Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 19 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचाण्णवावी जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. १६३० साली आजच्याच दिवशी पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची स्थापना करून मुघल सामाज्याला आव्हान दिलं. शिवाजी महाराजांचं प्रागतिक नेतृत्व, सैन्याबाबतची दूरदृष्टी, शौर्य, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्वराज्यासाठीचे त्यांचे अविरत प्रयत्न, या असामान्य गुणांमुळे शिवाजी महाराजांना जनमानसात अत्यंत आदराचं स्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे. शिवाजी महाराजांचं शौर्य आणि त्यांच्या असामान्य नेतृत्वानं रचलेला स्वराज्याचा पाया तसंच त्यांचं शौर्य आणि न्यायबुद्धी, यांनी पुढच्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आज स्वतंत्र, आत्माभिमानी भारत आपण पाहतो आहोत, त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेऱणा आहे. छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि राज्य कारभार कसा चालवायचा याची जी मानवता त्यांनी सांगितलेली आहे आपल्याला कल्पना आहे ते केवळ योग्य नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते पर्यावरण असेल जलसंवर्धन असेल जंगल संवर्धन असेल वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन असेल या सगळ्या व्यवस्थापन शास्त्राचे गुरु हे छत्रपती शिवराय होते
****
स्वराज्यातले किल्ले मंदिरं आहेत, त्यामुळे त्यांच्या संवर्धनाकडं विशेष लक्ष दिलं जात असून, किल्ल्यांवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी कृती दल स्थापन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तेरा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्यात शिवनेरी किल्ल्याचाही समावेश असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
****
शिवजयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. पुण्यात काढण्यात आलेल्या पदयात्रेत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक परिसरातून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, यांच्या हस्ते शिव प्रतिमेचं पूजन करुन पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.
नांदेडमध्ये "जय शिवाजी जय भारत" पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं समूहवाचन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत करण्यात आलं. शेकडो विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सोलापूर, धुळे, अकोला, नंदुरबार, यवतमाळ तसंच वाशिम इथं काढलेल्या पदयात्रेत नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
बीड इथं सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आज सकाळी शिवजयंतीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यावेळी उपस्थित होते.
गेवराई इथं शिवशाही या ऐतिहासिक महानाट्याचे तीन प्रयोग शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित केले असून, शिवप्रेमी नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन आमदार विजयसिंह पंडित यांनी केलं आहे.
****
लातूरमध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक सोहळा मध्यरात्री साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते बाल शिवबांचा पाळणा झुलवून या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम झाला.
सोलापूर शहरातल्या शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर लाखो महिलांच्या साक्षीने शिवजयंती निमित्त पाळणा गायन करण्यात आलं.
****
व्यसनमुक्त समाजासाठी 'धरू व्यायामाची कास, करू व्यसनांचा ऱ्हास' हा संदेश देत यवतमाळच्या देव चौधरी ह्या आंतरराष्ट्रीय धावपटूने 'आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्' साठी तब्बल १३ तास धाऊन नोंद केली आहे. न थकता, न दमता, भर उन्हात देव १३ तासात १३७ किलोमीटर धावला आणि या विक्रमाला त्याने गवसणी घातली. आम्ही यवतमाळकर क्रीडाप्रेमी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते देव चा सत्कार करण्यात आला.
****
नवव्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तान आणि दुबईत या स्पर्धेतले सामने होणार असून, आज पहिला सामना कराची इथं पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघादरम्यान होणार आहे.
****
No comments:
Post a Comment