Saturday, 25 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.01.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 25 January 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.

****

निवृत्त न्यायमूर्ती, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगांवकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. ८० च्या दशकात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९९९ साली न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतरही साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत ते सक्रीय राहिले. वर्धा इथं झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदं त्यांनी भुषवलं होतं. चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

दरम्यान, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने लेखणीच्या जोरावर समाजाला योग्य दिशा दाखवणारा एक सिद्धहस्त साहित्यिक आपण गमावला, अशी भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चपळगावकर यांना आदरांजली वाहिली.

****

राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, उद्या नवी दिल्लीतील कर्तव्य पथ इथं ७६ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं संचलन पाहण्यासाठी दहा हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. आमंत्रित पाहुण्यांमध्ये आपत्ती मित्र स्वयंसेवक, आशा कर्मचारी, शेतकरी उत्पादक संघटनांचे शेतकरी, पंतप्रधान किसान सन्मान निधी लाभार्थी, माय भारत स्वयंसेवक आणि इतरांचा समावेश आहे. पुण्याजवळील तळेगाव दाभाडे इथल्या नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रीतम अहिरे यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या संचलन कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. हा अनुभव आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याची भावना अहिरे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.

****

प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना तसंच सर्व यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही संविधानाची ओळख करून देण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय तसंच विशेष सहाय्य विभागांतर्गत नांदेडच्या सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात उद्या प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात येणार आहे. तसंच नांदेड सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय अधिनस्त शासकिय वसतिगृह शासकिय निवासी शाळा इथं उद्या भारतीय संविधानावद्दल माहिती देणारे कार्यक्रमही आयोजीत करण्यात येणार आहेत.

****

नांदेड जिल्हा पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक घोषित झाले आहे. नियंत्रण कक्षातील पोलिस सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय अंबादासराव जोशी आणि जमादार दिलीप भोजूसिंग राठोड यांना पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी हे राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनी मुख्य सोहळ्यात दोघांनाही हे पदक प्रदान करण्यात येईल.

****

दुसऱ्या टप्प्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यरत होणाऱ्या सौर उर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. याचा मोठा फायदा घरगुती ग्राहक आणि औद्योगिक ग्राहकांना होणार आहे, अशी माहिती महावितरणचे स्वतंत्र संचालक तसंच भाजप प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी काल दिली. मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सौर उर्जा प्रकल्पांमुळं आगामी पाच वर्षांत १०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर प्रति ८७ युनिटपर्यंत ५ रुपये तर १०१ ते ३०० युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर ११ रुपये ८२ पैसे प्रति युनिटपर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होतील, एक एप्रिलपासून महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्याटप्प्यानं मिळू लागतील असं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

अहिल्यानगर इथं राज्य शासनाचा उच्च आणि तंत्र  शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमानं न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स महाविद्यालयात, उद्या २६ आणि परवा २७ जानेवारी रोजी दोन दिवसीय अहिल्यानगर ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उद्या सकाळी दहा वाजता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं उद्घघाटन होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...