Tuesday, 24 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 24 September 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २४ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

देशभरात यंदा ११ कोटी चार लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी चार कोटी १३ लाख हेक्टर क्षेत्र भाताच्या पिकाखाली असल्याचं केंद्रीय  कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यंदा एक कोटी २८ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, एक कोटी ९२ लाख हेक्टरवर तृणधान्य, तर १ कोटी ९३ लाख हेक्टरवर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. ५७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ऊसाची लागण झाली आहे.

****

राज्यातल्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्री समितीची बैठक झाली; त्यावेळी ते बोलत होते.

****

बदलापूरच्या खासगी शाळेतल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला वआरोपी अक्षय शिंदे काल पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. त्याला काल तळोजा कारागृहातून चौकशीसाठी ठाण्यात नेलं जात असताना, मुंब्रा बायपास इथं त्याने अचानक एका पोलिस अधिकाऱ्याचं रिव्हॉल्वर हिसकावून त्याच्यावर गोळीबार केला. यावेळी अन्य एका अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ शिंदेवर तीन गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे. शिंदे याने दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्याच्याविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते.

****

सर्वोच्च न्यायालयानं एका ऐतिहासिक खटल्यात लहान मुलांचं अश्लील साहित्य डाउनलोड करणं, पाहणं आणि साठवणं हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचा निर्णय दिला आहे. केवळ चाइल्ड पोर्नोग्राफी डाउनलोड करणे आणि पाहणे हा पॉक्सो कायदा आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा नसल्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत, सरन्यायाधीश डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील, खंडपीठानं हा निकाल दिला. यासोबतच संसदेला ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’ या शब्दाच्या जागी, ‘चाइल्ड सेक्शुअल एक्स्प्लो-इटेटिव्ह अँड अब्यूज मटेरियल’ असा अध्यादेश आणण्याची सूचना देखील,  सर्वोच्च न्यायालयानं  केली आहे.

****

राज्यभरात राष्ट्रीय पोषण माह राबवला जात आहे. राज्यातल्या नागरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात एक लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्रांद्वारे यासंबंधी जनजागृती आणि अंमलबजावणी सुरू आहे. बालकं, गरोदर आणि स्तनदा महिलांपर्यंत लाभ पोहोचवला जात आहे. दररोज वेगवेगळे उपक्रम राबवण्याच्या सूचना राज्यातल्या अंगणवाडी केंद्रांना देण्यात आल्या आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे ही माहिती दिली.

****

येत्या दहा नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी, अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी अंतिम मुदत येत्या ३० तारखेपर्यंत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी ही माहिती दिली. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, इतर तपशील राज्य परीक्षा परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

****

एमपीएससीच्या राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत राज्य शासनाच्या कृषि सेवेतल्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या काल नवी मुंबईत बेलापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विविध संवर्गांच्या एकूण २७४ रिक्त पदांकरता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ ची जाहिरात गेल्या डिसेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर कृषी विभागतल्या २५८ पदांसाठीची मागणी आयोगाला मिळाली. शासनाच्या विनंतीनुसार या पदांचा समावेश त्याच परीक्षेत करण्यात आला असून आता येत्या एक डिसेंबरला पूर्व परीक्षा होणार आहे.

****

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काल आंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. सरकारने अद्यापही मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेतला नसल्याचं सांगून त्यांनी सरकारवर टीका केली.

दरम्यान, लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी, जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेऊन तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

****

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसह विविध ग्राहकोपयोगी योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा यासाठी महावितरणद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.  महावितरणच्या परिमंडल कार्यालयात काल कर्मचाऱ्यांच्या वतीने पथनाट्याचा शुभारंभाचा प्रयोग करण्यात आला. या माध्यमातून योजना, योजनेमुळे ग्राहकांचा होणारा लाभ आणि योजनेत सहभाग घेतल्यास मिळणाऱ्या  अनुदानाची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात टिप्पर उलटून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे मजूर खामगाव तालुक्यातल्या वाडी इथले रहिवासी होते.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...