Thursday, 24 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 24.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 24 October 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २४ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      महाविकास आघाडीचं २५५ जागावाटपावर एकमत-उर्वरित जागा वाटपावर आजपासून चर्चा 

·      शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर-राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही ३८ उमेदवारांची घोषणा-अजित पवार बारामतीतून निवडणूक रिंगणात

·      नामनिर्देशन प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवसापर्यंत राज्यभरात १५३ उमेदवारांकडून १६४ अर्ज दाखल

·      माजी खासदार निलेश राणे शिवसेनेत तर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

आणि

·      राज्यात सोने ८० हजार रुपये तोळा तर चांदी एक लाख रुपये किलो

सविस्तर बातम्या

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं २५५ जागावाटपावर एकमत झालं असून, उर्वरित जागांसंदर्भात आजपासून चर्चा सुरू होणार आहे. सध्या तिन्ही प्रमुख पक्षांना प्रत्येकी ८५ जागा निश्चित झाल्याचं काल पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. 

****

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांच्या स्वाक्षरीनं जारी करण्यात आलेली ही यादी शिवसेनेनं सामाजिक संपर्क माध्यमावरून जाहीर केली.

 

या यादीनुसार लोहा मतदार संघातून एकनाथ पवार, कळमनुरी संतोष टारफे, परभणी राहुल पाटील, गंगाखेड विशाल कदम, सिल्लोड सुरेश बनकर, कन्नड उदयसिंह राजपुत, औरंगाबाद मध्य किशनचंद तनवाणी, औरंगाबाद पश्चिम राजू शिंदे, वैजापूर दिनेश परदेशी, गेवराई-बदामराव पंडित, उस्मानाबाद-कैलास पाटील, परांडा-राहुल ज्ञानेश्वर पाटील, बार्शी दिलीप सोपल, तर नेवासा मतदार संघातून शंकरराव गडाख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ३८ उमेदवारांची यादी काल जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगाव इथून आणि हसन मुश्रीफ यांना कागलमधून उमेदवारी दिली आहे. माजलगाव मतदारसंघातून प्रकाश सोळंके यांना, तर परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी, धर्मराव आत्राम-अहेरी, राजकुमार बडोले-अर्जुनी मोरगाव तर अदिती तटकरे यांना श्रीवर्धन इथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. उर्वरित उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध करण्यात येईल असं प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं १३ उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली. बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातून अभिजीत देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर पन्नासपेक्षा अधिक जागा लढवणार असल्याची माहिती, ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्या कोट्यातून किमान चार ते पाच जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतू त्यानुसार जागा दिल्या नसल्याचा आरोप आखरे यांनी केला.

****

शिवसेना नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज येत्या सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी भरणार आहेत. खासदार नरेश म्हस्के यांनी ही माहिती दिली. ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पांचपाखाडी विधानसभा मतदार संघातून शिंदे अर्ज भरणार आहेत.

****

नामनिर्देशन प्रक्रियेच्या काल दुसऱ्या दिवसापर्यंत राज्यभरात १५३ उमेदवारांनी १६४ अर्ज दाखल केले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल एकूण १७५ जणांनी ३८५ अर्ज घेतले, तर चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. यामध्ये औरंगाबाद पूर्व मतदार संघातून दोन तर गंगापूर मतदार संघातल्या दोन अर्जांचा समावेश आहे.

 

नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात काल तीन उमेदवारांनी चार अर्ज दाखल केले. भोकरमध्ये दोन, तर किनवट आणि नांदेड उत्तर मधून प्रत्येकी एका उमेदवाराने अपक्ष अर्ज सादर केले. जिल्ह्यातल्या सर्व मतदार संघातून काल विधानसभेसाठी ४४१ तर लोकसभेसाठी २८ अर्जांची उचल झाली.

 

लातूर जिल्ह्यात उदगीर या अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी काल अर्ज दाखल केले.

हिंगोली जिल्ह्यात ५६ इच्छुकांनी १२३ अर्जांची उचल केली, तर वसमत विधानसभा मतदारसंघात जगन्नाथ अडकिने यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केलं.

 

भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

जालना जिल्ह्यात बदनापूर मतदार संघातून दोन अपक्ष तर घनसावंगी मतदार संघातून एका अपक्ष उमेदवाराने काल अर्ज दाखल केला.

 

परभणी जिल्ह्यातल्या चार मतदारसंघातून काल नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये जिंतूर मतदार संघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्यासह पाच अपक्ष, गंगाखेडमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी, तर पाथरी मतदार संघातून दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

धाराशिव जिल्ह्यात काल एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केला नाही, मात्र ७६ जणांनी १७३ अर्ज खरेदी केले.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या महायुतीच्या पक्ष मेळाव्यात शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी त्यांचं पक्षाचा भगवा ध्वज आणि धनुष्यबाण देऊन स्वागत केलं. 

****

भाजपा नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

****

श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.

****

राज्यात सोन्याचे दर प्रतिदहा ग्रॅम ८० हजार रुपयांच्या पुढे गेले असून, चांदीचा दर किलोमागे एक लाख रुपये झाला आहे. २४ कॅरेट सोनं जीएसटी शिवाय ७९ हजार ५०० रुपये तोळा आणि २२ कॅरेट सोन्याचे व्यवहार ७८ हजार ४०० रुपये दराने होत आहेत. चांदीचे व्यवहार ९८ हजार ८६२ रुपये किलो दरानं होत होते. दिवाळी आणि लग्नसराईसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातले चढ-उतार, आणि जागतिक राजकीय तणाव यासारख्या घटकांचाही सोन्याच्या दरांवर प्रभाव पडत असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.

****

निवडणूक आयोगानं दिव्यांग तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदानाची व्यवस्था केली आहे. यासाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या पात्र मतदारांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचं दिसून आल्यास नागरिकांनी सी-व्हीजील अॅपवर किंवा १९५० या नि:शुल्क क्रमांकावर तक्रार करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे. ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधाही सी-व्हीजील अॅपवर उपलब्ध असून, नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

दरम्यान, १५ ते २३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात ‘सी-व्हिजिल ॲप वर एक हजार ११ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ९८ टक्के म्हणजे ९९५ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.

****

बीड जिल्ह्यात कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अक्षय भागवत आणि अकबर पटेल या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

****

निवडणूक विषयक सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून कामकाज करण्याची सूचना, हिंगोली जिल्हा निवडणूक निरीक्षक अर्जुन प्रधान यांनी केली आहे. ते काल पथक प्रमुखांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

****

परभणी इथले विधानसभा निवडणूक निरीक्षक राहुल मिश्रा यांनी काल जिल्ह्यात विविध मतदार संघात तपासणी करुन, कामकाजाचा आढाव घेतला

****

नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेचे तामिळनाडू कॅडरचे अधिकारी ए. गोविंदराज आणि गुजरात कॅडरचे अधिकारी मयंक पांडे यांची नियुक्ती झाली आहे. गोविंद राज यांच्याकडे नायगाव, देगलूर, मुखेड आणि लोहा मतदारसंघांची तर पांडे यांच्याकडे किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या मतदारसंघांच्या निरीक्षकपदाची जबाबदारी आहे.

****

बीड इथं काल पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा गुटखा जप्त केला. सहायक पोलिस निरीक्षक बाळराजे दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

****

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने काल हजेरी लावली. मोहोळ इथं विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीव वाहन तपासणीसाठी उभारलेल्या तपासणी नाक्याचा तंबू पावसामुळे कोसळल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दाना’ चक्रीवादळ आज रात्री ओडिशा किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आपली पथकं तैनात केली आहेत.

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आजपासून पुणे इथं खेळवला जाणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल. उर्वरित मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला आहे.

****

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...