Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 September 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारतीय रेल्वे, आईआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या समन्वयाने
केदारनाथ - बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारत
गौरव ट्रेन चालवणार आहे.
भारत गौरव मानसखंड एक्स्प्रेसची बद्री-केदार-कार्तिक स्वामी
यात्रा १० रात्री आणि ९ दिवसांची असेल आणि यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, गुप्त काशी, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ यासारख्या ठिकाणांचा समावेश असेल.
भारत गौरव एक्स्प्रेसची बद्री - केदार कार्तिक स्वामी
यात्रा येत्या ३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दुपारी २ वाजता सुटून
सुरू होईल आणि १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे पोहोचेल.
यात्रेदरम्यान या रेल्वेगाडीला कल्याण, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर, आग्रा छावणी हजरत निजामुद्दीन आणि हरिद्वार इथं थांबा असेल.
****
मागील पाच दिवसांपासून मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे
पाटील यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी
व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी हे उपोषण
सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्ह्यात बंद
पाळण्यात येत आहे. आजच्या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार, हिंसक घटना घडू नये यासाठी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात
आली आहे तसंच चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन
पोलिस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी केलं आहे. तर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
देऊन मराठा समाज अंतरवाली सराटीकडे रवाना होणार असल्याचं मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे
यांनी सांगितलं आहे.
****
जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या कथित घोटाळ्यातील भ्रष्टाचार
प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या
विरोधात खटला चालवण्याची परवानगी केंद्रसरकारकडून मिळाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण
विभाग सीबीआयनं काल दिल्लीच्या राऊज एव्हेन्यु न्यायालयात यासंदर्भातले दस्ताऐवज सादर
केले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या महाविद्यालयीन युवक युवतींशी
संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यासाठी ‘युवा संवाद’ हे अभियान २५
सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणार आहे.
या अभियानात मुख्यत्वे करुन सद्यस्थितीतील सामाजिक वातावरण, मुलींची छेडछाड, व्यसनाधिनता, रॅगींग यासारख्या मुद्यांवर युवा वर्गाचं प्रबोधन केलं जाणार
आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यात सर्व महाविद्यालयांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अकोला जिल्ह्यात
१० हजार नऊशे एकोणसत्तर घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून गेल्या १५ तारखेपर्यंत
यापैकी ५ हजार ५८७ घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील
उर्वरित आणखी ५ हजार ३८२ घरकुल लाभार्थी याद्यांना मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्ह्यातील सातही पंचायत
समित्या आदी संबंधित यंत्रणांची कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया
३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे. केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री
आवास योजनेत ग्रामीण भागात घरकुल मंजूर करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल
बांधकामासाठी एक लाख वीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जातं.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या
क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशीच्या खेळात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या
४ गडी बाद २७१ धावा झाल्या आहेत. शुभमन गिल आणि ऋषभ पंत खेळपट्टीवर फलंदाजी
करत आहेत. तत्पुर्वी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला. तर बांगलादेशचा
संघही आपल्या पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. आता तिसऱ्या दिवशीच्या खेळात
भारताकडं ४९८ धावांची आघाडी घेतली आहे.
****
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या पंचेचाळीसाव्या
बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाची आगेकुच सुरु आहे. खुल्या प्रवर्गात नवव्या
टप्प्यात भारत आणि उजबेकिस्तानदरम्यानचा सामना २-२ असा बरोबरीत सुटला. गुणतालिकेत भारत
१७ गुणांसह अव्वलस्थानी आहे तर महिला प्रवर्गात अमेरिकेसोबत २-२ अश्या बरोबरीत सामना
सुटल्यानंतर भारतीय महिला संघ १५ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
खुल्या प्रवर्गात, डी. गुकेश, आर. प्रग्यानानंद, अर्जुन एरिगैसी आणि विदित गुजराती सह सर्व चार भारतीय खेळाडूंनी
आपापले सामने बरोबरीत खेळले. दूसऱ्या स्थानावरील अमेरिकन संघापेक्षा भारत २ गुणांनी
पुढे आहे.
****
No comments:
Post a Comment