Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 21 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २१ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे महाराष्ट्र अग्रणी, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
· स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत मुंबईत समुद्रकिनारी
स्वच्छता मोहीम
· आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर
· हवामान विभागाकडून मराठवाड्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट
आणि
· चेन्नई कसोटीवर भारताची पकड मजबूत
****
सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केले आहेत.
यामुळंच राज्यात उद्योग आले. अनेक क्षेत्रात आपण प्रगती केली, त्यामुळे राज्य परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये पहिल्या क्रमांकाचं ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते आज ठाण्यात आयोजित कार्यक्रमात
बोलत होते. महाराष्ट्रातील ५२ टक्के गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले –
आपण जे एम ओ युज साईन केले,
इंडस्ट्रीज् आली, आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर
आलेला आहे. महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर वन आहे. इंडस्ट्रीमध्ये नंबर वन आहे. परदेशी
गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहे. पूर्ण देशाचं जे परदेशी गुंतवणूक आहे, त्याच्या ५२ टक्के
फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत,
ह्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आहे देशामध्ये
****
प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होते, आज सागरी किनारा स्वच्छतेसाठी जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात
मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार
देईल,
असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते
आज बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या
सहकार्यानं जुहू समुद्रकिनारी समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.
यावेळी बोलताना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचं मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र
यादव,
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसंच इतर मान्यवर उपस्थित होते.
****
काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन
यांची राजभवनावर भेट घेत निवेदन सादर केलं. या निवेदनात, राज्यातील
कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण
झाल्याचं म्हटलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं
असून त्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचं काँग्रेसनं निवेदनात म्हटलं आहे.
****
वंचित बहुजन आघाडी पक्षानं आज विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार
यादी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई
इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पक्षाच्या पहिल्या यादीत अकरा उमेदवारांची घोषणा
करण्यात आली आहे. यात औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे, नांदेड दक्षिणमधून फारूक अहमद, नांदेडच्या लोहा मतदारसंघातून
शिवा नारांगले यांना उमदेवारी देण्यात आली आहे. याशिवाय रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव
रेल्वे,
नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली
शेवगाव आणि खानापूर मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. विधानसभा निवडणुकीत वंचित
बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
****
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील दिवेघाट ते हडपसर
या कामाचे चौपदीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १३.२५ किलोमीटर इतकी आहे, यासाठी
८१९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित
आहे. तसंच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील मुळा व मुठा नदीवरील पुलांचे बांधकाम तसेच सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंतच्या
सेवा रस्त्यांच्या बांधकामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते
आज करण्यात आलं.
****
प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासन ‘हर घर जल’
योजना राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील
असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची
कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन,
शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन
महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, असं प्रतिपादन केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी. आर. पाटील यांनी केले.
ते आज पुण्यात नाम फाउंडेशनच्या ९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे
यांची उपस्थिती होती. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यात नाम फाऊंडेशनचा मोठा वाटा
असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
****
अल्पसंख्याक समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक,
व्यावसायिक विकासासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाला ५०० कोटी रुपयाची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना
उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा
व प्रशिक्षण देण्यात येईल, असं राज्याचे अल्पसंख्यांक आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं सांगितलं.
हज हाऊस इथं मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत आज एक दिवसीय
प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याप्रसंगी
अब्दुल सत्तार बोलत होते. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचं शिक्षण पैशाअभावी
थांबू नये यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात
येत आहे,
याचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी आणि नागरिक यांनी
घ्यावा,
असं आवाहन सत्तार यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज प्रेरणा फाउंडेशन आणि एमआयटी शैक्षणिक
संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव
डॉ मनीष जोशी यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं.
राज्य,
भाषा, धर्म यांच्या पलीकडे जाऊन भारतीय
ज्ञान परंपरेवर आधारित नव्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार मोठ्या प्रमाणात देशात होत असल्याचं
जोशी यांनी याप्रसंगी सांगितलं. नवीन शिक्षण धोरणाच्या प्रसारासाठी विद्यापीठ अनुदान
आयोगाकडून देशभर विशेष कार्यक्रम राबवले जात आहे. भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर पार
पडलेल्या आजच्या चर्चासत्रात देशभरातून संशोधक तसंच अभ्यासक सहभागी झाले होते.
****
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याची
गरज असल्याचं अभिनेते आणि पाणी फाऊंडेशनचे अध्यक्ष अमीर खान यांनी म्हटलं आहे. अकोल्यातील
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तीन दिवसीय शिवारफेरी कार्यक्रमाच्या दुसऱ्या
दिवशी अमीर खान बोलत होते. यावेळी अमीर खान यांनी विद्यापीठाच्या विविध विभागाला भेट
देऊन शेती विषयक माहिती जाणून घेतली.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटी
इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज जालना
जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी, बानेगाव, भोगगाव,
रामसगाव इथं मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केलं. या
आंदोलनामुळे तीर्थपुरी मार्गावरील वाहतूक
काही वेळ ठप्प झाली होती. सरकारनं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी
निवेदनाच्या माध्यमातून दिला.
****
भाषा हे व्यक्त होण्याचं महत्त्वाचं साधन आहे, तर विज्ञान हे संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, असं
कवयित्री नीरजा यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी महाविद्यालयात आयोजित
कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाषा, साहित्य आणि संस्कृती
यांचा व्यापक अर्थानं विचार करायला हवा. संस्कृती ही व्यापक संकल्पना असून यात भाषा, साहित्य,
तत्त्वज्ञान, विज्ञान, परंपरा,
धर्म, संगीत, शिल्पकला,
चित्रकला, आहारपद्धती, वेशभूषा,
उपचार पद्धती अशा विविध घटकांचा समावेश होतो. या घटकांच्या आकलनासाठी
विध्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, अस
नीरजा यांनी सांगितलं.
****
चेन्नई कसोटीवर भारतानं पकड मजबूत केली आहे. शुभमन गिल आणि रिषभ
पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं दुसरा डाव चार बाद दोनशे सत्त्याऐंशी धावांवर
घोषित केला. शुभमन गिलनं ११९ धावा
केल्या,
तर रिषभ पंतनं १०९ धावा केल्या. पाचशे पंधरा धावांच्या आव्हानाचा
पाठलाग करताना बांगलादेशनं तिसऱ्या दिवसअखेर चार बाद एकशे अठ्ठावन्न धावा केल्या आहेत.
रविचंद्र आश्विननं तीन तर जसप्रीत बुमराहनं एक बळी टिपला. बांगलादेशला विजयासाठी अजून
३५७ धावांची गरज असून भारताला सहा बळी घ्यायचे आहेत.
****
No comments:
Post a Comment