्या भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जण ठार झाले असून
१० जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई
इथून जालन्याकडे जाणारी बस आणि जालन्याहून
बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली, प्रत्यक्षदर्शीच्या
माहिती नुसार भरधाव वेगाने येणारी ट्रक दुसऱ्या
वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस वर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण २४ प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड इथल्या
प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं
आहे.
***
नंदुरबार शहरात ईदच्या जूलुसा दरम्यान
दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय
कराळे यांनी काल आढावा घेतला. त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन चर्चा
केली. या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा कराळे यांनी दिला आहे. तसेच दंगलीचे काही व्हिडिओ फोटो नागरिकांकडे असतील तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आवाहन त्यांनी
केलं. काल एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने ईद च्या
जुलूसा दरम्यान दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत, या घटनांचा परस्परांशी काही संबंध
आहे का याचा शोध घेतला जात असल्याचं कराळे यांनी सांगितलं.
***
छत्रपती संभाजीनगर इथल्या मंगलमूर्ती
संस्कार केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या स्व-विकास व्याख्यानमालेत मोबाईल आणि मुलं
या विषयावर पुण्याचे समुपदेशक दिनेश ताठे यांनी
आपले विचार मांडले. मोबाईल मुळे माणसाच्या अनेक गरजा पूर्ण होत असल्या तरी मोबाईलच्या
अति वापरा मुळे अनेक समस्या देखील निर्माण
होत आहेत,असं ताठे याप्रसंगी
म्हणाले. व्याख्यानमालेचं हे १८ वं वर्ष आहे.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेला केंद्राच्या अध्यक्षा मानसी काशीकर, सचिव श्रीकांत काशीकर, कोषाध्यक्ष राजश्री
कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
***
पुण्यात राबवण्यात येणाऱ्या मुळा-मुठा
नदीसुधार प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणने २०१९ मध्ये दिलेल्या
ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने निकाली काढली आहे.
त्यामुळे या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांचा मार्ग आता
मोकळा झाला आहे.
***
No comments:
Post a Comment